शिक्षण मंत्रालय
विकसित भारत बिल्डथॉन 2025, या भारतातील सर्वात मोठ्या नवोन्मेष चळवळीत सहभागी होण्याचे शिक्षण मंत्रालयाचे विद्यार्थ्यांना आवाहन
प्रविष्टि तिथि:
03 OCT 2025 5:28PM by PIB Mumbai
नीती आयोग, अटल इनोव्हेशन मिशनच्या सहयोगाने शिक्षण मंत्रालयाने विकसित भारत बिल्डथॉन 2025 ही देशव्यापी नवोन्मेष चळवळ सुरू केली असून, यामध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी चे वर्ग असलेल्या शाळांचा सहभाग असेल. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विद्यार्थी नवोन्मेष उपक्रम असून, विकसित भारत @2047 च्या दृष्टीकोनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असेल.
बिल्डथॉन इयत्ता 6 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना यामध्ये सामील होण्याचे, सर्जनशीलतेने विचार करण्याचे आणि वास्तविक जीवनातील आव्हानांना तोंड देणाऱ्या कल्पना आणि उदाहरणे विकसित करण्याचे आवाहन करते. विद्यार्थी राष्ट्रीय महत्त्वाच्या पुढील चार विषयांवर काम करतील:
1. आत्मनिर्भर भारत – स्वावलंबी प्रणाली आणि उपायांची निर्मिती
2. स्वदेशी – स्वदेशी कल्पना आणि नवोन्मेषाला चालना
3. व्होकल फॉर लोकल- स्थानिक उत्पादने, हस्तकला आणि साधन संपत्तीचा प्रचार
4. समृद्धी - समृद्धी आणि शाश्वत विकासाचे मार्ग तयार करणे
देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना या चळवळीत उत्स्फुर्तपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ही केवळ एक स्पर्धा नसून, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर सर्जनशीलता, नवोन्मेश आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे.
विद्यार्थी नवोन्मेषकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी, शाळा फोटो आणि व्हिडिओच्या स्वरूपात त्यांच्या प्रवेशिका सादर करतील. तज्ज्ञांचे एक राष्ट्रीय पॅनेल प्रवेशिकांचे मूल्यांकन करेल आणि सर्वोत्तम विद्यार्थी संघांना बक्षिसे दिली जातील. मान्यतेच्या पलीकडे, या शाळा आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या नवोन्मेषाला आणखी बळ देण्यासाठी कॉर्पोरेट सहयोग, मार्गदर्शन आणि संसाधनांच्या माध्यमातून दीर्घकालीन पाठबळ मिळेल.
बिल्डथॉनची प्रमुख वैशिष्ट्ये:
· जगातील सर्वात मोठ्या प्रत्यक्ष नवोन्मेश उपक्रमात विद्यार्थी आपल्या नवोन्मेषाचे सादरीकरण करणार
· राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या अनुषंगाने प्रत्यक्ष, अनुभवात्मक शिक्षण
· आकांक्षी जिल्हे, आदिवासी आणि दुर्गम प्रदेशांवर विशेष लक्ष केंद्रित करणारा समावेशक सहभाग
विकसित भारत बिल्डॅथॉन 2025 हे विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे, निर्भयपणे नवोन्मेष सादर करण्याचे आणि 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या प्रवासात योगदान देण्याचे आवाहन आहे. प्रत्येक शाळा आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या चळवळीत सहभागी होण्यासाठी, त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी आणि उद्याचे नवोन्मेषक म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे.
स्पर्धेचे टप्पे:
· 23 सप्टेंबर 2025: विकसित भारत बिल्डथॉनचा शुभारंभ
· 23 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2025: नोंदणी
· 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2025: तयारीचे उपक्रम
· 13 ऑक्टोबर 2025: सर्व शाळांमध्ये देशव्यापी थेट बिल्डथॉन
· 14 ते 31 ऑक्टोबर 2025: शाळांकडून प्रवेशिका सादर केल्या जातील
· नोव्हेंबर 2025: प्रवेशिकांचे मूल्यमापन
· डिसेंबर 2025: सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विजेत्यांची घोषणा
विकसित भारत बिल्डेथॉन 2025 हा केवळ एक कार्यक्रम नसून, युवा मनाला चेतना देणारी, नवोन्मेश साजरा करणारी आणि आत्मनिर्भर भारताची भावना बळकट करणारी चळवळ आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने हे आव्हान स्वीकारावे, आणि भारताच्या नवोन्मेषाच्या गाथेत अभिमानाने योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
***
निलिमा चितळे / राजश्री आगाशे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2174626)
आगंतुक पटल : 514