राष्ट्रपती कार्यालय
सिंगापूरच्या पंतप्रधानांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली
Posted On:
04 SEP 2025 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2025
सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी आज (4 सप्टेंबर, 2025) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
भारत आणि सिंगापूर हे परंपरांसाठी महत्त्वाचे भागीदार आहेत आणि सिंगापूर भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरण आणि हिंद-प्रशांत दृष्टिकोनातही महत्त्वपूर्ण भागीदार आहे असे राष्ट्रपती भवनात पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांचे स्वागत करताना राष्ट्रपतींनी नमूद केले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, हे वर्ष द्विपक्षीय राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनामुळे विशेष महत्वाचे आहे. राष्ट्राध्यक्ष थर्मन यावर्षी जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर आले होते. परराष्ट्र मंत्री विवियन बालकृष्णन यांच्यासह सहा वरिष्ठ मंत्र्यांनी काही आठवड्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या तिसऱ्या भारत-सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेला हजेरी लावली होती. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्यात भारत-सिंगापूर संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित झाले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधान लॉरेन्स वोंग आणि पंतप्रधान मोदी यांनी आज संयुक्तपणे या भागीदारीचा आराखडा तयार केला, जो खऱ्या अर्थाने आपल्या द्विपक्षीय सहकार्याची दृढता आणि व्यापकता दर्शवितो, हे नमूद करताना राष्ट्रपतींनी संतोष व्यक्त केला. आज झालेल्या द्विपक्षीय करारांमुळे हरित अर्थव्यवस्था, अंतराळ, नागरी हवाई वाहतूक, फिनटेक आणि कौशल्य विकास यासारख्या नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्याला चालना मिळेल असेही त्यांनी निदर्शनास आणले.

व्यापार आणि आर्थिक संबंधांबद्दल बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, सिंगापूर हा भारतासाठी गुंतवणुकीचा प्रमुख स्त्रोत आहे आणि सिंगापूरची भारतातील गुंतवणूकही वाढत आहे. द्विपक्षीय सराव आणि प्रशिक्षणासह उभय देशातील वाढत्या संरक्षण सहकार्याचाही त्यांनी उल्लेख केला. आपली संस्कृती आणि परस्पर देवाणघेवाण वृद्धिंगत करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सिंगापूरमधील मोठ्या भारतीय समुदायाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे ही त्यांनी कौतुक केले.
उच्च राजकीय पातळीवर नियमित संवाद हे भारत-सिंगापूर संबंधांचे वैशिष्ट्य आहे यावर दोन्ही नेते सहमत झाले. भविष्यात भारत-सिंगापूर संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* * *
निलिमा चितळे/वासंती जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163997)
Visitor Counter : 2