पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 25-26 ऑगस्ट रोजी गुजरातच्या दौऱ्यावर


पंतप्रधानांच्या हस्ते अहमदाबादमध्ये 5,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण होणार

शहरी विकास, ऊर्जा, रस्ते आणि रेल्वे या आणि अशा विविध क्षेत्रासाठीच्या प्रकल्पांचा यात समावेश

पंतप्रधान मेक इन इंडिया' च्या यशाचे एक मोठे उदाहरण म्हणून हंसलपूर इथून 100 हून अधिक देशांना निर्यात करण्यासाठी सुझुकीच्या पहिल्या ग्लोबल बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल 'ई विटारा' ला हिरवा झेंडा दाखवणार

पंतप्रधान टीडीएस लिथियम-आयन बॅटरी प्रकल्पात हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोडच्या स्थानिक उत्पादनाचे उद्घाटन करणार, हरित ऊर्जेच्या क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पडणार एक ऐतिहासिक पाऊल

Posted On: 24 AUG 2025 4:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑगस्‍ट 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 आणि 26 ऑगस्ट रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता ते अहमदाबादमधील खोडलधाम मैदानावर 5,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील. या वेळी ते एका जाहीर सभेलाही संबोधित करतील.

26 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान अहमदाबादमधील हंसलपूर इथे हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोडच्या स्थानिक उत्पादनाचे अनावरण करतील आणि 100 देशांमध्ये बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवतील. या कार्यक्रमातही ते उपस्थितांना संबोधित करतील.

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि संपर्क जोडणीप्रति आपल्या  वचनबद्धतेच्या अनुषंगाने, पंतप्रधान 1,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अनेक रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. यात 65 किमी लांबीच्या मेहसाणा-पालनपूर रेल्वे मार्गाचे 530 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून दुहेरीकरण, 37 किमी लांबीच्या कलोल-कडी-कटोसन रोड रेल्वे मार्गाचे गेज रूपांतरण आणि 40 किमी लांबीच्या बेचराजी-रानुज रेल्वे मार्गाचे 860 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून गेज रूपांतरण अशा विविध कामांचा समावेश आहे. ब्रॉड-गेज क्षमतेच्या विस्तारामुळे, या भागातील संपर्क जोडणी अधिक सुरळीत, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, पर्यटकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी  प्रवास अधिक सुलभ होईल, आणि प्रादेशिक आर्थिक एकात्मतेला प्रोत्साहन मिळेल. याव्यतिरिक्त, कटोसन रोड आणि साबरमती दरम्यान पॅसेंजर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून ती सुरू केल्याने धार्मिक स्थळांपर्यंत कनेक्टीव्हीटीत सुधारणा घडून येईल आणि तळागाळातील आर्थिक घडामोडींनाही चालना मिळेल. तर बेचराजी इथून सुरू केल्या जाणाऱ्या कार-लोडेड मालवाहतूक रेल्वे सेवेमुळे राज्याच्या औद्योगिक केंद्रांसोबत संपर्क वाढेल, लॉजिस्टिक  जाळेही अधिक मजबूत होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

या दौऱ्यात पंतप्रधान संपर्क व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणे, प्रवाशांची सुरक्षा वाढवणे आणि प्रादेशिक विकासाला गती देण्याच्या आपल्या दृष्टीकोनाला अनुसरून विरमगाम-खुदाद-रामपुरा रस्त्याच्या रुंदीकरण कामाचे उद्घाटनही करणार आहेत. याशिवाय, अहमदाबाद-महेसाणा-पालनपूर रस्त्यावर सहा मार्गिकांचा वाहन अंडरपास आणि अहमदाबाद-विरमगाम रस्त्यावर रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामाची पायाभरणीही ते करतील. या  सर्व उपक्रमांमुळे एकत्रितपणे या भागातील औद्योगिक वाढीला, वाहतूक कार्यक्षमतेला आणि आर्थिक संधींना चालना मिळणार आहे.

