इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी सेमिकॉन इंडिया 2025 च्या चौथ्या आवृत्तीचे करणार उद्घाटन


नवी दिल्लीतील यशोभूमी येथे 2– 4 सप्टेंबर 2025 दरम्यान भारतातील सर्वात मोठ्या सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स शो चे आयोजन

सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये भारत 33 देश , 50+ जागतिक सीएक्सओ, 350 प्रदर्शक आणि 50+ दूरदर्शी जागतिक वक्त्यांचे स्वागत करणार

कार्यक्रमात स्थानिक सेमीकंडक्टर परिसंस्थेचा मजबूत विस्तार आणि उद्योग कल अधोरेखित केला जाणार

सेमिकॉन इंडिया उद्याच्या जटिल आव्हानांना सामोरे जाण्याबरोबरच आत्मनिर्भर भारताच्या दिशेने सेमीकंडक्टर परिसंस्थेत सहकार्याला चालना देईल

Posted On: 22 AUG 2025 9:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2025


सेमिकॉन इंडिया 2025 च्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथील यशोभूमी (इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर) येथे होणार आहे.   जागतिक सेमीकंडक्टर महाशक्ती म्हणून भारताचे स्थान निर्माण करण्यासाठी , सेमिकॉन इंडिया 2025 च्या चौथ्या आवृत्तीत जागतिक स्तरावरील नेते, सेमीकंडक्टर उद्योग तज्ञ, शैक्षणिक संस्था, सरकारी अधिकारी आणि विद्यार्थी यासह प्रमुख हितधारकांना निमंत्रित केले जाणार आहे.

सेमिकॉन इंडिया कार्यक्रम  अंतर्गत भारताच्या सेमीकंडक्टर प्रवासाला मोठी गती मिळत आहे. आतापर्यंत, केंद्र  सरकारने धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रात 10 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्यात हाय-व्हॉल्यूम फॅब्रिकेशन युनिट्स (फॅब्स), थ्रीडी हेटेरोजेनियस पॅकेजिंग, कंपाऊंड सेमीकंडक्टर्स (सिलिकॉन कार्बाइड - एसआयसीसह) आणि आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट (ओएसएटी) यांचा समावेश आहे. हे प्रकल्प जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीत भारताचे स्थान मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी दर्शवतात.

पायाभूत उद्योग म्हणून सेमीकंडक्टर्सची दखल घेत केंद्र  सरकार  280  हून अधिक शैक्षणिक संस्था आणि 72 स्टार्ट-अप्सना अत्याधुनिक डिझाइन साधने प्रदान करून संशोधन, नवोन्मेष आणि डिझाइनला पाठबळ  देत आहे. याव्यतिरिक्त, डिझाइन संलग्न प्रोत्साहन  (DLI) योजनेअंतर्गत 23 स्टार्ट-अप्सना मान्यता देण्यात आली आहे, ज्यायोगे  भारतीय नवोन्मेषकांना महत्त्वपूर्ण अनुप्रयोगांवर काम करण्यास सक्षम बनवले जात आहे. या उपक्रमांद्वारे, भारत क्लोज्ड-सर्किट टेलिव्हिजन (CCTV), नेव्हिगेशन सिस्टम, मोटर कंट्रोलर्स, कम्युनिकेशन चिप्स आणि मायक्रोप्रोसेसर युनिट्स सारख्या अनुप्रयोगांसाठी सेमीकंडक्टर डिझाइन आणि उत्पादन करण्याची क्षमता विकसित करण्याच्या दिशेने  प्रगती करत आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला अनुरूप , देशात एक मजबूत आणि समग्र सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने  हे प्रयत्न एक निर्णायक पाऊल आहे.

भारताच्या सेमीकंडक्टर क्रांतीला गती देत, सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देणारी जागतिक उद्योग संघटना SEMI आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या  इंडिया सेमीकंडक्टर मिशन (ISM) ने आज नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सेमिकॉन  इंडिया 2025 च्या कार्यक्रमाची घोषणा केली.

