श्रम आणि रोजगार मंत्रालय
युवांसाठी रोजगाराला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची पंतप्रधानांनी केली घोषणा
योजनेसाठी सुमारे 1 लाख कोटी रुपयांची तरतूद, 3.5 कोटी युवांना मिळणार लाभ
रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणावर पाठबळ देत, स्वतंत्र भारत ते समृद्ध भारताच्या वाटचालीचा दुवा मजबूत करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल
Posted On:
15 AUG 2025 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025
देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान म्हणून ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून आज केलेल्या 12 व्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी 1 लाख कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. ही परिवर्तनकारी योजना असून, यामुळे दोन वर्षांत 3.5 कोटींपेक्षा जास्त रोजगार निर्मितीला मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत, नव्याने नोकरी मिळवलेल्या युवांना दोन टप्प्यांत एकूण 15,000 रुपयांपर्यंतची प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. यासबतच रोजगार निर्मिती करणाऱ्यांनाही प्रति नवीन कर्मचाऱ्यांसाठी दरमहा 3000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.
या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
भाग अ - पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना पाठबळ :
या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करत असलेले कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत ( ईपीएफओ) नोंदणी केलेले लक्ष्यित घटक असतील. त्यांना या पहिल्या भागाअंतर्गत 5,000 रुपयांपर्यंतचा एका महिन्याचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा हफ्ता दोन टप्प्यांमध्ये दिला जाईल. या प्रोत्साहनपर लाभासाठी 1 लाख रुपयांपर्यंत पगार असलेले कर्मचारी पात्र असतील. पहिला टप्पा 6 महिन्यांची सेवा पूर्ण केल्यानंतर तर दुसरा टप्पा 12 महिन्यांच्या सेवा तसेच संबंधित कर्मचाऱ्याने आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यावर दिला जाईल. कर्मचाऱ्यांना बचत करण्याची सवय लागावी यासाठी, प्रोत्साहपर लाभ निधीचा काही भाग एका निश्चित कालावधीसाठी बचत किंवा ठेव खात्यात ठेवला जाईल. कालांतराने कर्मचारी हा भाग काढून घेऊ शकतील.
या भाग अ अंतर्गतच्या लाभांचा फायदा पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या सुमारे 1.92 कोटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
भाग ब - नियोक्त्यांसाठी (रोजगार देणाऱ्यांसाठी) प्रोत्साहनपर लाभ:
या योजनेच्या या दुसऱ्या भागातील लाभांमुळे सर्व क्षेत्रांमध्ये, विशेषतः उत्पादन क्षेत्रात, अतिरिक्त रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे. या भागाअंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंत पगार असलेल्या नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी, त्यांना नियुक्त करणाऱ्या नियोक्त्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल. याअंतर्गत कमीत कमी सहा महिने टिकवून ठेवलेल्या प्रत्येक अतिरिक्त रोजगारासाठी दोन वर्षांसाठी दरमहा 3000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल. उत्पादन क्षेत्रासाठी, हा प्रोत्साहनपर लाभ तिसऱ्या आणि चौथ्या वर्षासाठीही वाढवला जाईल.
या भागाअंतर्गत दिल्या जात असलेल्या प्रोत्साहनपर लाभामुळे नियोक्त्यांना सुमारे 2.60 कोटी अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रोत्साहनपर लाभांच्या वितरणाची कार्यपद्धती: योजनेच्या भाग अ अंतर्गत पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सर्व देयके थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने, आधार ब्रिज पेमेंट सिस्टम (एबीपीएस) वापरून दिली जातील. भाग ब अंतर्गत नियोक्त्यांची देयके थेट त्यांच्या पॅन कार्डासोबत जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जातील. रोजगार संलग्न योजनेच्या माध्यमातून सर्व क्षेत्रांमध्ये, विशेषतः उत्पादन क्षेत्रात, रोजगार निर्मितीला गती देण्याचा उद्देश सरकारने समोर ठेवला आहे. यासोबतच देशाच्या कार्यरत मनुष्यबळात पहिल्यांदा कामात सामील होणाऱ्या युवा वर्गाला प्रोत्साहन देणे, हा देखील या योजनेचा उद्देश असणार आहे. या योजनेमुळे देशभरातील कोट्यवधी युवा पुरुष आणि महिलांना सामाजिक सुरक्षा पुरवली गेल्याने देशाच्या सक्रीय मनुष्यबळाचे औपचारिकीकरण व्हायला मदत होणार आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156871)