कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषी क्षेत्रातील यंत्रसामग्रीसाठीच्या वस्तू आणि सेवा करातील सुधारणांची माहिती देण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन


कृषी यांत्रिकीकरण संघटनांच्या प्रतिनिधींनी जीएसटी दरांतील कपातीचे स्वागत केले

“जीएसटी सुधारणानंतर, शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कृषी यंत्रसामग्री आणि ट्रॅक्टर्स स्वस्त झाले आहेत” - केंद्रीय मंत्री शिवराज सिंह

“शेतकऱ्यांपर्यंत थेटपणे लाभ पोहोचणे सुनिश्चित करण्यासाठी उत्पादकांनी मध्यस्थांना टाळले पाहिजे”- केंद्रीय मंत्री चौहान

Posted On: 19 SEP 2025 5:48PM by PIB Mumbai

 

वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांपैकी कृषी यंत्रसामग्रीसाठी झालेल्या सुधारणांची चर्चा करण्यासाठी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. ट्रॅक्टर आणि यांत्रिकीकरण संघटना (टीएमए)कृषी यंत्रसामग्री उत्पादक संघटना (एएमएमए)अखिल भारतीय एकत्रित उत्पादक संघटना (एआयसीएमए) तसेच भारतीय पॉवर टिलर संघटना (पीटीएआय) यांच्या प्रतिनिधींसह इतर अनेकांनी या बैठकीत प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने भाग घेतला.

या बैठकीनंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना केंद्रीय मंत्री चौहान यांनी जीएसटी दरांमध्ये कपात केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आणि बैठकीतील चर्चेचे तपशील उपस्थितांना सांगितले. कृषी यंत्रसामग्रीवर आधी 12% आणि 18% जीएसटी होता तो आता कमी करून 5% करण्यात आला असून येत्या सोमवारपासून म्हणजेच 22 सप्टेंबर पासून नवा दर लागू होणार आहे. शेतकऱ्यांना या कपातीचा थेट लाभ मिळेल असे ते म्हणाले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ  सुनिश्चित करण्याची शपथ घेतली आहे आणि त्यासाठी उत्पादकता वाढवण्यासोबतच खर्च कमी करण्याची गरज आहे आणि हे दोन्ही साध्य करण्यासाठी यांत्रिकीकरण करणे महत्त्वाचे आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले कीया  बैठकीदरम्यान यंत्रे उत्पादक संघटनांच्या सर्व प्रतिनिधींना असे निर्देश देण्यात आले आहेत की 22 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या जीएसटी दरांच्या कपातीचा  थेट लाभ संपूर्ण पारदर्शकतेसह शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. चौहान म्हणाले की जीएसटी दरांतील कपात हे महत्त्वाचे पाऊल असून त्याचा विस्तृत परिणाम बघायला मिळेल. नंतरलक्षणीय दर कपातीकडे सर्वांचे लक्ष वेधतते म्हणाले:

  • 35 अश्वशक्तीचा  ट्रॅक्टर आता 41,000 रुपयांनी स्वस्त होईल.
  • 45 अश्वशक्तीचा  ट्रॅक्टर आता  45,000 रुपयांनी स्वस्त होईल.
  • 50 अश्वशक्तीचा  ट्रॅक्टर आता  53,000  रुपयांनी स्वस्त होईल.
  • 75 अश्वशक्तीचा  ट्रॅक्टर आता  63,000 रुपयांनी स्वस्त होईल.

अगदी बागकामासाठी तसेच बेणणीसाठी वापरले जाणारे छोटे ट्रॅक्टर्स देखील आता स्वस्त होतील. चार रांगांचे भात लावणी  यंत्र आता 15,000 रुपयांनी स्वस्त होईल तर विविध पिकांसाठी वापरले जाणारे प्रती तास  टनांचे मळणी यंत्र 14,000 रुपयांनी स्वस्त होणार आहे. 13 अश्वशक्तीच्या पॉवर टिलरची किंमत देखील 11,875 रुपयांनी कमी होईल.

याव्यतिरिक्तकिमतीमध्ये आणखी झालेली काही घट खाली नमूद केली आहे:

  • विद्युत तणनाशक यंत्र (7.5 अश्वशक्ती): ₹5,495 ने स्वस्त
  • मालवाहू वाहन ट्रेलर  (5-टन क्षमता): ₹10,500 ने स्वस्त
  • बी पेरणी आणि खत यंत्र (11 फाळ): ₹3,220 ने स्वस्त
  • बी पेरणी आणि खत यंत्र (13 फाळ): ₹4,375 ने स्वस्त
  • मळणी कापणी पट्टी यंत्र (14 फूट): ₹1,87,500 ने स्वस्त
  • पेंढा संकलक यंत्र (फूट): ₹21,875 ने स्वस्त
  • सुपर सीडर (फूट): ₹16,875 ने स्वस्त
  • हॅपी सीडर (10 फाळ): ₹10,625 ने स्वस्त
  • फिरता नांगर (फूट): ₹7,812 ने स्वस्त
  • चौकोनी गाठणी यंत्र (फूट): ₹93,750 ने स्वस्त
  • मल्चर (फूट): ₹11,562 ने स्वस्त
  • हवेच्या दाबा आधारे चालणारे पेरणी यंत्र (4-रांगा): ₹32,812 ने स्वस्त
  • ट्रॅक्टरवर  बसवलेले फवारणी यंत्र (400-लिटर क्षमता): ₹9,375 ने स्वस्त

​शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने सरकार या लाभांविषयीची माहिती अनेकविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

​आता यामुळे कस्टम हायरिंग सेंटर्सना (उपकरणे भाड्यावर देणारी केंद्र) कमी किमतीत यंत्रसामग्री मिळू शकेल. यामुळे त्यांनीही शेतकऱ्यांना परवडण्याच्या दृष्टीने भाड्याचे दर कमी करावेत असे आवाहनही त्यांनी केले.

​रब्बी पिकांसाठी येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विकसित कृषी संकल्प अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यापासून वस्तू आणि सेवा कर दर कपातीची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकरी या लाभांचा आधुनिक शेतीसाठी योग्यरित्या उपयोग करून घेऊ शकतील असे ते म्हणाले.

​कृषी यांत्रिकीकरणाला बळकटी देण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील, त्यादृष्टीने भविष्यात योजना तयार करताना उत्पादक संघटनांकडून मिळालेल्या सूचनांचा विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. संघटनेच्या प्रतिनिधींनी मध्यस्थांची भूमिका कमी करावी आणि वस्तू आणि सेवा कर सुधारणांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याची सुनिश्चिती करावी असे आवाहनही त्यांनी केले.

​यावेळी यंत्रसामग्री संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. कृषी मंत्र्यांनी केलेल्या सूचनांचे प्रामाणिकपणे पालन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपली वचनबद्धताही पुन्हा व्यक्त केली. या बैठकीनंतर, चौहान यांनी उपस्थितांसोबत वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेतला आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी काम करण्याच्या केंद्र सरकारचा संकल्पही पुन्हा एकदा व्यक्त केला.

​या बैठकीला कृषी सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. 

वस्तू आणि सेवा कर दरांमध्ये कपात केल्यानंतर, कृषी क्षेत्राशी संबंधित उपकरणांच्या नवीन किमतीविषयी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

 

निलीमा चितळे/संजना चिटणीस/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

(Release ID: 2168610)