संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोरोक्को मधील भारतीय समुदायाशी साधला संवाद, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने दाखवलेला संयम आणि दृढनिश्चय केला अधोरेखित
Posted On:
22 SEP 2025 4:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 21 सप्टेंबर 2025 रोजी मोरोक्कोमधील रबात येथे भारतीय समुदायाशी संवाद साधला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान सशस्त्र दलांनी केलेल्या धाडसी निर्णायक कृतीचे भारतीय समुदायाने यावेळी कौतुक केले. पहलगाम येथील निरपराध भारतीयांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर सशस्त्र दले पूर्णपणे सज्ज होती आणि या हल्ल्याला प्रतिसाद देण्याचा दृष्टीने त्यांना संपूर्ण अधिकार बहाल केले होते याचा पुनरुच्चार राजनाथ सिंह यांनी केला. भारतीय सैन्यांनी दिलेला प्रतिसाद संयमित आणि आवश्यक तेवढाच होता असे सांगून ते म्हणाले की "आम्ही धर्म नव्हे तर कर्म पाहून उत्तर दिले आहे ” राष्ट्राच्या दृढ परंतु संयमी दृष्टिकोनाचे वर्णन करण्यासाठी त्यांनी रामचरितमानसचा दाखला दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या दशकभरात भारताने बहुआयामी प्रगती साध्य केली असल्याचे त्यांनी भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींशी झालेल्या संवादात सांगितले. जागतिक आणि भूराजकीय आघाडीवर असंख्य आव्हाने असूनसुद्धा भारत एक झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येत असून जगातील समृद्ध अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत भारताने 11 व्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली असून लवकरच भारतीय अर्थव्यवस्था जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवण्यासाठी सज्ज आहे, असे ते म्हणाले.
संरक्षणमंत्र्यांनी भारताचे डिजिटल परिवर्तन, ज्ञानाच्या अर्थव्यवस्थेतील जलद प्रगती आणि देशात दशकापूर्वी असलेल्या 18 युनिकॉर्नवरून आज 118 पर्यंत झालेल्या वृद्धीचा उल्लेख करुन स्टार्टअप्समधील वाढीवर प्रकाश टाकला. भारताच्या संरक्षण उद्योगांनी 1.5 लाख कोटी रुपयांच्या उत्पादनाचा टप्पा गाठला असून 100 हून अधिक देशांमध्ये संरक्षण उत्पादनांची 23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निर्यात केली आहे, असे सांगून त्यांनी या उद्योगाने साध्य केलेल्या लक्षणीय प्रगतीला अधोरेखित केले. भारतीय समुदायाचे अथक परिश्रम, समर्पण वृत्ती आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळे जगभरात भारतीय चारित्र्याचे सामर्थ्य दर्शवते, असे सांगत त्यांनी भारतीय समुदायाचे कौतुक केले. मजबूत आर्थिक पाया आणि वाढत्या लष्करी सामर्थ्यावर रुजलेल्या भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेबद्दल भारतीय समुदायाच्या सदस्यांनी अभिमान व्यक्त केला.

* * *
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169627)