युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
ऐतिहासिक युरोपियन ट्रेबल जिंकणाऱ्या युवा फुटबॉलपटूंचा डॉ. मनसुख मांडवियांच्या हस्ते सत्कार
ही भारतीय फुटबॉलसाठी नवी सुरुवात - डॉ. मनसुख मांडविया
Posted On:
28 AUG 2025 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2025
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्ली इथे झालेल्या एका कार्यक्रमात मोहालीच्या मिनर्व्हा ॲकॅडमी फुटबॉल क्लबच्या युवा फुटबॉलपटुंचा सत्कार केला. या फुटबॉलपटुंनी युरोपमध्ये मिळवलेला विजय म्हणजे भारतीय फुटबॉलसाठी एक नवी सुरुवात असल्याच्या शब्दांत त्यांनी या फुटबॉलपटुंच्या कामगिरीचा गौरव केला.

14/15 वर्षांखालच्या 22 फुटबॉलपटुंच्या संघाने जुलै ते ऑगस्ट 2025 या काळात स्वीडनमध्ये झालेला गोथिया कप, डेन्मार्मध्ये झालेला डाना कप आणि नॉर्वेत झालेला नॉर्वे कप या तीन अत्यंत प्रतिष्ठेच्या युरोपीय स्पर्धा जिंकून एक अभूतपूर्व इतिहास रचला आहे.
या संघाचे हे यश म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक यश मिळवण्याच्या आपल्या प्रयत्नांच्या दिशेने भारतीय फुटबॉलची एक नवी सुरुवात असल्याचे डॉ. मनसुख मांडविया यावेळी म्हणाले.
युवा खेळाडूंनी, कोणत्याही स्पर्धेत भाग घेताना राष्ट्र प्रथम ही भावना कायम मनात बाळगावी असे आवाहन त्यांनी केले. क्रीडा विज्ञान, पोषण आणि मानसोपचार तज्ञांच्या मदतीने युवा खेळाडूंच्या मानसिक लवचिकतेवर अधिक भर दिला जाण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यामुळे भारत कायमच विजयी मार्गावर वाटचाल करत राहील असे त्यांनी सांगितले. युवा खेळाडूंनी आपला आत्मविश्वास आणि खेळाविषयीची आवड जोपासली पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.
या खेळाडुंनी जिंकलेल्या तीनही स्पर्धा जगातील सर्वात प्रतिष्ठित युवा फुटबॉल स्पर्धा मानल्या जातात. या संघाने 26 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोणताही पराभव न पत्करता, दक्षिण अमेरिका, युरोप आणि इतर देशांतील युवा क्लब्सविरोधात मोठ्या संख्येने गोल करत एकूण 295 गोल केले, मात्र त्यांच्या विरोधात फक्त काहीच गोल झाले.

मिनर्व्हा ॲकॅडमी फुटबॉल क्लब ही एक खेलो इंडिया मान्यताप्राप्त अकादमी आहे. हा क्लब गोथिया कप 2025 या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांच्या गटात भाग घेणाऱ्या भारतातील सहा क्लबपैकी एक होता. या क्लबने जुलैमध्ये स्वीडनमध्ये युथ वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोथिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या एस्कुएला डी फुटबॉल 18 टुकुमन या संघाचा 4-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2161704)
Visitor Counter : 18