पंतप्रधान कार्यालय
भारत-मॉरीशस यांच्यातर्फे पत्रकारांसाठी संयुक्त निवेदन जारी करताना पंतप्रधानांनी जारी केलेले निवेदन
Posted On:
12 MAR 2025 3:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2025
माननीय पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगुलाम जी,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
प्रसारमाध्यमांमध्ये कार्यरत सहकारी,
नमस्कार, बोंजूर !!
140 कोटी भारतीयांच्या वतीने मी मॉरीशसच्या सर्व नागरिकांना राष्ट्रीय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.मला पुन्हा एकदा मॉरीशसच्या राष्ट्रीय दिनी येथे येण्याची संधी मिळाली आहे ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. यासाठी मी पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलामजींचे तसेच मॉरीशस सरकारचे आभार मानतो.
मित्रांनो,
भारत आणि मॉरीशस यांच्यातील नाते केवळ हिंदी महासागरामुळे निर्माण झालेले नाते नाही तर ते नाते आमच्या देशांची सामायिक संस्कृती, परंपरा आणि मूल्यांशी देखील जोडलेले आहे. आपण आर्थिक तसेच सामाजिक प्रगतीच्या मार्गावर परस्परांचे सहचर आहोत. नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोविडचे संकट, आपण नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. संरक्षण क्षेत्र असो किंवा शिक्षण क्षेत्र, आरोग्य असो किंवा अंतराळ क्षेत्र, आम्ही प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून मार्गक्रमण करत आहोत. गेल्या दहा वर्षांत आम्ही आमच्या नात्यामध्ये नवे आयाम जोडले आहेत. विकासविषयक सहयोग आणि क्षमता निर्मितीमध्ये नवे विक्रम घडवले आहेत. मॉरीशसमध्ये गतीशीलतेसाठी मेट्रो एक्स्प्रेस, न्यायदानासाठी सर्वोच्च न्यायालयाची इमारत, सुखकर प्रवासासाठी सामाजिक निवास, उत्तम आरोग्यासाठी कान-नाक-घसा रुग्णालय, व्यापार आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी युपीआय तसेच रुपे कार्ड, स्वस्त दरातील उत्तम दर्जाच्या औषधांसाठी जनौषधी, असे अनेक लोक-केंद्री उपक्रम आम्ही कालबद्ध रीतीने पूर्ण केले आहेत. ‘अगालेगा’ मध्ये उत्तम दळणवळण यंत्रणा असल्यामुळे ‘चिदो’ चक्रीवादळामुळे प्रभावित लोकांपर्यंत मानवतावादी मदत वेगाने पोहोचवता आली. यातून अनेक लोकांचे प्राण वाचवता आले. आत्ताच आम्ही ‘काप मालेरे’ भागातील आरोग्य केंद्र तसेच वीस समुदाय विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. थोड्या वेळाने पंतप्रधानजींसोबत “अटल बिहारी वाजपेयी सार्वजनिक सेवा आणि नवोन्मेष केंद्रा’चे देशार्पण करण्याचे भाग्य मला लाभणार आहे.
मित्रांनो,
आज पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम आणि मी मिळून भारत-मॉरीशस भागीदारीला ‘सुधारित धोरणात्मक भागीदारी’चा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. आम्ही असे ठरवले आहे की मॉरीशस मध्ये संसदेची नवी इमारत उभारण्यासाठी भारताचे सहकार्य करेल. लोकशाहीच्या मातेतर्फे हा मॉरीशसला देण्यात येणारा उपहार असे. मॉरीशसमध्ये 100 किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीच्या आधुनिकीकरणासाठी देखील काम सुरु केले जाईल. समुदाय विकास प्रकल्पांच्या दुसऱ्या टप्प्यात 500 दशलक्ष मॉरिशियन रुपये खर्चाचे नवे प्रकल्प सुरु करण्यात येतील. येत्या 5 वर्षांमध्ये मॉरीशसच्या नागरी सेवेतील 500 अधिकाऱ्यांना भारतात प्रशिक्षण देण्यात येईल. दोन्ही देशांदरम्यान स्थानिक चलनात व्यापारासंदर्भातील करार करण्यावर देखील आम्ही सहमत झालो आहोत.
