शिक्षण मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान आणि अन्नपूर्णा देवी यांनी संयुक्तरित्या "शाळांसोबतच अंगणवाडी केंद्र उभारण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे" केली प्रकाशित
Posted On:
03 SEP 2025 7:13PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी 3 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे "शाळांसोबतच अंगणवाडी केंद्रे उभारण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे" संयुक्तरित्या प्रकाशन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचा दृष्टीकोन साकार करण्यामध्ये हा उपक्रम एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल असा विश्वास धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी व्यक्त केला.
बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले नाहीत परंतु पुढील शिक्षण घेण्यास उत्सुक असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी ("दीदी") एक समर्पित शिक्षण मॉड्यूल तयार केले जावे, असे धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमात सुचवले.


शाळांसोबत अंगणवाडी केंद्रांचे सह-स्थानिकीकरण म्हणजे, शक्य असेल तिथे शाळांच्या आवारात अंगणवाडी सुरू करणे. या उपक्रमातून अंगणवाडी केंद्रांमध्ये मिळणारे बालमंदिरातील शिक्षण आणि पहिलीपासून मिळणारे औपचारिक शालेय शिक्षण यांच्यात सातत्य सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रदान केली जातील. तसेच संसाधनांचा योग्य वापर होईल, सक्रिय समुदाय सहभागाला प्रोत्साहन मिळेल आणि मुलांचा पूर्व-प्राथमिक ते प्राथमिक शाळेत जाण्याचा प्रवास अधिक सुलभ आणि पोषक होईल.
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये खालील महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत :
भारतात मुलांची बालपणातील काळजी आणि शिक्षण (ECCE) : एक एकात्मिक दृष्टीकोन
जवळच्या शाळांमध्ये अंगणवाडी केंद्रांचे सह-स्थानिकीकरण निश्चित करण्यासाठी नियम आणि निकष
जवळच्या शाळांबरोबर अंगणवाडी केंद्रांचे मॅपिंग
बालक-अनुकूल शिक्षण वातावरणाची निर्मिती
समुदाय आणि पालकांचा सहभाग
प्राथमिक शाळांबरोबर अंगणवाडी केंद्रांच्या सह-स्थानिकीकरणात विविध भागधारकांची भूमिका
सध्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश विविध मॉडेल्स अंमलात आणत आहेत आणि त्यांना काही कार्यकारी आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे, असेही मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केले आहे.
मात्र, शाळांमध्ये अंगणवाडी केंद्रांच्या सह-स्थानिकीकरणामुळे दोन्ही विभागांमधील समन्वय आणि योग्य वेळी अंमलबजावणी झाली तर मुलांची बालपणातील काळजी आणि शिक्षण (ECCE) तसेच पायाभूत साक्षरता आणि अंकगणित (FLN) सेवा मोठ्या प्रमाणावर बळकट होतील. हा दृष्टिकोन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. निरोगी आणि सक्षम बालकांसाठी एक भक्कम शैक्षणिक पाया तयार करणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे 'निपुण भारत मिशन' आणि 'पोषण भी पढाई भी' यांना एकत्र करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तसेच जादुई पिटारा, ई-जादुई पिटारा आणि आधारशिला यांसारख्या अध्यापन अध्ययन साहित्याच्या (TML) वापराला देखील चालना मिळेल. ही सर्व साधने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा - बालवाडीच्या सुरुवातीच्या टप्प्याशी सुसंगत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केल्याप्रमाणे, "पूर्व-प्राथमिक स्तरावर गुंतवणूक करणे आवश्यक आहे, कारण याच टप्प्यावर मुलांना चांगले, नैतिक, विचारशील आणि सहानुभूतीशील नागरिक घडवले जाऊ शकते, जे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या स्वप्नपूर्तीकडे घेऊन जातील”.
***
शैलेश पाटील / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2163541)
Visitor Counter : 2