पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 31 OCT 2024 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2024

 

भारत माता की - जय!

भारत माता की - जय!

भारत माता की - जय!

सरदार साहेबांचे प्रेरणादायी शब्द... स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळील हा भव्य कार्यक्रम... एकता नगरचे मनोहारी दृश्य आणि येथील अप्रतिम सादरीकरण... मिनी इंडियाची झलक... सर्वकाही खूप अद्भुत आहे, प्रेरणादायी आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी प्रमाणेच... 31 ऑक्टोबर रोजी होणारा हा कार्यक्रम संपूर्ण देशात नवीन ऊर्जा निर्माण करतो. राष्ट्रीय एकता दनानिमित्त मी देशातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

यावेळी, राष्ट्रीय एकता दिवस एक असाधारण योगायोग घेऊन आला आहे. एकीकडे, आपण एकतेचा उत्सव साजरा करत आहोत, आणि दुसरीकडे, दिवाळीचा शुभ प्रसंग देखील आहे. दिवाळी संपूर्ण देशाला प्रकाशाशी जोडते, संपूर्ण देशाला प्रकाशित करते. आणि आता, दिवाळीचा सण भारताला जगाशीही जोडत आहे. अनेक देशांमध्ये दिवाळी हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जात आहे. देशात आणि जगभरात राहणाऱ्या सर्व भारतीयांना तसेच भारताच्या सर्व हितचिंतकांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

हा राष्ट्रीय एकता दिवस आणखी एका कारणासाठीही खास आहे. आज सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंती वर्षाचा प्रारंभ होत आहे. पुढील दोन वर्षे संपूर्ण देश सरदार पटेल यांची 150 वी जयंती साजरी करणार आहे. त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल देशातील जनतेकडून ही त्यांना वाहिलेली आदरांजली आहे. हा दोन वर्षांचा उत्सव 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या आपल्या संकल्पाला बळकटी देईल. जे अशक्य वाटते ते शक्य होऊ शकते, हे या प्रसंगातून आपल्याला शिकायला मिळते. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जगात असे काही लोक होते ज्यांनी भारताचे तुकडे होतील अशी भविष्यवाणी केली होती, आणि आपण सरदार साहेबांच्या शब्दांत याचे सविस्तर वर्णन ऐकले. त्यांना अशी आशा नव्हती की शेकडो संस्थाने एकत्र येऊन पुन्हा एक अखंड भारत निर्माण होऊ शकेल. पण सरदार साहेबांनी ते सिद्ध करून दाखवले. हे साध्य करणे शक्य झाले कारण सरदार साहेब कृतीत व्यावहारिक, दृढनिश्चयात प्रामाणिक, कामात मानवतावादी आणि उद्दिष्टात राष्ट्रवादी होते.

मित्रांनो,

आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडूनही प्रेरणा घेतो. त्यांनी सर्वांना एकत्र करून आक्रमकांना हाकलून लावले. महाराष्ट्रातील रायगड किल्ला आजही तीच कहाणी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरून राष्ट्राच्या विविध विचारांना एका समान ध्येयासाठी एकत्र केले. एकता नगरमधील त्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याची प्रतिमा प्रेरणेचे प्रतीक म्हणून आपल्यासमोर उभी आहे. रायगड किल्ला हे सामाजिक न्याय, देशभक्ती आणि राष्ट्राला प्रथम स्थान देण्याच्या मूल्यांचे पवित्र स्थान आहे. या पार्श्वभूमीवर, आपण आज 'विकसित भारता’चा संकल्प साध्य करण्यासाठी येथे एकत्र जमलो आहोत.

