कृषी मंत्रालय
ऊस संशोधनासाठी आयसीएआरमध्ये एक स्वतंत्र पथक स्थापन करणार: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान
Posted On:
30 SEP 2025 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2025
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देशात ऊस संशोधनासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेत (आयसीएआर) एक समर्पित पथक स्थापन करण्याची घोषणा केली. हे पथक ऊस धोरणावरही काम करेल. रुरल व्हॉइस आणि राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ यांनी आयसीएआरच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ऊस अर्थव्यवस्थेवरील राष्ट्रीय चर्चेला ते संबोधित करत होते.
चौहान यांनी अधोरेखित केले की उसाच्या 238 वाणांमध्ये साखरेचे प्रमाण चांगले आहे परंतु त्यात रेड रॉट रोगाचा धोका आहे. पर्याय विकसित करण्यासाठी त्यांनी एकाच वेळी अनेक वाणांवर काम करण्याची गरज अधोरेखित केली. नवीन वाणांमुळे अनेकदा नवीन रोगांचे धोके संभवतात त्यामुळे रोगांवर नियंत्रण ठेवणे हे एक महत्त्वाचे आव्हान आहे असे ते म्हणाले.

त्यांनी निदर्शनास आणून दिले की एकच पीक घेतल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात, यात पोषक तत्वे कमी होणे आणि नायट्रोजन स्थिरीकरणातील मर्यादा यांचा समावेश आहे. एकच पीक घेण्याऐवजी आंतरपीक घेणे किती व्यवहार्य आहे याचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले.
"आम्हाला आव्हानांची जाणीव आहे," असे चौहान म्हणाले. "आपल्याला उत्पादन वाढवणे आणि यांत्रिकीकरण करणे, खर्च कमी करणे आणि जास्तीत जास्त साखर मिळवणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पाण्याचा वापर ही एक गंभीर समस्या आहे. 'प्रति थेंब, अधिक पीक' या तत्त्वाखाली, आपल्याला पाण्याची आवश्यकता कमी करण्यासाठी धोरणांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर, आपण शेतकऱ्यांवरील आर्थिक भार विचारात घेतला पाहिजे, कारण ठिबक सिंचनासाठी येणारा खर्च लक्षणीय आहे."
कृषी मंत्र्यांनी जैविक उत्पादनांचे महत्त्व देखील अधोरेखित केले. इथेनॉल आणि मळी यांचे सुस्थापित उपयोग आहेत, परंतु शेतकऱ्यांचा नफा वाढविण्यासाठी नवीन मूल्यवर्धित उत्पादने विकसित करणे आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले. खतांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करण्यासाठी नैसर्गिक शेतीची क्षमता देखील त्यांनी अधोरेखित केली.

चौहान यांनी साखर मूल्य साखळीभोवतीच्या समस्यांची दखल घेतली आणि सांगितले की शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे उशिरा मिळत असल्याच्या तक्रारी खऱ्या आहेत. साखर कारखान्यांच्या स्वतःच्या समस्या आहेत , परंतु पैसे उशिरा मिळाल्यास शेतकरी तोट्यात राहतात. त्यांनी कृषी कामगारांच्या अनुपलब्धतेकडेही लक्ष वेधले आणि ऊस तोडणीचे श्रम कमी करण्यासाठी प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीसह यांत्रिकीकरणात नवसंशोधन करण्याचा सल्ला दिला.
"मी आयसीएआरला ऊस संशोधनासाठी एक स्वतंत्र पथक स्थापन करण्याची विनंती करतो, ज्यामध्ये व्यावहारिक मुद्द्यांवर लक्ष दिले जाईल. संशोधन शेतकरी आणि उद्योग दोघांसाठीही फायदेशीर असायला हवे. ज्या संशोधनाचा शेतकऱ्यांना उपयोग नाही ते संशोधन निरर्थक आहे," असे ते म्हणाले.
चर्चासत्रात आयसीएआरचे महासंचालक आणि डीएआरईचे सचिव डॉ. एम.एल. जाट यांनी निरीक्षण नोंदवले की उसासाठी जास्त प्रमाणात पाणी आणि खताची आवश्यकता असते. पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी अनेक अभ्यास केले गेले आहेत आणि महाराष्ट्रात अवलंबण्यात येणाऱ्या सूक्ष्म सिंचन पद्धती आशादायक उपाय देतात. सध्या होत असलेला खतांचा वापर अकार्यक्षम आहे आणि खतांची कार्यक्षमता सुधारणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले .

आयसीएआरमधील पीक विज्ञान उपमहासंचालक डॉ. देवेंद्र कुमार यादव यांनी आश्वासन दिले की शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी चर्चासत्रातील शिफारशींचा काळजीपूर्वक विचार केला जाईल.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2173313)
Visitor Counter : 7