युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
दृष्टीकोनाला वाणीत आणि वाणीला प्रभावात रूपांतरित करणारे 'विकसित भारत युवा नेते संवाद' हे युवा-संचालित लोकशाहीचे खरे उदाहरण - डॉ. मनसुख मांडविया
'विकसित भारत युवा नेते संवाद' तरुण भारतीयांना असे व्यासपीठ उपलब्ध करुन देते, जिथे ते आपले विचार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडू शकतात- डॉ. मनसुख मांडविया
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी 'विकसित भारत युवा नेते संवाद' (2026) च्या दुसऱ्या आवृत्तीची केली घोषणा
Posted On:
13 SEP 2025 3:00PM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या आवाहनातून प्रेरणा घेऊन, राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 1 लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून घेण्यासाठी, राष्ट्रीय युवा महोत्सवाची पुनर्रचना 'विकसित भारत युवा नेते संवाद' (VBYLD) म्हणून करण्यात आली आणि त्याची पहिली आवृत्ती 2025 मध्ये आयोजित करण्यात आली. पारंपरिक राष्ट्रीय युवा महोत्सवाची 25 वर्षांची परंपरा मोडीत काढून, 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांना त्यांच्या 'विकसित भारता'साठीच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक राष्ट्रीय व्यासपीठ देणे हा यामागील उद्देश होता. हा उपक्रम तरुणांना 'विकसित भारता'साठी त्यांचे विचार थेट पंतप्रधानांसमोर मांडण्यासाठी एक समावेशक आणि गतिशील व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा आहे.

विकसित भारत युवा नेते संवाद 2025 - पहिली आवृत्ती - एक ऐतिहासिक सुरुवात:
विकसित भारत युवा नेते संवाद च्या 2025 मध्ये झालेल्या पहिल्या आवृत्तीने युवा सहभाग आणि नेतृत्वाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टप्पा गाठला. 'विकसित भारत चॅलेंज'च्या माध्यमातून देशभरातील सुमारे 30 लाख तरुण सहभागी झाले, त्यात दोन लाखांहून अधिक निबंध सादर करण्यात आले आणि 9000 तरुणांनी राज्यस्तरीय स्पर्धेत आपले दृष्टीकोन व्यक्त केले. या प्रवासाचा समारोप नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे झाला, त्यात 3000 तरुण 'चेंजमेकर्स' सहभागी झाले.
या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्यांनी सुमारे सहा तास तरुणांशी संवाद साधला, त्यांचे विचार आणि 'विकसित भारता' चे उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीकोनावर लक्ष केंद्रित केले, तसेच त्यांना भारताचे भविष्य घडवण्यासाठी नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्यासाठी प्रेरणा दिली.
विकसित भारत युवा नेते संवाद 2026 चा शुभारंभ:
पहिल्या आवृत्तीच्या यशावर आधारित, 'विकसित भारत युवा नेते संवाद 2026' च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्दिष्ट अधिक नोंदणी, नवीन क्षेत्रांचा समावेश, व्यापक प्रसार आणि अधिक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करणे हा आहे. दुसऱ्या आवृत्तीची घोषणा करण्यासाठी 13 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी मंत्रालय सचिव आणि सह-सचिवांसह पत्रकारांना संबोधित केले.

या भाषणादरम्यान, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी अधोरेखित केले की विकसित भारत युवा नेते संवाद हे एकमेव असे व्यासपीठ आहे जिथे भारतीय तरुण केवळ त्यांचे विचारच मांडू शकतात असे नाही, तर ते आपले विचार थेट पंतप्रधानांसमोर मांडू शकतात. हे दृष्टीकोनाला वाणीत आणि वाणीला प्रभावात रूपांतरित करणारे युवा-संचालित लोकशाहीचे खरे उदाहरण आहे, असे त्यांनी सांगतिले.
विकसित भारत युवा नेते संवाद हे युवाशक्ती आणि क्षमतेला भारताच्या भविष्यासाठी एक रूपरेषा तयार करण्यासाठी दिशा देणारे व्यासपीठ आहे, असेही ते म्हणाले. आजचे तरुण केवळ देशाचे भविष्य नाहीत, तर ते राष्ट्रनिर्माते आहेत, यावर त्यांनी भर दिला.
त्यांनी पुढे नमूद केले की, विकसित भारत युवा नेते संवाद हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून, तरुणांना देशभरातून एकत्र आणणारे, त्यांच्या नेतृत्वगुणांचे संवर्धन करणारे आणि त्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम, समुदाय सक्षमीकरण तसेच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम करणारे एक सातत्यपूर्ण व्यासपीठ आहे.

