कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत ‘राष्ट्रीय कृषी परिषद- रबी अभियान 2025’ चे उद्घाटन
परिषदेची संकल्पना: ‘एक देश-एक कृषी क्षेत्र- एक संघ’
“आपल्या देशात अन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचा कधीही तुटवडा भासणार नाही; आपण भारताला जगाची फूड बास्केट बनवू” – केंद्रीय मंत्री शिवराज सिंह
Posted On:
15 SEP 2025 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2025
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे आयोजित दोन दिवसीय ‘राष्ट्रीय कृषी परिषद- रबी अभियान 2025’चे आज नवी दिल्लीत पुसा येथे उद्घाटन झाले. या परिषदेची ‘एक देश-एक कृषी क्षेत्र- एक संघ’ ही संकल्पना म्हणजे कृषी क्षेत्रात समन्वयित प्रयत्न आणि भागीदारीला चालना देण्याच्या दिशेने टाकलेले लक्षणीय पाऊल आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पुढाकारातून रबी परिषद प्रथमच दोन दिवसीय करण्यात आली आहे.यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह म्हणाले की आता आपल्या देशात अन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचा कधीही तुटवडा भासणार नाही आणि भारत जगाची अन्न-परडी (फूड बास्केट) होईल. देशभरातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भातील मार्गदर्शन केले.

परिषदेच्या पहिल्या दिवशी उपस्थितांना उद्देशून केलेल्या भाषणात केंद्रीय मंत्री म्हणाले की देशातील कृषी 3.7 टक्क्याने विकास पावत असून हा जगातील सर्वाधिक कृषी विकास दर आहे आणि याचे श्रेय आपले शेतकरी आणि वैज्ञानिक यांचे कठोर परिश्रम तसेच सरकारच्या शेतकरी-स्नेही धोरणांना जाते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे एकत्र आहेत आणि आपला देश, आपले लोक आणि आपल्या शेतकऱ्यांचे कल्याण सर्वात महत्त्वाचे असल्याने त्यांच्यासाठी आम्ही संपूर्ण सामर्थ्यानिशी एकत्रितपणे काम करत राहू. “भारताच्या कृषीविषयक परिदृश्यात परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी आपल्याला मिळत आहे हे आपले भाग्य आहे. आपण सामान्य माणसे नव्हेत, तर आपण देशाच्या निम्म्या लोकसंख्येच्या भाग्याला आकार देणारे आहोत.आपण अत्यंत मेहनतीने काम केले पाहिजे. शेतकरी आणि त्यांचे उत्थान हा आपला उद्देश आहे,” ते म्हणाले.

बनावट खते, बियाणे आणि कीटकनाशके यांच्या समस्येबाबत बोलताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह म्हणाले की या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल. ते पुढे म्हणाले की आता केवळ सर्व मापदंड आणि निकष पूर्ण करणाऱ्या जैवउत्तेजक पदार्थांच्या (पिकाच्या वाढीला चालना देणारे) विक्रीलाच परवानगी देण्यात येईल. “आम्ही शेतकऱ्यांचे शोषण होऊ देणार नाही. कृषी विस्ताराचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे;केंद्र सरकारच्या सहयोगासह सर्व राज्यांचे कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि सर्व संबंधित संस्थांनी ठोस कार्यक्रम आणि धोरणे तयार करावी आणि मूलभूत पातळीवर वेगाने काम करावे. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यामध्ये मूल्यवर्धन करावे.आम्हाला फक्त शेती आणि शेतकऱ्यांची चिंता असून त्यासाठी आम्ही पूर्ण समर्पणाने काम करू. याच भावनेने रबी परिषद शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी विचारविनिमय करून काम करेल,” असे मंत्री म्हणाले.
शिवराज सिंह पुढे म्हणाले की, आता हवामान लहरी झाले असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विम्याअंतर्गत आणण्याची गरज असून अधिकाऱ्यांनी हे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. "शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे राबवली पाहिजे. केंद्र आणि राज्यांच्या संयुक्त सहभागाने ऑक्टोबरमध्ये 'विकसित कृषी संकल्प अभियान' पुन्हा राबवले जाईल. आता कृषी संशोधनाने केवळ कागदपत्रे प्रकाशित करण्यावरच नव्हे तर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पूरग्रस्त भागात मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाने वेगाने काम केले पाहिजे," असे चौहान म्हणाले.
या परिषदेत केंद्र आणि राज्यांचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ, शेतकरी प्रतिनिधी आणि इतर भागधारक उपस्थित आहेत. या व्यासपीठाने धोरणकर्ते, शास्त्रज्ञ आणि राज्य प्रतिनिधींना रब्बी हंगाम 2025-26 साठी तयारी, उत्पादन लक्ष्य आणि रणनीती यावर व्यापक चर्चा करण्याची संधी प्रदान केली आहे.
निलीमा चितळे/संजना चिटणीस/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2167004)
Visitor Counter : 2