"बिल्डिंग द नेक्स्ट सेमीकंडक्टर पॉवरहाऊस" या संकल्पनेअंतर्गत, हा कार्यक्रम 6 कंट्री राऊंड टेबल्ससह  फॅब्स, अॅडव्हान्स्ड पॅकेजिंग, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, एआय, पुरवठा साखळी व्यवस्थापन , शाश्वतता, मनुष्यबळ विकास , डिझाईन्स आणि स्टार्ट अप्स यासारख्या प्रमुख क्षेत्रांमधील नवोन्मेष आणि कल  याबाबत महत्वपूर्ण माहिती प्रदान करेल. 

"सेमिकॉन इंडिया प्रदर्शनात जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीतील  सुमारे 350 प्रदर्शक सहभागी होतील, ज्यात 6 कंट्री राऊंड टेबल्स, 4 कंट्री पॅव्हिलिअन , 9 राज्यांचा सहभाग आणि 15000 हून अधिक अपेक्षित अभ्यागतांचा समावेश असेल, जे सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील अलिकडील  प्रगती प्रदर्शित करण्यासाठी दक्षिण आशियातील एकमेव सर्वात मोठे व्यासपीठ उपलब्ध  करेल," असे एमईआयटीवायचे सचिव  एस कृष्णन म्हणाले."सेमी (SEMI), जागतिक इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन आणि उत्पादन पुरवठा साखळीतील आमच्या सदस्य कंपन्यांची एकत्रित कौशल्ये आणि क्षमता सेमिकॉन (SEMICON) इंडियामध्ये आणत आहे, ज्यामुळे भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेचा विस्तार आणि उद्योग पुरवठा साखळीची  लवचिकता, या दोन्ही गोष्टी पुढे नेण्यासाठी मदत होत आहे," सेमीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मनोचा यांनी सांगितले. या कार्यक्रमात व्यावसायिक नेटवर्किंग, आणि व्यवसाय विकासासाठी सेमिकॉनच्या महत्वाच्या संधी उपलब्ध असतील, आणि उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या व्यावसायिकांकडून तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील सध्याच्या ट्रेंड बद्दलचा  दृष्टीकोन मिळेल, असे ते म्हणाले.

सेमिकॉन इंडिया 2025 ची आखणी सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तांत्रिक प्रगती वाढवण्यासाठी आणि सेमीकंडक्टर परिसंस्था मजबूत करण्याच्या उद्देशाने असलेल्या भारताच्या धोरणांवर प्रकाश टाकण्यासाठी करण्यात आली आहे.

हा कार्यक्रम कल्पना, सहकार्य आणि नवोन्मेषाचा एक विलक्षण संगम असून, तो सेमीकंडक्टर परिसंस्थेतील सहकार्य वाढवताना उद्याच्या गुंतागुंतीच्या आव्हानांना सामोरे जाण्याची अनोखी संधी प्रदान करतो. या वर्षी आम्हाला मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि आयएसएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितेशकुमार सिन्हा यांनी सांगितले.

“देशांतर्गत धोरणे आणि खासगी क्षेत्राची क्षमता देशाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एकत्र आल्यामुळे भारताचा सेमीकंडक्टर उद्योग प्रगतीपथावर आहे. या परिवर्तनशील परिदृश्यातून मार्गक्रमण करताना, विकास आणि यशाचा पुढला टप्पा गाठ्यासाठी  सहकार्य आणि परिसंस्था बांधणी महत्त्वाची ठरेल,

सहकार्य आणि परिसंस्था उभारणी ही वाढीची आणि प्रगतीची पुढील लाट उघडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल आणि सेमिकॉन इंडिया 2025 यासाठी प्रेरक म्हणून काम करेल,” सेमी इंडिया आणि आयईएसएचे अध्यक्ष अशोक चांडक यांनी सांगितले.

