पंतप्रधान कार्यालय
मॉरिशसच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या बँक्वेट डिनरमध्ये पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
12 MAR 2025 6:15AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2025
महामहिम, पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम जी,
श्रीमती वीणा रामगुलाम जी,
उपपंतप्रधान पॉल बेरेन्जर जी,
मॉरिशसचे माननीय मंत्री
उपस्थित बंधू-भगिनींनो,
सर्वांना माझा नमस्कार आणि ‘बोंजूर’!
सर्वप्रथम, मी पंतप्रधानांच्या भावपूर्ण आणि प्रेरणादायी विचारांबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या भव्य स्वागतासाठी आणि आदरातिथ्यासाठी मी मॉरिशसचे पंतप्रधान, त्यांचे सरकार आणि येथील जनतेचा आभारी आहे. मॉरिशसचा दौरा हा प्रत्येक भारतीय पंतप्रधानांसाठी नेहमीच खास असतो. हा केवळ एक राजकीय दौरा नसून, जणू कुटुंबाला भेटण्याचा प्रसंग आहे. अशी आपुलकी मला मॉरिशसच्या भूमीवर पाऊल ठेवल्यापासूनच जाणवले.
मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनासाठी मला पुन्हा एकदा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करणे, हा मी माझा सन्मान समजतो. या शुभप्रसंगी, मी 140 कोटी भारतीयांच्या वतीने तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
पंतप्रधान म्हणाले,
मॉरिशसच्या जनतेने तुम्हाला चौथ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडले आहे आणि गेल्या वर्षी भारतातील जनतेने मला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली. आपल्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यासोबत या कार्यकाळात काम करण्याची संधी मिळणे, हा मी एक सुखद योगायोग मानतो. भारत-मॉरिशस संबंधांना नव्या उंचीवर नेण्याचे सौभाग्य आपल्याला लाभले आहे.
आपली भागीदारी केवळ ऐतिहासिक संबंधांपुरती मर्यादित नाही, तर ती समान मूल्ये, परस्पर विश्वास आणि उज्ज्वल भविष्याच्या समान दृष्टीवर आधारित आहे. तुमच्या नेतृत्वाने आपल्या संबंधांना नेहमीच मार्गदर्शन केले आहे आणि बळकटी दिली आहे. या नेतृत्वाखाली आपली भागीदारी सर्वच क्षेत्रांमध्ये विस्तारत आहे. मॉरिशसच्या विकासाच्या प्रवासात एक विश्वासू भागीदार असल्याचा भारताला अभिमान आहे. आपण एकत्रितपणे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम करत आहोत, ते मॉरिशसच्या कानाकोपऱ्यात प्रगतीचा एक अमिट ठसा उमटवत आहेत. नैसर्गिक आपत्ती असो वा कोविडसारखी महामारी, प्रत्येक आव्हानात्मक क्षणी आपण एका कुटुंबाप्रमाणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत.
मित्रांनो,
मॉरिशस हा आमचा जवळचा सागरी शेजारी आणि हिंद महासागर क्षेत्रातील एक प्रमुख भागीदार आहे. माझ्या मागील मॉरिशस दौऱ्यात मी 'सागर' (SAGAR) व्हिजनचा उल्लेख केला होता, त्याच्या केंद्रस्थानी प्रादेशिक विकास, सुरक्षा आणि सामायिक समृद्धी आहे. आमचा ठाम विश्वास आहे की 'ग्लोबल साऊथ'मधील देशांनी एकत्र येऊन एकजुटीने आवाज उठवला पाहिजे. याच भावनेने, आम्ही आमच्या जी20 अध्यक्षपदाच्या काळात 'ग्लोबल साऊथ'ला प्राधान्य दिले आणि मॉरिशसला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले.
मित्रांनो,
मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे, जगात भारतावर कोणत्या देशाचा हक्क असेल, तर तो मॉरिशसचा आहे. आपल्या संबंधांना कोणतीही मर्यादा नाही. भविष्यात, आपण आपल्या लोकांच्या समृद्धीसाठी आणि संपूर्ण प्रदेशाच्या शांतता आणि सुरक्षेसाठी सहकार्य करत राहू.
याच भावनेसह, आपण सर्व मिळून पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम आणि श्रीमती वीणा जी यांच्या उत्तम आरोग्यासाठी, मॉरिशसच्या लोकांच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी आणि भारत-मॉरिशसच्या मैत्रीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देऊया.
जय हिंद!
व्हिव्ह मॉरिस! (मॉरिशस चिरायू होवो!)
* * *
सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169476)
Visitor Counter : 3
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam