भारतीय निवडणूक आयोग
भारत निवडणूक आयोगाने प्रतिस्पर्धी पक्ष / उमेदवारांना लक्ष्य करणाऱ्या कृत्रिम व्हिडिओंच्या निर्मितीसंदर्भात कृत्रिम प्रज्ञा साधनांच्या वापराबाबत, राजकीय पक्षांसाठी आदर्श आचारसंहिता आणि संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश केले जारी
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2025 11:21AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2025
1) भारत निवडणूक आयोगाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आणि 8 विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांची घोषणा केल्यानंतर तिथे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आता याअंतर्गतच्या तरतुदी उमेदवार आणि राजकीय पक्षांद्वारा समाज माध्यमांसह इंटरनेटवर सामायिक केल्या जाणाऱ्या आशय सामग्रीला देखील लागू असणार आहेत.
2) आदर्श आचारसंहितेअंतर्गतच्या तरतुदीनुसार, इतर पक्षांवर टीका करताना, ही टीका त्यांच्या धोरणे आणि कार्यक्रम, मागील कार्यकाळ आणि कामापुरती मर्यादित असायला हवी. यासोबतच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी, इतर पक्षांच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक कामांशी संबंधित नसलेल्या खाजगी जीवनातील सर्व बाबींवर टीका करणे टाळावे.
3) इतर पक्षांवर किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर कोणतीही पुष्टी नसलेल्या आरोपांवर आधारित तसेच विपर्यास करणाऱ्या माहितीवर आधारित टीका करणे टाळले पाहिजे.
4) निवडणूक प्रक्रियेची नैतिकता जपण्याची गरजही आयोगाने अधोरेखित केली असून, विपर्यास करणारी माहिती अथवा समाज माध्यम व्यासपीठांवरील चुकीची माहिती प्रसारित करणारे डीप फेक आशय सामग्री तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित साधनांचा गैरवापर करू नये असा सल्लाही आयोगाने दिला आहे.
5) याव्यतिरिक्त, सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते, उमेदवार तसेच स्टार प्रचारकांनी त्यांच्या समाज माध्यम व्यासपीठांद्वारे प्रचार करण्यासाठी किंवा जाहिरातींच्या स्वरूपात, जर कोणत्याही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनांद्वारे निर्मित / कृत्रिम स्वरुपातील आशय सामग्री सामायिक केली जाणार असल्यास, अशा आशय सामग्रीला कृत्रिम प्रज्ञा आधारित साधनांद्वारे निर्मित, डिजिटल साधनांच्याद्वारे विस्तारित (Digitally Enhanced) किंवा कृत्रिम आशय (Synthetic Content) अशी स्पष्ट स्वरुपातील नोंदीचे ठळक लेबल दिले जाईल, यासाठीच्या आवश्यक उपाययोजना कराव्यात.
6) निवडणुकीच्या काळात सामाजिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी समाज माध्यमांवरून सामायिक केल्या जाणाऱ्या आशय सामग्रीवर करडी नजर ठेवली जाणार आहे.
7) आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी होईल याची सुनिश्चित करण्यासाठी आयोगाने योग्य आणि व्यापक विस्तृत नियोजन केलेले आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे कोणत्याही स्वरुपात उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2176637)
आगंतुक पटल : 23