संरक्षण मंत्रालय
नौदल प्रमुख श्रीलंकेच्या दौऱ्यावर
Posted On:
22 SEP 2025 9:15AM by PIB Mumbai
नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी आजपासून 25 सप्टेंबरपर्यंत चार दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर जात आहेत.
आपल्या दौऱ्यात नौदलप्रमुख श्रीलंकेच्या पंतप्रधान डॉ. हरिनी अमरसुरिया यांची भेट घेणार आहेत. तसेच श्रीलंकेच्या तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख आणि सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संरक्षण सहकार्यविषयक व्यापक पैलूंवर द्विपक्षीय चर्चा करतील, यामध्ये सागरी सुरक्षा, क्षमता वृद्धी, प्रशिक्षण आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सर्व पैलू निश्चित करणे इत्यादी मुद्द्यांचा समावेश असेल.
याशिवाय 'बदलत्या गतिमानतेच्या पार्श्वभूमीवर हिंदी महासागराचा सागरी दृष्टिकोन' या विषयावर कोलंबो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सागरी परिषद 2025 च्या 12 व्या आवृत्तीतदेखील ते सहभागी होणार आहेत.
वार्षिक संरक्षण संवाद, कर्मचारी संवाद, भारत - श्रीलंका संयुक्त नौदल सराव (SLINEX), पॅसेज सराव, प्रशिक्षण आणि जलविज्ञान देवाणघेवाण अशा उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय नौदल नियमितपणे श्रीलंकेच्या नौदलाच्या संपर्कात असते. याशिवाय दोन्ही देशांचे नौदल, महासागर नौदल परिषद, गॅले संवाद, मिलान, गोवा सागरी परिषद, कोलंबो सुरक्षा परिषद अशा बहुविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात
नौदलप्रमुखांचा दौरा श्रीलंकेबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत करण्यावर भर देणारा आणि सामायिक धोरणात्मक आणि सागरी हितसंबंध यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये आकलनवृद्धीवर भर देणारा असेल, जो 'महासागर' च्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. या भेटीमुळे परस्परांविषयी आदर, सागरी विश्वास आणि हिंद महासागर क्षेत्रातील शांतता आणि स्थिरतेसाठी सामायिक दृष्टिकोनावर आधारित काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरलेल्या भारत-श्रीलंका संबंधांना पुन्हा एकदा उजाळा मिळेल.

***
ShilpaPophale/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169499)