राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मॉरिशसच्या पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेतली

Posted On: 16 SEP 2025 8:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 16 सप्टेंबर 2025

मॉरिशसचे पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज, 16 सप्टेंबर, 2025 रोजी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीसह पंतप्रधान रामगुलाम यांचा 9 ते 16 सप्टेंबर या कालावधीतील भारत दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात त्यांनी मुंबई, वाराणसी, अयोध्या तसेच तिरुपती या शहरांना भेट दिली.

राष्ट्रपती मुर्मू यांनी पंतप्रधान रामगुलाम आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे राष्ट्रपती भवनात स्वागत केले. त्या म्हणाल्या की भारताच्या ‘शेजारी देश सर्वप्रथम’, ‘महासागर संकल्पना’ तसेच जगाच्या दक्षिणेकडील देशांप्रति असलेली आमची बांधिलकी यामध्ये मॉरिशसला एक विशेष स्थान आहे.    

प्रत्येक क्षेत्रात भारत आणि मॉरिशस यांच्यातील भागीदारी तसेच सहकार्य सातत्याने वाढत आहे याची दखल घेत राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की दोन्ही देशांतील संबंध ‘वर्धित धोरणात्मक भागीदारी’ पर्यंत पोचले आहेत यातून अलीकडच्या काळात आपल्या संबंधांमध्ये झालेली ही वाढ दिसून येते.

मॉरिशसमधील सरकारच्या विकासविषयक प्राधान्यक्रमांना भारत पाठींबा देत आहे याची नोंद घेत राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला आणि नवे विशेष आर्थिक पॅकेज मॉरिशसचे सरकार तसेच जनता यांच्या गरजा पूर्ण करण्यात सक्षम ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्या म्हणाल्या की रुग्णालये, रस्ते, बंदरे विकास, संरक्षण संबंधी खरेदी आणि संयुक्त टेहळणी यांसह इतर अनेक प्रकल्प मॉरिशसमधील पायाभूत सुविधा वाढवतील आणि येत्या काही वर्षांत तेथील लोकांच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. डिजिटल तंत्रज्ञाने आणि अवकाश क्षेत्रासह इतर अनेक नव्या क्षेत्रांमध्ये देखील आता द्विपक्षीय सहकार्याचा विस्तार होत आहे असे त्या पुढे म्हणाल्या.

भारत आणि मॉरिशस या आपल्या देशांतील संबंध अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि आपला सामायिक इतिहास, भाषा, संस्कृती आणि मूल्यांमध्ये खोलवर रुजलेले आहेत हे दोन्ही नेत्यांनी मान्य केले.पंतप्रधान रामगुलाम यांच्या नेतृत्वविषयक प्रचंड अनुभवासह भारत-मॉरिशस यांचे दीर्घकालीन द्विपक्षीय संबंध येत्या काळात आणखी सशक्त होतील असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केला.


शैलेश पाटील/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2167384) Visitor Counter : 2