मित्रांनो,

गेल्या दहा वर्षांत भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी अभूतपूर्व कार्य झाले आहे. आज, सरकारची प्रत्येक कृती आणि ध्येय राष्ट्रीय एकतेप्रति वचनबद्धता दर्शवते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आपले एकता नगर… येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे... आणि केवळ नावापुरती नाही तर त्याच्या बांधकामातही एकता आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी वापरलेल्या शेतीच्या अवजारांपासून मिळवलेले लोखंड हे या पुतळ्याच्या निर्मितीसाठी येथे आणण्यात आले, कारण सरदार साहेब हे लोखंडाचे पुरुष होते, शेतकऱ्यांचे सुपुत्र होते. म्हणूनच, विशेष करून शेतात वापरल्या जाणाऱ्या अवजारांचे लोखंड पुतळा उभारणीच्या कामात वापरण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यातील माती देखील येथे आणण्यात आली. यामुळे पुतळ्याच्या बांधकामात एकतेच्या भावनेची अनुभूती येते. येथे, आपल्याकडे 'एकता नर्सरी' आहे. येथे एक 'विश्व वन' आहे... जिथे जगातील प्रत्येक खंडातील झाडे आणि वनस्पती आहेत. येथे एक 'बाल पोषण उद्यान' आहे जिथे देशभरातील आरोग्यदायी खाद्य पद्धती एकाच ठिकाणी प्रदर्शित केल्या जातात. येथे एक 'आरोग्य वन' देखील आहे, ज्यामध्ये देशाच्या विविध भागातील आयुर्वेदिक परंपरा आणि वनस्पतींचा समावेश आहे. इतकेच नाही तर येथे पर्यटकांसाठी 'एकता मॉल' देखील आहे, जिथे देशभरातील हातमाग आणि हस्तकलेची उत्पादने एकाच छताखाली मिळू शकते.

आणि मित्रांनो,

'एकता मॉल' केवळ इथेच नाही तर प्रत्येक राज्याच्या राजधानीत 'एकता मॉल' उभारण्यास आम्ही प्रोत्साहन देत आहोत. वार्षिक 'युनिटी रन' द्वारे एकतेचा हाच संदेश आणखी दृढ केला जातो.

मित्रांनो,

खरे भारतीय म्हणून, देशाच्या एकतेसाठी झालेला प्रत्येक प्रयत्न आनंद आणि उत्साहाने साजरे करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक क्षणी ऊर्जा, आत्मविश्वास आणि नवीन संकल्प आणि आशा - यालाच उत्सव म्हणतात. जेव्हा आपण भारताच्या भाषांना महत्त्व देतो तेव्हा आपण एकतेचा आणखी एक मजबूत दुवा तयार करत असतो. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात भारतीय भाषांमधील शिक्षणावर विशेष भर दिला आहे. आणि, अलिकडच्या एका निर्णयाबद्दल देशभर अभिमान व्यक्त करण्यात आला, जगभरात त्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले, तो निर्णय काय होता हे तुम्हाला माहिती आहे का? अलिकडेच सरकारने मराठी, बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत यांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. सरकारच्या या निर्णयाचे सर्वांनी मनापासून स्वागत केले आहे. जेव्हा आपण आपल्या भाषांना मातृभाषा म्हणून मान देतो... तेव्हा ते आपल्या मातांचा, आपल्या पृथ्वी मातेचा आणि भारतमातेचा देखील आदर करतो. जसे भाषांमधून एकदा बळकट होते त्याचप्रमाणे... देशभरात सुरू असलेल्या संपर्क प्रकल्पामुळेही देखील देशाची एकता बळकट होत आहे. रेल्वे, रस्ते, महामार्ग आणि इंटरनेटसारख्या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे गावे शहरांशी जोडली गेली आहेत. जेव्हा काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांच्या राजधान्या रेल्वेने जोडल्या जातात... जेव्हा लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार बेटे समुद्राखालील केबल्सद्वारे हाय-स्पीड इंटरनेटशी जोडली जातात... जेव्हा पर्वतरांगांमधील लोक मोबाईल नेटवर्कशी जोडले जातात... तेव्हा विकासाच्या स्पर्धेत मागे राहिल्याची भावना नाहीशी होते, आणि पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण होते. राष्ट्रीय एकात्मतेची भावना सशक्त होते.

