आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कफ सिरपची गुणवत्ता आणि तर्कशुद्ध वापरासाठी केंद्रीय आरोग्य सचिवांची राज्यांसोबत उच्च-स्तरीय बैठक
Posted On:
05 OCT 2025 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2025
कफ सिरप अर्थात खोकल्यावरील औषधाच्या गुणवत्ता आणि प्रशासनासंबंधी अलीकडील चिंता लक्षात घेऊन, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत एक उच्च-स्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत औषध गुणवत्ता निकषांचे पालन आणि विशेषत: लहान मुलांमध्ये कफ सिरपचा तर्कशुद्ध वापर करण्यावर चर्चा झाली. यापूर्वी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला होता आणि आवश्यक कार्यवाही करण्यासाठी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले होते.

चर्चेचे मुख्य तीन मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:
- औषध उत्पादन युनिट्समध्ये गुणवत्ता मानकांसंबंधित शेड्यूल एम आणि इतर जी,एस.आर. तरतुदींचे पालन करणे.
- मुलांमध्ये कफ सिरपचा तर्कशुद्ध वापर करणे, त्यात अतार्किक मिश्रणे आणि अयोग्य औषधांचे एकत्रीकरण टाळण्याची गरज आहे.
- अशा एकत्रीकरण औषधांची विक्री आणि गैरवापर रोखण्यासाठी किरकोळ औषध विक्रेत्यांचे नियमन बळकट करणे.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथे बालकांच्या मृत्यूचा कथित दूषित कफ सिरपशी संबंध जोडला गेल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.

परिस्थितीची दखल घेऊन, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन मधले महामारीशास्त्रज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ आणि औषध निरीक्षकांचा समावेश असलेल्या केंद्रीय तज्ज्ञ पथकाने छिंदवाडा आणि नागपूर येथे भेट दिली आणि मध्य प्रदेश राज्य प्राधिकरणांच्या समन्वयाने नोंदवलेल्या प्रकरणांचे आणि मृत्यूंचे तपशीलवार विश्लेषण केले.
प्राथमिक निष्कर्षांनुसार लेप्टोस्पायरोसिसचे एक पॉझिटिव्ह प्रकरण वगळता, सामान्य संसर्गजन्य रोगांची शक्यता नाकारण्यात आली आहे. मुलांनी सेवन केलेल्या 19 औषधांचे नमुनेउपचारकर्ते खासगी डॉक्टर्स आणि जवळपासच्या किरकोळ औषधविक्रेत्यांकडून गोळा करण्यात आले होते. आजपर्यंत विश्लेषण केलेल्या 10 नमुन्यांपैकी 9 नमुने गुणवत्ता मानकांवर पात्र ठरले आहेत, असे रासायनिक विश्लेषण दर्शवते. तथापि, त्यापैकी एक, म्हणजे 'कोल्डरिफ' नावाचे कफ सिरप, त्यात डीईजी अनुमेय मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे. त्यानंतर तामिळनाडू अन्न आणि औषध प्रशासनाने, तामिळनाडूत कांचीपुरम इथल्या संबंधित युनिटवर नियामक कारवाई केली आहे. तपासणी निष्कर्षांवर आधारित, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन ने उत्पादन परवाना रद्द करण्याची शिफारस केली आहे आणि फौजदारी कारवाईसुद्धा सुरू करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व औषध उत्पादकांना सुधारित शेड्यूल एम चे कठोर पालन करण्याचे आवाहन केले. खोकल्याचे बहुतेक प्रकार स्वतःहून बरे होणारे असतात आणि त्यांना औषधी उपचारांची आवश्यकता नसते, म्हणून राज्यांना विशेषतः लहान मुलांमध्ये कफ सिरपचा तर्कशुद्ध वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला. लहान मुलांमध्ये कफ सिरपच्या तर्कशुद्ध वापरासंदर्भात आरोग्यसेवा महासंचालनालयाने जारी केलेल्या सल्ल्यावरही चर्चा करण्यात आली.
* * *
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175168)
Visitor Counter : 13