नौवहन मंत्रालय
बिस्तीर्ण परोरे : ब्रह्मपुत्राच्या प्रवासातून सांगीतिक यात्रा
डॉ. भूपेन हजारिका यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन
Posted On:
07 SEP 2025 8:41PM by PIB Mumbai
बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या (एमओपीएसडब्ल्यू) अखत्यारीतील भारतीय जलमार्ग प्राधिकरण (आयडब्ल्यूएआय) उद्या डिब्रुगडच्या गुजान येथे `बिस्तीर्ण परोरे : सादिया ते धुबरी संगीतयात्रा` सुरू करणार आहे. भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेली ही सांस्कृतिक यात्रा त्यांच्या सर्वाधिक गाजलेल्या गीतांपैकी एका गीताच्या नावावर ठेवण्यात आली आहे. ही अनोखी सांस्कृतिक मोहीम ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहालगत चालेल आणि संगीत व उत्सवाच्या माध्यमातून विविध समुदायांना एकत्र आणेल.
ही यात्रा उद्या सकाळी गुजान येथे सुरू होईल. डिब्रुगडच्या बोगीबील येथे होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यात डॉ. हजारिका यांच्या सर्जनशील वारशाला अभिवादन करण्यासाठी आणि तरुणांना प्रेरणा देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीचे महत्त्व केवळ वर्धापन दिनापुरते मर्यादित नाही, तर ते ज्यांचा आवाज ब्रह्मपुत्राच्या आत्मरूप झाला त्या सांस्कृतिक प्रेरणास्थानाच्या सामूहिक स्मरणाचा प्रसंग आहे. `सुधाकंठ` (ब्रम्हपुत्राचा गायककवी) म्हणून ओळखले जाणारे डॉ. हजारिका यांनी आपल्या प्रेरणेचे सर्वाधिक स्त्रोत ब्रह्मपुत्रा या महानदीतूनच घेतले. त्यांचे अमर गीत ‘बिस्तीर्ण परोरे’ हे केवळ ब्रह्मपुत्राच्या भौगोलिक व्यापकतेचे चित्रण करत नाही तर त्याच्या काठावरील लोकांचे संघर्ष, आकांक्षा आणि ऐक्य यांनाही आवाज देते.
उद्या बोगीबील येथे शेकडो लोक आणि डॉ. हजारिका यांच्या चाहत्यांची या सोहळ्यास उपस्थिती अपेक्षित असून, ही ऐतिहासिक सांस्कृतिक यात्रा जन्मशताब्दी वर्षाच्या उत्सवांचा संस्मरणीय प्रारंभ ठरणार आहे.
***
सुषमा काणे / नितीन गायकवाड / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2164532)
Visitor Counter : 2