मित्रांनो,

मागील सरकारांच्या धोरणांमध्ये आणि हेतूंमध्ये भेदभावाची भावना असल्यामुळे देशाची एकता कमकुवत झाली होती. गेल्या 10 वर्षांत, 'सुशासना'च्या नवीन मॉडेलने भेदभावाची प्रत्येक शक्यता नष्ट केली आहे... आपण 'सबका साथ, सबका विकास'चा मार्ग निवडला आहे. आज, 'हर घर जल' योजना कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक घराला पाणी पोहोचवत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही भेदभावाशिवाय दिला जातो. आज, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांना भेदभावाशिवाय घरे दिली जातात. आयुष्मान भारत योजनेचा फायदा प्रत्येक पात्र व्यक्तीला कोणत्याही भेदभावाशिवाय दिला जातो... सरकारच्या या दृष्टिकोनामुळे समाजात अनेक दशकांपासूनचा असंतोष दूर झाला आहे. परिणामी, लोकांचा सरकार आणि त्याच्या व्यवस्थांवरील विश्वास वाढला आहे. 'विकास' आणि 'विश्वास' यांचे हे ऐक्य 'एक भारत, श्रेष्ठ भारत' च्या स्वप्नपूर्तीला चालना देते. माझा ठाम विश्वास आहे की प्रत्येक योजनेत, प्रत्येक धोरणात आणि आपल्या हेतूंमध्ये एकता ही आपली महत्वाची शक्ती आहे. मला विश्वास आहे की सरदार साहेबांचा आत्मा हे पाहून आणि ऐकून आपल्याला आशीर्वाद देत असेल.

मित्रांनो,

पूज्य बापू महात्मा गांधी म्हणायचे, "विविधतेत एकतेने जगण्याच्या आपल्या क्षमतेची सतत चाचणी घेतली गेली पाहिजे." ते असेही म्हणाले होते की "आपण कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा उत्तीर्ण झालो पाहिजे." गेल्या 10 वर्षांत, भारताने विविधतेत एकतेत राहण्याच्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळवले आहे. सरकारने आपल्या धोरणांमध्ये आणि निर्णयांमध्ये 'एक भारत' ही भावना सतत बळकट केली आहे. आज आपण सर्वजण 'एक राष्ट्र, एक ओळख'... म्हणजेच आधार प्रणालीचे यश पाहत आहोत आणि संपूर्ण जग याची चर्चा करत आहे. पूर्वी, भारतात वेगवेगळ्या कर प्रणाली होत्या. आम्ही 'एक राष्ट्र, एक कर' प्रणाली - वस्तू आणि सेवा कर प्रणाली - तयार केली. आम्ही 'एक राष्ट्र, एक पॉवर ग्रिड' द्वारे देशातील वीज क्षेत्र मजबूत केले. एक काळ असा होता की काही ठिकाणी वीज होती तर काही ठिकाणी अंधार होता आणि पॉवर ग्रिड तुटलेला होता. आम्ही 'एक राष्ट्र, एक ग्रिड' चा संकल्प पूर्ण केला. 'एक राष्ट्र, एक शिधापत्रिका' द्वारे, आम्ही गरिबांना मिळणारे लाभ एकत्रित केले. आम्ही आयुष्मान भारत द्वारे 'एक राष्ट्र, एक आरोग्य विमा' प्रदान केला, ज्याचा फायदा प्रत्येक नागरिकाला झाला.

मित्रांनो,

आपल्या एकतेच्या प्रयत्नांत, आपण आता 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर काम करत आहोत, जे भारताच्या लोकशाहीला बळकटी देईल, भारताच्या संसाधनांचा योग्य वापर वाढवेल आणि 'विकसित भारता’च्या स्वप्नपूर्तीला गती मिळून देश समृद्धीकडे जाईल. भारत 'एक राष्ट्र, एक नागरी संहिता'... म्हणजेच धर्मनिरपेक्ष नागरी संहिता या दिशेनेही वाटचाल करत आहे. मी लाल किल्ल्यावरून हे सांगितले होते. याचा सारांश म्हणजे सरदार साहेबांनी सांगितलेली सामाजिक एकता देखील आहे आणि ती विविध सामाजिक वर्गांमधील भेदभावाच्या तक्रारी दूर करण्यास, राष्ट्रीय एकता मजबूत करण्यास तसेच देशाला पुढे नेण्यास मदत करेल. देश एकतेने आपल्या वचनबद्धता पूर्ण करेल.

