संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्र्यांनी नवी दिल्ली येथे अंदमान आणि निकोबार बेटांवरील आदिवासी समुदायांतील 30 विद्यार्थ्यांशी साधला संवाद
शैक्षणिक कारकिर्दीसोबत चारित्र्य घडवण्यावर देखील समान भर देण्यासाठी विद्यार्थ्यांना केले प्रोत्साहित
Posted On:
14 AUG 2025 9:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2025
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज, 14 ऑगस्ट 2025 रोजी, नवी दिल्ली येथील साऊथ ब्लॉकमध्ये अंदमान आणि निकोबार बेटांवरील आदिवासी समुदायांतील उच्च माध्यमिक वर्गांमध्ये शिकणाऱ्या 30 गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संरक्षणमंत्र्यांशी विद्यार्थ्यांचा संवाद हा अंदमान आणि निकोबार कमांडने (एएनसी) आयोजित केलेल्या ‘आरोहण: बेटापासून दिल्लीपर्यंत’ या सात दिवसांच्या राष्ट्रीय एकात्मता दौऱ्याचा भाग आहे. हे विद्यार्थी येत्या 15 ऑगस्ट, 2025 रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात देखील सहभागी होणार आहेत.

सदर संवादादरम्यान, मानवी मूल्ये हा कोणत्याही व्यक्तीच्या चारित्र्याची जडणघडण करण्यातील अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे असे सांगत संरक्षणमंत्र्यांनी या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. या विद्यार्थ्यांनी मानवी मूल्यांशी घट्टपणे जोडलेले राहून शैक्षणिक कारकीर्दीसोबत स्वतःचे चारित्र्य घडवण्यावर देखील समान भर देण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
जीवनातील प्रत्येक आव्हानाचा सामना आत्मविश्वासाने आणि न घाबरता करा असा सल्ला राजनाथ सिंह यांनी विद्यार्थ्यांना दिला. येत्या काळात भारताला एक सामर्थ्यशाली राष्ट्र बनवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी आशीर्वाद देखील दिले.

उपस्थित विद्यार्थ्यांवर स्नेहाचा वर्षाव करत, संरक्षणमंत्र्यांनी त्यांना मिठाईचे वाटप केले. अंदमान आणि निकोबार बेटांवरील स्थानिक आदिवासी कारागिरांनी तयार केलेल्या पारंपरिक हस्तकला स्मरणचिन्हे संरक्षणमंत्र्यांना दिल्यानंतर ही भेट संपन्न झाली. एकात्मिक संरक्षण दल, दिल्ली क्षेत्राचे मुख्यालय आणि अंदमान तसेच निकोबार बेटांचे नागरी प्रशासन यांच्या संयुक्त पाठबळासह, एएनसीने आयोजित केलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केले. संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्यासह एकात्मिक संरक्षण दल प्रमुख एअर मार्शल आशुतोष दिक्षित देखील या संवादाच्या वेळी उपस्थित होते.

दुर्गम बेटांवर वसलेल्या समुदायांतील युवा वर्गाला भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक संधी यांची तोंडओळख करून घेण्याची संधी देण्याच्या उद्देशाने ‘आरोहण: बेटापासून दिल्लीपर्यंत’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या कार्यक्रमपत्रिकेत लाल किल्ला, इंडिया गेट, राष्ट्रीय युध्द स्मारक तसेच ताज महाल सारख्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या तसेच दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ आणि राष्ट्रीय विज्ञान केंद्रासारख्या प्रमुख संस्थांच्या भेटींचा समावेश आहे. या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करून बेटांवरील भावी नेत्यांचे सक्षमीकरण करण्याप्रति सरकारची बांधिलकी दिसून येते.
* * *
शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156638)