सांस्कृतिक मंत्रालय
भारतातील 7 नैसर्गिक वारसा स्थळांचा युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश
Posted On:
18 SEP 2025 9:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2025
भारताचा समृद्ध नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपत त्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या बाबतीत भारताने सातत्यपूर्ण प्रगती कायम राखली आहे. याच मालिकेअंतर्गत देशभरातील सात विलोभनीय नैसर्गिक वारसा स्थळांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा संभाव्य यादीत समावेश करून घेण्यात भारताला यश आले आहे. हा संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. यामुळे आता या संभाव्य यादीत समावेश झालेल्या भारतातील स्थळांची संख्या 62 वरून 69 झाली आहे.
या सात नव्या स्थळांच्या समावेशानंतर, आता युनेस्कोच्या विचाराधीन असलेल्या भारतातील एकूण 69 स्थळांमध्ये 49 सांस्कृतिक, 17 नैसर्गिक आणि 3 मिश्र वारसा स्थळांचा समावेश आहे. या यशातून भारताची आपल्या अद्वितीय नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या आणि त्याला प्रोत्साहन देण्याच्या अतूट वचनबद्धताही ठळकपणे अधोरेखित झाली आहे.
युनेस्कोच्या नियमांनुसार, कोणत्याही स्थळाचा प्रतिष्ठेच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होण्याकरता नामनिर्देशीत करण्यासाठी त्या स्थळाचा संभाव्य यादीत समावेश झालेला असणे ही पूर्वअट असते.
संभाव्य यादीत समाविष्ट केलेल्या नवीन स्थळांविषयी माहिती :
डेक्कन ट्रॅप्स, पाचगणी आणि महाबळेश्वर, महाराष्ट्र : हे जगातील काही सर्वोत्तम स्थितीत संवर्धित केले गेलेले आणि मोठ्या प्रमाणावर संशोधन केल्या गेलेल्या लाव्हा रसांच्या प्रवाहांचे ठिकाण आहे. हा लाव्हा रसाच्या प्रवाहाने तयार झालेल्या दिसणाऱ्या दख्खनच्या विस्तीर्ण क्षेत्राचा भाग आहे. हे स्थळ या आधीपासूनच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या कोयना वन्यजीव अभयारण्याच्या अंतर्गत येते.
सेंट मेरी बेट समूहाचा भूवैज्ञानिक वारसा, कर्नाटक : हा बेट समूह दुर्मिळ स्तंभाच्या आकारासारख्या बेसाल्ट खडकांच्या संरचनेसाठी प्रसिद्ध आहे. हा बेट समूह सुमारे 85 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या क्रिटेशियस युगाच्या उत्तरार्धापासून अस्तित्वात असून, इथे आपल्याला त्या काळातील भूवैज्ञानिक स्थितीचे दर्शन घडते.
मेघालयन युगातील गुफा, मेघालय : या मेघालयातील अद्भुत संरचनेच्या गुफा आहेत. यांपैकी विशेषतः मावम्लुह गुंफा ही होलोसीन काळाअंतर्गत मेघालयन युगाच्या बाबतीत, हवामान आणि भूवैज्ञानिक दृष्टीने झालेल्या महत्त्वाच्या बदलांविषयीची स्थिती समजून घेण्याकरता जागतिक संदर्भांचे केंद्र म्हणून महत्वाचे स्थळ आहे.
नागा हिल ओफिओलाइट, नागालँड : या टेकड्यांचा परिसर म्हणजे ओफिओलाइट खडकांनी व्यापलेले एक दुर्मिळ क्षेत्र आहे. या टेकड्या म्हणजे भूगर्भीय भूकवचावरून वर उचलल्या गेलेले सागरी भुपृष्ठीय स्तर आहेत. यातून आपल्याला टेक्टोनिक प्रक्रिया आणि समुद्राच्या मधोमध असलेल्या पर्वतरांगांच्या विविधांगी पैलुंविषयी सखोल माहिती मिळते.
एर्रा मट्टी दिबबलु (लाल वाळूच्या टेकड्या), आंध्र प्रदेश: विशाखापट्टणमजवळच्या या विलोभनीय लाल वाळूच्या संरचना आहेत. या अद्वितीय संरचनांमधून आपल्याला पृथ्वीच्या हवामानाचा इतिहास आणि बहुआयामी उत्क्रांतीचा पट उलगडणारी प्राचीन युगातील हवामान आणि किनारी भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये समजून घेता येतात.
तिरुमला टेकड्यांचा नैसर्गिक वारसा, आंध्र प्रदेश : या स्थळाच्या क्षेत्रात इपार्कीअन विसंगती, म्हणजेच दोन वेगवेगळ्या युगांतील खडकांचे एकमेकांना चिकटून असलेले थर आढळतात. यासोबतच इथे अद्वितीय सिलथोरनम अर्थात नैसर्गिक कमानीच्या संरचनाही दिसून येतात. हे भूवैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या संरचनांमधून आपल्याला पृथ्वीच्या 1.5 अब्ज वर्षांपेक्षा जुन्या इतिहासाचे दर्शन होते.
वर्कला कडे, केरळ : केरळच्या किनारपट्टीवरील हे निसर्गरम्य कडे मिओ प्लीओसीन युगातील डोंगर कड्यांच्या रचना आहेत. या रचना वारकल्ली फॉर्मेशन म्हणूनही ओळखल्या जातात. या क्षेत्रात आपल्याला वैज्ञानिक आणि पर्यटन अशा दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेल्या असंख्य नैसर्गिक झऱ्यांचे तसेच नैसर्गिकरीत्या धूप आणि झीज होऊन तयार झालेल्या भूसंरचनांचेही दर्शन घडते.
जागतिक वारसा जपण्यासाठी भारताची वचनबद्धता
या सात स्थळांचा संभाव्य वारसा स्थळांच्या यादीत झालेला समावेश हा जागतिक वारसा यादीसाठी भविष्यातील नामनिर्देशनाच्या अनुषंगाने भारतासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यासोबतच भारतीतील निसर्गाचा चमत्कार असलेल्या स्थळांना, अशा ठिकाणांच्या संवर्धनासाठी होत असलेल्या जागतिक प्रयत्नांसोबत जोडून घेण्याच्या बाबतीतले, भारताचे धोरणात्मक पातळीवरील गांभीर्यही यातून ठळकपणे अधोरेखित होते.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग ही भारताची जागतिक वारसा करारासाठीची समन्वयक यंत्रणा म्हणून काम करत आहे. या विभागाने भारताच्या शिफारशींचे सुनियोजित संकलन मांडून ते सादर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पॅरिसमधील युनेस्कोतील भारताच्या स्थायी प्रतिनिधींनी या प्रयत्नांसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे कौतुक केले आहे.
भारताने जुलै 2024 मध्ये नवी दिल्ली इथे जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सभेचे यशस्वी आयोजन केले होते. या सभेत 140 पेक्षा जास्त देशांचे 2000 पेक्षा जास्त प्रतिनिधी आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता.
संभाव्य जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील ही 7 स्थळे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168306)