मित्रांनो,

आज संपूर्ण देश आनंदी आहे की स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर 'एक राष्ट्र, एक संविधान'ची वचनबद्धता देखील पूर्ण झाली आहे; ही सरदार साहेबांच्या आत्म्याला माझी सर्वात मोठी आदरांजली आहे. नागरिकांना कदाचित माहित नसेल की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान 70 वर्षे संपूर्ण देशात पूर्णपणे लागू झाले नव्हते. संविधानाचा जयजयकार करणाऱ्यांनी त्याचा अपमान केला आहे... कारण काय होते? कलम 370 ची भिंत जम्मू आणि काश्मीरमध्ये संविधानाच्या अंमलबजावणीत अडथळ्यासारखी उभी होती, ज्यामुळे तेथील लोकांचे अधिकार हिरावून घेतले गेले होते. ते कलम 370 आता कायमचे गाडले गेले आहे. या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमध्ये भेदभावाशिवाय मतदान झाले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय संविधानाची शपथ घेतली. हे दृश्य भारतीय संविधानाच्या निर्मात्यांना खूप समाधान देणारे, त्यांच्या आत्म्याला शांती देणारे असले पाहिजे आणि ही त्यांना आमची नम्र आदरांजली आहे. मी भारताच्या एकतेसाठी हा एक महत्त्वाचा आणि मजबूत टप्पा मानतो. जम्मू आणि काश्मीरच्या देशभक्त जनतेने फुटीरता आणि दहशतवादाचा जुना अजेंडा नाकारला आहे. त्यांनी दशकांपासून चालत आलेला प्रचार मोडून काढत आपल्या मतांनी भारताचे संविधान आणि लोकशाहीला विजय मिळवून दिला आहे. या राष्ट्रीय एकता दिनी, जम्मू आणि काश्मीरच्या देशभक्त जनतेला, जे भारताच्या संविधानाचा आदर करतात, त्यांना मी सलाम करतो.

मित्रांनो,

गेल्या 10 वर्षात, भारताने राष्ट्रीय एकतेला धोका निर्माण करणाऱ्या अनेक समस्या सोडवल्या आहेत. आज, दहशतवादाचे सूत्रधार जाणून आहेत की जर त्यांनी भारताला हानी पोहोचवली तर... भारत त्यांना सोडणार नाही. ईशान्य भारताकडे पहा, जिथे मोठी संकटे आली होती. संवाद, विकास आणि विश्वासाच्या माध्यमातून आपण फुटीरतावादाच्या ज्वाला शांत केल्या आहेत. बोडो कराराने आसाममधील 50 वर्षांचा वाद संपवला आहे... ब्रू-रियांग करारामुळे हजारो विस्थापित लोकांना दशकांनंतर घरी परतण्याची परवानगी मिळाली आहे. त्रिपुरातील राष्ट्रीय मुक्ती मोर्चाशी झालेल्या करारामुळे दीर्घकाळाचा असंतोष संपला आहे. आसाम आणि मेघालयमधील सीमा वादही बऱ्याच प्रमाणात मिटला आहे.

मित्रांनो,

21 व्या शतकाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा... दुसऱ्या आणि तिसऱ्या दशकात भारताने नक्षलवादासारखा भिषण रोग कसा उपटून टाकला यावर एक सुवर्ण अध्याय असेल. एकेकाळी नेपाळमधील पशुपतीनाथ ते भारतातील तिरुपतीपर्यंत रेड कॉरिडॉर कसा पसरला होता, यांचे स्मरण करा. मर्यादित संसाधने असूनही स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी लढणारे भगवान बिरसा मुंडा यांच्या सारखे देशभक्त देणाऱ्या आदिवासी समाजात एका सुनियोजित कटाद्वारे नक्षलवादाची बीजे पेरलेली गेली होती. नक्षलवादाची आग पेटली गेली होती. नक्षलवाद हा भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी एक महत्त्वाचा आव्हान बनला. दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर, नक्षलवाद आता भारतात शेवटचे श्वास घेत आहे हे जाणून मला समाधान वाटते. आज, ज्या विकासाची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो, तो माझ्या आदिवासी समुदायाच्या घरापर्यंत पोहोचत आहे, ज्यामुळे चांगल्या भविष्याची आशा निर्माण होत आहे.

