आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
स्वस्थ नारी शक्ती परिवार अभियानामध्ये देशभरातील जनतेचा मोठ्या प्रमाणावर सहभाग
अभियानांतर्गत 2.83 लाखाहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित; देशभर 76 लाखांहून अधिक नागरिकांची उपस्थिती
Posted On:
21 SEP 2025 6:53PM by PIB Mumbai
17 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झालेले ` स्वस्थ नारी शक्ती परिवार` अभियानात देशभर लोकांचा उत्साही प्रतिसाद पाहायला मिळत आहे. लाखो महिला, बालके आणि कुटुंबांना या अंतर्गत सर्वसमावेशक आरोग्य सेवा लाभत आहेत.
20 सप्टेंबर 2025 पर्यंत अभियानांतर्गत 2.83 लाखाहून अधिक आरोग्य शिबिरे (तपासणी व विशेषज्ञ शिबिरे) आयोजित केली गेली असून, राष्ट्रीय पातळीवर 76 लाखांहून अधिक नागरिकांनी हजर राहून सेवा घेतल्या आहेत.

प्रमुख ठळक मुद्दे:
- उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी: 37 लाखांहून अधिक नागरिकांची उच्च रक्तदाबासाठी आणि 35 लाखांहून अधिक नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी करण्यात आली.
- कर्करोग तपासणी : 9 लाखांहून अधिक महिलांची स्तन कर्करोगासाठी आणि 4.7 लाखांहून अधिक महिलांची गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी चाचणी करण्यात आली. तोंडाच्या कर्करोगाची तपासणी 16 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली.
- मातृ आणि शिशू आरोग्य: 18 लाखांहून अधिक गर्भवती महिलांच्या पूर्व तपासण्या केल्या गेल्या, तर 51 लाखांहून अधिक मुलांना जीवनरक्षक लस देण्यात आल्या.
- रक्तक्षय आणि पोषण: 15 लाखांहून अधिक लोकांची रक्ताल्पता तपासणी करण्यात आली. पोषण सल्ला सत्रांचा लाभ लाखो कुटुंबांपर्यंत पोहोचला.
- क्षयरोग आणि सिकल सेल तपासणी: 22 लाखांहून अधिक नागरिकांची टीबीसाठी आणि 2.3 लाखांहून अधिक लोकांची सिकल सेल आजारासाठी तपासणी करण्यात आली.
- रक्तदान आणि पीएम-जेएवाय : 1.6 लाखांहून अधिक रक्तदात्यांनी नोंदणी केली, तसेच 4.7 लाख नवीन आयुष्मान/ पीएम-जेएवाय पत्र देण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य शिबिरे तसेच आयुष्मान आरोग्य मंदिरे, एआयआयएमएस, इतर राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था (आयएनआयएस), तृतीयक देखभाल रूग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी संस्था यांनीही या राष्ट्रीय मोहिमेचा उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. या संस्थांनी हजारो विशेष शिबिर आयोजित करून लाभार्थ्यांना प्रगत तपासणी, रोगनिदान , सल्ला आणि उपचार सेवा दिल्या. यामुळे राज्य सरकार व समुदाय पातळीवरील आरोग्य कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांची पूरकता झाली आहे.
केंद्रातील सरकारी संस्थांनी, वैद्यकीय महाविद्यालयांनी आणि खासगी संस्थांनी एकत्रितपणे 3,410 तपासणी व विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित केली असून त्यातून 5.8 लाखांहून अधिक नागरिकांना लाभ झाला आहे.


प्रादेशिक ठळक मुद्दे
हे अभियान राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात जनआंदोलन म्हणून साजरे केले जात आहे:
दिल्ली: सफदरजंग हॉस्पिटल, सीजीएचएस आरके पुरम आणि आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये मेगा आरोग्य शिबिरे आयोजित केली गेली. यात टीबी, एनसीडी, मानसिक आरोग्य आणि मातृत्व तपासणी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
गुजरात: दाहोद, कच्छ आणि नवसारी येथे आयोजित शिबिरांमध्ये कर्करोग तपासणी आणि एनसीडी उपचार देऊन थेट 42,000 पेक्षा जास्त महिलांना याचा फायदा झाला.
जम्मू आणि काश्मीर: श्रीनगर आणि आरएस पुरा येथे भव्य आरोग्य शिबिरांमध्ये सेवा पंधरवड्यांतर्गत मोठी समुदायाची उपस्थिती अनुभवण्यात आली.
ईशान्य प्रदेश : अरुणाचलच्या पापुम पारेपासून मणिपूरच्या इम्फाळपर्यंत, अभियानाने दुर्गम आदिवासी समुदायांपर्यंत मोफत आरोग्य तपासण्या आणि जनजागृती मोहिम पोहोचवल्या.
गोवा व महाराष्ट्र: प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि पंचायतींनी फेरी, तपासणी शिबिरे आणि रक्तदान शिबिरे आयोजित केली, ज्यात स्थानिक समुदायाने सक्रीय सहभाग घेतला.
बिहार व उत्तर प्रदेश: जिल्हा रुग्णालये आणि आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये हजारो लोकांना एनसीडी तपासणी आणि मातृ आरोग्य सेवांचा लाभ मिळाला.
लडाख: लिंग्शेड या दुर्गम गावात शिबिरे आयोजित करून सर्वसाधारण सल्ला, मोतीबिंदू तपासणी आणि मासिक स्वच्छतेविषयक जागरूकता सत्रे घेण्यात आली.


***
शैलेश पाटील / नितीन गायकवाड / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2169346)
Visitor Counter : 21