गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी जम्मूमध्ये झालेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमधल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला

Posted On: 01 SEP 2025 7:24PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज जम्मूमध्ये झालेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमधल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालक, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे प्रमुख तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यानकेंद्रीय गृहमंत्र्यांनी  जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचे या वर्षीची अमरनाथ यात्रा शांततेत पार पाडल्याबद्दल कौतुक केले.

तसेच, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेची धोरणे अवलंबण्यावर त्यांनी भर दिला. जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादाचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणानी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या.

अमित शाह यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नुकत्याच, अचानक आलेल्या पुरामध्ये, मदत आणि बचाव कार्यात सर्व सुरक्षा दलांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले, ज्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचण्यास मदत झाली. त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (CAPFs) पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.

****

शैलेश पाटील / निखिलेश चित्रे / परशुराम कोर


(Release ID: 2162944) Visitor Counter : 2