मित्रांनो,

आज आपण अशा भारतात उभे आहोत ज्याच्याकडे दृष्टी, दिशा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दृढता आहे. आज, देशाकडे दृष्टी, दिशा आणि दृढनिश्चय आहे. एक असा भारत जो सशक्त, समावेशक, संवेदनशील, जागरूक, नम्र आणि विकासाच्या मार्गावर आहे - एक असा भारत जो 'शक्ती' (सामर्थ्य) आणि 'शांती' या दोन्हींचे महत्त्व जाणतो. जागतिक अशांततेच्या काळात, जलद विकास साध्य करणे हे काही लहान काम नाही. युद्धाच्या काळात वेगवेगळ्या भागांमध्ये संघर्ष सुरू असताना बुद्धांच्या संदेशांचा प्रसार करणे सामान्य नाही. विविध देशांमधील संबंधांमध्ये संकटे येत असताना भारत 'विश्व बंधू' (जागतिक मित्र) म्हणून उदयास येणे सामान्य नाही. राष्ट्रांमधील अंतर वाढत असताना, अनेक देश भारताच्या जवळ येत आहेत. हे सामान्य नाही... एक नवीन इतिहास लिहिला जात आहे. हे साध्य करण्यासाठी भारताने काय केले आहे?

मित्रांनो,

आज जग पाहत आहे की भारत आपल्या समोरील आव्हानांचा कसा दृढतेने सामना करत आहे. जग पाहत आहे की दशकभर जुन्या समस्यांचा सामना करण्यासाठी भारत कसा एकत्र येत आहे... आणि म्हणूनच... या महत्त्वाच्या वेळी, आपण आपली एकता जपली पाहिजे आणि व्यवस्थापित केली पाहिजे... आपण घेतलेल्या एकतेची शपथ आपण वारंवार लक्षात ठेवली पाहिजे, ती शपथ जगली पाहिजे आणि गरज पडल्यास त्या शपथेसाठी लढले पाहिजे. आपला प्रत्येक क्षण या शपथेच्या भावनेने भरलेला असला पाहिजे.

मित्रांनो,

भारताच्या वाढत्या सामर्थ्याने आणि देशातील एकतेच्या भावनेमुळे काही शक्ती, विकृत विचार आणि प्रवृत्ती खूप अस्वस्थ झाल्या आहेत. भारताच्या आत आणि बाहेर असे लोक आहेत जे अस्थिरता आणि अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते भारताच्या आर्थिक हितांना हानी पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. या शक्ती जगभरातील गुंतवणूकदारांना चुकीचा संदेश पाठवू इच्छितात, भारताची नकारात्मक प्रतिमा निर्माण करू इच्छितात... ते आपल्या सशस्त्र दलांनाही लक्ष्य करत आहेत, चुकीची माहिती पसरवण्याच्या मोहिमा चालवत आहेत. ते लष्करात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत... हे लोक जात आणि समुदायाच्या नावाखाली भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे एकमेव ध्येय भारतीय समाज आणि त्याची एकता कमकुवत करणे आहे. त्यांना भारताचा विकास कधीच नको आहे... कारण कमकुवत भारत आणि गरीब भारत त्यांच्या राजकारणाला अनुकूल आहे. पाच दशकांपासून, हे घाणेरडे आणि घृणास्पद राजकारण राष्ट्राला कमकुवत करण्यासाठी वापरले जात आहे. म्हणूनच, ते एकीकडे संविधान आणि लोकशाहीचा पुरस्कार करत असतात आणि दुसरीकडे भारताचे तुकडे करण्याचे काम करतात. आपण शहरी नक्षलवाद्यांच्या या युतीला ओळखले पाहिजे; देश तोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि विध्वंसक विचारांना पोसणाऱ्या तसेच खोटे मुखवटे धारण करणाऱ्यांना ओळखून त्यांचा सामना करायला हवा. जंगलात वाढणारा तसेच आदिवासी तरुणांना बॉम्ब आणि बंदुकांनी देऊन फसवणारा नक्षलवाद जसजसा नाहीसा होत चालला आहे तसतसे शहरी नक्षलवादाचे एक नवीन मॉडेल उदयास येत आहे.