या वर्षीच्या कार्यक्रमात मान्यवर सरकारी अधिकाऱ्यांबरोबरच, अप्लाइड मटेरियल्स, एएसएमएल, आयबीएम, इनफिनॉन, केएलए, लॅम रिसर्च, मर्क, मायक्रॉन, पीएसएमसी, रॅपिडस, सॅंडडिस्क, सिमेन्स, एसके हायनिक्स, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, टोकियो इलेक्ट्रॉन आणि यासारख्या इतर मोठ्या  कंपन्यांमधील उद्योगक्षेत्रातील मान्यवरांचाही समावेश असेल.  

तीन दिवसांच्या कालावधीत या महत्वाकांक्षी कार्यक्रमात, हाय प्रोफाईल कीनोट्स, पॅनेल डिस्कशन, फायरसाइड चॅट, पेपर प्रेझेंटेशन, 6 आंतरराष्ट्रीय गोलमेज आणि यासारखे विविध उपक्रम असतील, जे सेमीकंडक्टर नवोन्मेश आणि विकासाच्या पुढील लाटेला चालना देण्यासाठी आयोजित केले जातील. या कार्यक्रमात मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स मधील करिअरच्या संधी प्रदर्शित करण्यासाठी आणि नवीन प्रतिभा आकर्षित करण्यासाठी 'वर्कफोर्स डेव्हलपमेंट पॅव्हेलियन'चाही समावेश असेल.

सेमिकॉन इंडिया 2025 ला भेट देण्यासाठी नोंदणी सुरू आहे.

येथे नोंदणी करा: semiconindia.org

सेमिकॉन (SEMICON) इंडिया

सेमिकॉन इंडिया हे सेमी (SEMI) द्वारे आयोजित जगभरातील आठ वार्षिक सेमिकॉन प्रदर्शनांपैकी एक आहे, जे जागतिक सेमीकंडक्टर डिझाइन आणि उत्पादन परीसंस्थेतील अधिकारी आणि आघाडीच्या तज्ञांना एकत्र आणते. आगामी कार्यक्रम जागतिक सेमीकंडक्टर परिसंस्थेतील  सहकार्य आणि शाश्वततेला चालना देऊन, भविष्यातील तंत्रज्ञान नवोन्मेषाच्या उत्कंठावर्धक  प्रवासाची सुरुवात अधोरेखित करतो.

सेमी (SEMI)

SEMI® ही सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन आणि उत्पादन पुरवठा साखळीतील जगभरातील 3,000 पेक्षा जास्त सदस्य कंपन्या आणि 1.5 दशलक्ष व्यावसायिकांना जोडणारी जागतिक उद्योग संघटना आहे. ही संघटना वकिली, मनुष्यबळ विकास, शाश्वतता, पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि इतर कार्यक्रमांद्वारे उद्योगातील प्रमुख आव्हानांवर उपायांसाठी सदस्यांच्या सहकार्याला गती देते.

आयएसएम (ISM)

इंडिया सेमीकंडक्टर मिशन (आयएसएम) ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत एक स्वतंत्र संस्था आहे. शाश्वत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सेमीकंडक्टर विकसित करण्यासाठी आणि भारतात उत्पादन परिसंस्था प्रदर्शित करण्यासाठी असलेल्या सेमीकॉन इंडिया कार्यक्रमाची ही नोडल एजन्सी आहे. प्रस्तावांचे मूल्यमापन करणे, तंत्रज्ञान भागीदारी सुलभ करणे, केंद्र आणि राज्य सरकारांशी समन्वय साधणे आणि वित्तीय प्रोत्साहनाच्या वितरणाचे व्यवस्थापन करणे, ही आयएसएम ची जबाबदारी आहे. सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी भारताला एक विश्वासार्ह जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित  करणे, आर्थिक सुरक्षा आणि तांत्रिक स्वावलंबन सुनिश्चित करणे हे या मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.


शैलेश पाटील/सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2159988)