राज्यातील वीज क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेड (UGVCL) अंतर्गत अहमदाबाद, मेहसाणा आणि गांधीनगर येथे वीज वितरण प्रकल्पांचे उद्घाटन करतील. पुनर्निर्मित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत तोटा कमी करणे, नेटवर्कचे आधुनिकीकरण करणे आणि पायाभूत सुविधा मजबूत करणे  हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. 1000 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे हे प्रकल्प प्रतिकूल हवामानात वीज पुरवठ्यातील बिघाड आणि वीज पुरवठा खंडित होणे कमी करतील, जनसुरक्षा,  ट्रांसफार्मरचे रक्षण  आणि वीज वितरण जाळ्याची विश्वासार्हता वाढवतील.

पंतप्रधान मोदी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या इन सीटू झोपडपट्टी पुनर्वसन घटकांतर्गत रामापीर नो टेकरो येथील सेक्टर-3 मध्ये असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन करतील. अहमदाबादभोवती असलेल्या सरदार पटेल रिंग रोडवर मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाची पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत. यामुळे या मार्गावरचा वाहतुकीचा ताण कमी होईल आणि संपर्क सुविधा सुधारेल. पंतप्रधान शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांचेही भूमिपूजन करतील, जेणेकरून पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम होईल.

प्रशासकीय कार्यक्षमता आणि सार्वजनिक सेवा वितरण मजबूत करण्यासाठी पंतप्रधान गुजरातमधील प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी करतील. यामध्ये अहमदाबादच्या पश्चिम भागात नवीन स्टॅम्प्स आणि रजिस्ट्रेशन भवन बांधणीचा समावेश आहे, ज्यामुळे नागरिक-केंद्रित सेवांचा दर्जा सुधारेल. तसेच गांधीनगर येथे राज्यस्तरीय डेटा स्टोरेज सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे ज्यामुळे सुरक्षित डेटा व्यवस्थापन आणि डिजिटल प्रशासनाची क्षमता वाढेल.  

26 ऑगस्ट रोजी, पंतप्रधान अहमदाबादमधील हंसलपूर येथील सुझुकी मोटर प्लांटमध्ये दोन ऐतिहासिक विकासकामांचे उद्घाटन करतील. या महत्वपूर्ण उपक्रमामुळे हरित गतिशीलतेसाठी भारताचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येणे अधोरेखित होईल आणि पंतप्रधानांचा मेक इन इंडिया तसेच आत्मनिर्भर भारत या संकल्पनांप्रती असलेला दृढनिश्चय पुढे नेला जाईल.

मेक इन इंडियाच्या यशाचे एक प्रमुख उदाहरण म्हणून, पंतप्रधान सुझुकीचे पहिले जागतिक धोरणात्मक बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल (BEV) "ई- व्हिटारा  (e VITARA)" चे उद्घाटन करुन त्याला हिरवा झेंडा दाखवतील. भारतात तयार केलेले हे बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल युरोप आणि जपानसारख्या प्रगत बाजारपेठांसह शंभराहून अधिक देशांमध्ये निर्यात केले जातील. या महत्त्वाच्या यशानंतर, भारत आता सुझुकीच्या  इलेक्ट्रिक वाहनांचे जागतिक उत्पादन केंद्र बनेल.

हरित ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने मोठी पावले उचलत, पंतप्रधान गुजरातमधील टीडीएस लिथियम-आयन बॅटरी प्लांटमध्ये हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड चे स्थानिक उत्पादन सुरू करून भारताच्या बॅटरी प्रणालीच्या पुढील टप्प्याचे उद्घाटन देखील करतील. तोशिबा, डेन्सो आणि सुझुकी यांचा संयुक्त उपक्रम असलेला हा प्रकल्प देशांतर्गत उत्पादन आणि स्वच्छ ऊर्जा नवोन्मेषाला चालना देईल. या प्रगतीमुळे बॅटरीच्या एकूण मूल्य पैकी 80 टक्क्यांहून अधिक उत्पादन आता भारतातच होईल.

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे


(Release ID: 2160327)