मित्रांनो,

आज परिस्थिती अशी झाली आहे की एकतेबद्दल बोलणे देखील गुन्हा समजला जातो. एक काळ असा होता की जेव्हा आपण शाळा, महाविद्यालये, घरे आणि चौका चौकात आपण एकतेची गाणी अभिमानाने गात होत, जे मोठे आहेत त्यांना आपण गायलेली गाणी आठवतील... “हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग, रूप, वेश, भाषा चाहे अनेक है!" ही गाणी उघडपणे गायली जात होती. जर आज कोणी असे गाणे उघडपणे गायले तर त्यांना शहरी नक्षलवादी गट लक्ष्य करेल. आणि जर कोणी असे म्हटले की "एकता म्हणजे सुरक्षितता", तर हे लोक त्याचाही चुकीचा अर्थ लावतील... ज्यांना देश तोडायचा आहे आणि समाजाचे विभाजन करायचे आहे ते राष्ट्रीय एकतेमुळे नाराज होतात. म्हणून, माझ्या देशबांधवांनो, अशा लोकांविरुद्ध, कल्पनांविरुद्ध, प्रवृत्तींविरुद्ध आणि वृत्तींविरुद्ध आपण पूर्वीपेक्षा अधिक सतर्क राहिले पाहिजे.

मित्रांनो,

आपण सरदार साहेबांच्या आदर्शांनुसार चालणारे लोक आहोत. सरदार साहेब म्हणायचे की भारताचे सर्वात मोठे ध्येय एकसंध आणि सशक्त राष्ट्र बनवणे, हे असले पाहिजे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की भारत हा एक वैविध्यपूर्ण देश आहे. आपण विविधता साजरी करू; तरच एकता मजबूत होईल. पुढची 25 वर्षे एकतेसाठी महत्त्वाची आहेत. म्हणून, आपण एकतेचा हा मंत्र कधीही कमकुवत होऊ देऊ नये, प्रत्येक खोट्याचा सामना करू नये आणि एकतेचा मंत्र जगू नये... ही एकता जलद आर्थिक विकासासाठी, 'विकसित' आणि 'समृद्ध' भारत निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. ही एकता सामाजिक सलोख्यासाठी आवश्यक आहे, खऱ्या सामाजिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर आपण खऱ्या सामाजिक न्यायासाठी समर्पित असलो आणि जर सामाजिक न्यायाला आपले प्राधान्य असेल, तर एकता ही सर्वांसाठी आवश्यक बाब आहे... आपण एकता राखली पाहिजे. चांगल्या सुविधांचा विकास आणि प्रगती एकतेशिवाय अशक्य आहे. नोकऱ्या आणि गुंतवणुकीसाठी देखील एकता आवश्यक आहे. चला, आपण सगळे एकत्र पुढे जाऊया. पुन्हा एकदा, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त तुम्हा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. 

मी म्हणेन, सरदार साहेब, तुम्ही सर्व म्हणा- अमर रहे… अमर रहे!

सरदार साहेब- अमर रहे... अमर रहे!

सरदार साहेब- अमर रहे... अमर रहे!

सरदार साहेब- अमर रहे... अमर रहे!

सरदार साहेब- अमर रहे... अमर रहे!

भारत माता की – जय!

भारत माता की – जय!

भारत माता की – जय!

 

* * *

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2178533) Visitor Counter : 6