मित्रांनो,
संरक्षण क्षेत्रातील सहयोग आणि सागरी सुरक्षा आमच्या धोरणात्मक भागीदारीचा महत्त्वाचा भाग आहेत याबाबत पंतप्रधानजी आणि माझे एकमत आहे. हिंदी महासागर क्षेत्र मुक्त, खुले, सुरक्षित आणि निर्धोक करण्याला आमचे सामायिक प्राधान्य आहे. आम्ही मॉरीशसच्या वैशिष्ट्यपूर्ण आर्थिक विभागाच्या संरक्षणात संपूर्ण सहयोग देण्यासाठी वचनबद्ध आहोत. या संदर्भात तटरक्षक दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य करण्यात येईल. मॉरीशस मध्ये पोलीस अकादमी तसेच राष्ट्रीय सागरी माहिती सामायीकीकरण केंद्राच्या स्थापनेसाठी भारत मदत करेल. व्हाईट शिपिंग, नील अर्थव्यवस्था आणि हायड्रोग्राफी या विषयांच्या संदर्भातील सहयोग बळकट केला जाईल. चागोसच्या संदर्भात मॉरीशसच्या सार्वभौमत्वाचा आम्ही संपूर्ण आदर करतो. कोलंबो सुरक्षा बैठक, हिंद महासागर रिम संघटना तसेच हिंद महासागर परिषद यांसारख्या मंचाच्या अंतर्गत आम्ही सहयोगात वाढ करू.
मित्रांनो,
आपल्या दोन्ही देशांतील जनतेचे परस्परांशी असलेले उत्तम संबंध आपल्या भागीदारीला बळकट पाया प्रदान करतात. डिजिटल आरोग्य, आयुष केंद्रे, शालेय शिक्षण, कौशल्य विकास तसेच दळणवळण या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांतील सहयोग वाढवण्यात येईल. आम्ही मानवाच्या विकासात एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डीपीआय म्हणजेच डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यांचा वापर करून घेण्यासाठी एकत्र येऊन काम करु. मॉरीशसमधील लोकांसाठी भारतात चार धाम यात्रा तसेच रामायण ट्रेल करताना विशेष सोयीसुविधा दिल्या जातील. गिरमिट वारशाचे संरक्षण तसेच संवर्धन करण्यावर अधिक भर दिला जाईल.
मित्रांनो,
जगाच्या दक्षिणेकडील देश असोत, हिंदी महासागर असो अथवा आफ्रिकेचा भूभाग असो, मॉरीशस देश प्रत्येक बाबतीत आमचा महत्त्वाचा मित्र देश आहे. दहा वर्षांपूर्वी, येथे मॉरीशस मध्येच सागर संकल्पनेची, म्हणजेच “या क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षितता आणि वृद्धी”ची कोनशीला रचण्यात आली होती.या संपूर्ण क्षेत्राचे स्थैर्य आणि समृद्धी मिळवण्यासाठी आम्ही सागर संकल्पनेच्या धर्तीवर काम सुरु केले. आज याच संकल्पनेला पुढे नेत मी सांगू इच्छितो की जगाच्या दक्षिणेकडील देशांसाठी आमचे ध्येय, सागर संकल्पनेच्याही पुढे जाऊन महासागर म्हणजेच “या संपूर्ण प्रदेशांमध्ये सुरक्षितता आणि विकासासाठी परस्पर लाभदायक आणि समग्र प्रगती” असेल. यामध्ये विकासासाठीचा व्यापार, सातत्यपूर्ण वृद्धीसाठी क्षमता निर्मिती तसेच सामायिक भविष्यासाठी परस्परांचे संरक्षण यांचा समावेश आहे. याअंतर्गत तंत्रज्ञानाचे सामायीकीकरण, सवलतीच्या दरातील कर्ज तसेच अनुदान यांच्या माध्यमातून सहयोग देण्यात येईल.
महोदय,
मॉरीशसमध्ये झालेल्या स्नेहपूर्ण स्वागतासाठी मी तुमचे तसेच मॉरीशसच्या लोकांचे पुन्हा एकदा हार्दिक आभार मानू इच्छितो. मी तुम्हाला भारतभेटीवर येण्याचे निमंत्रण देत आहे. भारतात तुमचे स्वागत करण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहू.
खूप खूप धन्यवाद !
* * *
सोनल तुपे//संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168705)
Visitor Counter : 9
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam