गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी छत्तीसगडमधील जगदलपूर येथे बस्तर दसरा महोत्सवाला केले संबोधित
75 दिवसांचा बस्तर दसरा महोत्सव केवळ आदिवासी समुदाय,छत्तीसगड किंवा भारतासाठीच नव्हे तर हा जगातील सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव आहे
जर 140 कोटी लोकांनी स्वदेशीच्या प्रतिज्ञेचा अंगिकार केला, तर कोणीही भारताला जगातील आघाडीची आर्थिक महासत्ता बनण्यापासून रोखू शकणार नाही
Posted On:
04 OCT 2025 6:28PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह, यांनी आज छत्तीसगडमधील जगदलपूर येथे बस्तर दसरा महोत्सवात उपस्थितांना संबोधित केले. भाषणापूर्वी, शाह यांनी प्रसिद्ध दंतेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पूजा केली.

75 दिवस चालणारा बस्तर दसरा, जो जगातील सर्वात मोठा आणि अद्वितीय उत्सव आहे, तो केवळ आदिवासी समाज, बस्तर, छत्तीसगड किंवा भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी एक सांस्कृतिक महोत्सव आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले. दंतेश्वरी मंदिरात प्रार्थना करताना, 31 मार्च 2026 पर्यंत बस्तर प्रदेश नक्षलवादी हिंसाचारापासून मुक्त करण्यासाठी सुरक्षा दलांना ताकद मिळावी, अशी प्रार्थना केल्याचे शाह यांनी सांगितले. नक्षलवाद विकासाच्या संघर्षातून निर्माण झाला आहे, हा दिल्लीतील काही लोकांकडून पसरवला जाणारा अपप्रचार त्यांनी खोडून काढला. नक्षलवाद हेच बस्तरच्या प्रगतीपासून वंचित राहण्याचे प्राथमिक कारण आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने आश्वासन दिले की, 31 मार्च 2026 नंतर नक्षलवादी बस्तरचा विकास किंवा तेथील लोकांच्या हक्कांमध्ये अडथळा आणू शकणार नाहीत. नक्षलवादाकडे वळलेले बस्तरमधील तरुण स्थानिक खेड्यांचे आहेत, असे शाह म्हणाले. त्यांनी बस्तरच्या लोकांना या दिशाभूल झालेल्या तरुणांना शस्त्रे खाली ठेवून प्रदेशाच्या विकासासाठी मुख्य प्रवाहात सामील होण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी छत्तीसगड सरकारने तयार केलेल्या देशातील सर्वात प्रभावी आत्मसमर्पण धोरणाची प्रशंसा केली. केवळ गेल्या एका महिन्यात 500 हून अधिक व्यक्तींनी आत्मसमर्पण केले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आणि नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होणाऱ्या गावाला विकासासाठी छत्तीसगड सरकारकडून 1 कोटी रुपये मिळतील, अशी घोषणा केली.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी नक्षलवाद्यांना आकर्षक आत्मसमर्पण धोरणाखाली शरणागती पत्करण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. त्याबरोबरच असा इशाराही दिला की, हिंसेच्या माध्यमातून बस्तरची शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न सशस्त्र दल, सीआरपीएफ , आणि छत्तीसगड पोलिसांकडून प्रखर प्रत्युत्तराने मोडून काढला जाईल. 31 मार्च 2026 ही देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी निश्चित केलेली तारीख आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

स्वदेशी जागरण मंचने आयोजित केलेल्या स्वदेशी मेळ्याचा संदर्भ देत, त्यांनी प्रत्येक व्यापाऱ्याला त्यांच्या दुकानांमध्ये किंवा शॉपिंग मॉल्समध्ये विदेशी वस्तूंचा साठा न ठेवण्याची विनंती केली. शाह म्हणाले की, जर भारतातील 140 कोटी लोकसंख्येने 'स्वदेशी'च्या प्रतिज्ञेचा अंगिकार केला तर भारताला जगातील आघाडीची आर्थिक महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान मोदींनी अलीकडेच छत्तीसगडसह देशभरातील माता आणि भगिनींना 395 वस्तूंवर महत्त्वपूर्ण जीएसटी सवलत देऊन मोठा दिलासा दिला आहे. मोदी सरकारने आदिवासींचा सन्मान करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

***
निलिमा चितळे / शैलेश पाटील / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2174902)
Visitor Counter : 11