विकसित भारत युवा नेते संवाद 2026 ची वैशिष्ट्ये
विकसित भारत युवा नेते संवाद – 2026 च्या दुसऱ्या आवृत्तीत पहिल्या आवृत्तीतील प्रमुख विषय व उपविभाग (ट्रॅक्स) कायम ठेवले जाणार असून, नव्या उपविभागाची (व्हर्टिकल) भर, विद्यमान उपविभागामध्ये दृष्टिकोनात बदल आणि प्रथमच आंतरराष्ट्रीय सहभाग यांचा समावेश करण्यात येणार आहे.
त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे
डिझाईन फॉर भारत : विकसित भारत @2047 या दृष्टिकोनाशी संलग्न बहु-स्तरीय राष्ट्रीय डिझाईन आव्हान.
टेक फॉर विकसित भारत – हॅक फॉर अ सोशल कॉज : विकसित भारत @2047 या विषयावर आधारित, प्रोटोटाइप व तंत्रज्ञानाधारित उपाययोजना विकसित करणारी बहुस्तरीय हॅकाथॉन स्पर्धा.
आंतरराष्ट्रीय सहभाग : परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या जाणून घ्या भारताविषयी कार्यक्रम या उपक्रमांतर्गत 80 युवकांचा तसेच (बिम्सटेक) राष्ट्रांतील 20 प्रतिनिधींचा सहभाग.
स्पर्धेची रूपरेषा
राज्यस्तरावर या स्पर्धा नामनिर्दिष्ट नोडल संस्थांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील तीन सदस्यीय संघ सहभागी होणार आहे.
हॅकेथॉन/डिझाईन चॅलेंजच्या अंतिम राष्ट्रीय फेरीसाठी एकूण 100 सहभागी पात्र ठरणार असून, हे तरुण देशातील अत्यंत उज्ज्वल नाविन्यपूर्ण कल्पना सादर करणार आहेत.
कार्यक्रम संरचना:
विकसित भारत चॅलेंज ट्रॅक (4 टप्पे)
प्रथम टप्पा (डिजिटल) : प्रश्नमंजुषा – 01 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2025
द्वितीय टप्पा (डिजिटल) : निबंध स्पर्धा – 23 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2025
तृतीय टप्पा (प्रत्यक्ष उपस्थिती) : पीपीटी चॅलेंज – राज्यस्तर – 24 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2025
चतुर्थ टप्पा (प्रत्यक्ष उपस्थिती) : विकसित भारत चॅम्पियनशिप, राष्ट्रीय युवा महोत्सव, नवी दिल्ली – 10 ते 12 जानेवारी 2026
या ट्रॅकमध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतून एकूण 1,500 सहभागी राष्ट्रीय स्तरावर पात्र ठरणार आहेत.
सांस्कृतिक आणि डिझाईन ट्रॅक ( 3 टप्यात )
जिल्हास्तर – 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025
राज्यस्तर – 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025
राष्ट्रीय स्तर – 10 ते 12 जानेवारी 2026
कार्यक्रमांमध्ये भाषण, कथालेखन, चित्रकला, लोकगीते, लोकनृत्य, कवितालेखन आणि नवोपक्रम यांचा समावेश असेल. प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक श्रेणीतील सर्वोत्तम संघ राष्ट्रीय स्तरासाठी पात्र ठरेल.
डिझाईन फॉर भारत अँड टेक फॉर विकसित भारत - हॅक फॉर अ सोशल कॉज
राज्य पातळीवर, प्रत्येक ट्रॅक अंतर्गत स्पर्धा नियुक्त केलेल्या नोडल/ मुख्य संस्थांमध्ये आयोजित केल्या जातील,
राष्ट्रीय पातळीवर, प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील तीन सदस्यीय संघ सहभागी होतील.
एकूण, 100 सहभागी अंतिम राष्ट्रीय फेरीसाठी पात्र ठरतील जे देशातील काही चमकदार कामगिरी करणाऱ्या तरुण नवोन्मेषकांचे प्रतिनिधित्व करतील.
जानेवारी 2026 मध्ये राष्ट्रीय सहभाग
विकसित भारत युवा नेते संवाद 2026 चा भव्य अंतिम सोहळा 10-12 जानेवारी 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे ज्यामध्ये 3,000 सहभागींचा वैविध्यपूर्ण गट एकत्र येईल, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
· 1,500 सहभागी विकसित भारत आव्हान ट्रॅक मधून
· 1,000 सहभागी –सांस्कृतिक आणि डिझाईन ट्रॅक मधून
· 100 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी
· 400 विशेष उपस्थिती
नोंदणी आणि सहभाग
माय भारत पोर्टल mybharat.gov.in वर प्रश्नमंजूषा फेरीसाठी नोंदणी सुरू झाल्याने विकसित भारत युवा नेते संवाद 2026 च्या दिशेने प्रवास आधीच सुरू झाला आहे. या प्रवेश मंचामुळे देशभरातील तरुणांना नोंदणी करण्याची आणि स्पर्धा करण्याची संधी मिळते, ज्यामुळे या राष्ट्रीय चळवळीचा भाग बनण्याचा त्यांचा प्रवास सुरू होतो.
www.mygov.in द्वारे प्रश्नमंजुषा फेरीसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2025 आहे.

विकसित भारत@2047 च्या दिशेने प्रवासात सहभाग वाढविण्यासाठी आणि सक्रिय तरुणांच्या सहभागाला प्रेरणा देण्यासाठी या उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया चॅनेल्सकडून सतत पाठिंबा आणि सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे.
***
निलिमा चितळे / निखिलेश चित्रे / राज दळेकर / हेमांगी कुलकर्णी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166360)
Visitor Counter : 2