गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गुवाहाटी येथे आसामचे माजी मुख्यमंत्री गोलाप बोरबोरा यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित समारंभाला संबोधित केले
गोलप बोरबोरा यांनी आयुष्यभर शोषित आणि वंचित वर्गाचा आवाज बनून संविधानाची प्रतिष्ठा जपली: अमीत शाह
निवडणूक आयोग मतदार यादीत सुधारणा करत असताना, काही राजकीय पक्ष आपली मतपेढी मजबूत करण्यासाठी घुसखोरांच्या बचावासाठी यात्रा काढत असल्याची अमीत शाह यांचा टीका
देशाची मतदार यादी हे लोकशाहीचे हृदय असून, त्यामध्ये परदेशी नागरिकांना स्थान मिळू नये अशी अमीत शाह यांची स्पष्टोक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाय पॉवर डेमोग्राफिक मिशनची घोषणा केली असून, ते देशाला घुसखोरीमुक्त करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल असे अमीत शाह यांचे प्रतिपादन
Posted On:
29 AUG 2025 8:32PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुवाहाटी येथे आसामचे माजी मुख्यमंत्री गोलाप बोरबोरा यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित समारंभाला संबोधित केले.
आसामच्या माजी मुख्यमंत्र्यांचे स्मरण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, बोरबोरा यांनी समाजवादी विचारसरणी, स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्यानंतर लोकशाहीच्या रक्षणाची चळवळ, या सर्व उदात्त पैलूंचे आसाममध्ये वास्तवात रूपांतर केले. ते म्हणाले की बोरबोरा हे पीडित आणि वंचितांचा आवाज बनले, त्यांनी संविधानाच्या पावित्र्याचे रक्षण केले, हुकूमशाही आणि भ्रष्टाचारा विरोधात लढा उभारला आणि केवळ आसामची अनोखी ओळखच नव्हे, तर आसाममध्ये वसलेला भारताचा आत्मा जागृत ठेवण्याचे काम केले.

अमीत शाह म्हणाले की, गोलाप बोरबोरा यांचा आपल्या पक्षाच्या विचारसरणीशी कोणताही संबंध नव्हता, पण त्यांनी पक्षीय राजकारण आणि स्वार्थाच्या पलीकडे जाऊन सार्वजनिक जीवनात चांगले काम केले, त्यांचे योगदान नेहमीच राज्यातील आणि देशातील तरुणांना माहित असायला हवे. आसाम सरकारने हे उदात्त काम केल्याबद्दल अमीत शाह यांनी प्रशंसा केली.
या देशात एकही घुसखोर राहू नये, यावर आपला ठाम विश्वास असल्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले. ते म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून आसाममध्ये घुसखोरी विरोधात जागरूकता निर्माण करणारे गोलाप बोरबोरा, हे पहिले होते. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात, मतदार याद्यांची छाननी करण्यात आली आणि मर्यादित साधन संपत्ती आणि संगणकीकरणाचा अभाव असूनही, बोरबोरा यांनी यादीतून 36,780 बेकायदेशीर घुसखोरांना काढून टाकण्यात यश मिळवले.

ते म्हणाले की, जर कोणी आसाम चळवळीची मुळे शोधली, तर ती त्यांना मतदार यादी सुधारणेत सापडतील. अमित शाह म्हणाले की, आज निवडणूक आयोग विशेष पुनरीक्षण प्रक्रियेद्वारे (SIR) मतदार याद्यांमध्ये सुधारणा करत आहे, परंतु काही राजकीय पक्ष घुसखोरांच्या बचावासाठी मोर्चे काढत आहेत. ते म्हणाले की, देशाची मतदार यादी ही लोकशाहीचे हृदय असते, आणि परदेशी नागरिकांना त्यात स्थान मिळू नये. दुर्दैवाने, सार्वजनिक जीवनात नैतिक अध:पतन इतके वाढले आहे की, मतपेढीच्या राजकारणासाठी आणि कोणत्याही किमतीवर सत्ता काबीज करण्यासाठी, मतदार यादीतून घुसखोरांचे नाव काढून टाकायला विरोध केला जात आहे. गोलप बोरबोरा आज असते, तर त्यांनी याला नक्कीच विरोध केला असता.

1.26 लाख एकर जमीन घुसखोरांपासून मुक्त केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी आसाम सरकारची प्रशंसा केली. ते म्हणाले की, केवळ काझीरंगाची जंगले आणि वन्यजीव क्षेत्र अतिक्रमणापासून मुक्त झाले नाही, तर संत शंकरदेव आणि माधवदेव यांच्याशी संबंधित हजारो एकर जमीन देखील परत मिळवण्यात आली. ते पुढे म्हणाले की, 15 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोलप बोरबोरा यांच्या तत्वांवर आधारित उच्च-शक्ती लोकसंख्याशास्त्रीय बदल मिशन स्थापन करण्याची घोषणा केली. हे मिशन देशभरातील लोकसंख्याशास्त्रीय बदलांचा अभ्यास करेल, घुसखोरांची ओळख पटवेल आणि देशाला बेकायदेशीर घुसखोरीपासून मुक्त करण्याच्या दिशेने काम करेल, असे अमीत शाह यांनी सांगितले.
****
यश राणे/ राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2162190)
Visitor Counter : 18