राष्ट्रपती कार्यालय
सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि व्यापार आणि वाणिज्य मंत्री गॅन किम योंग यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली
Posted On:
13 AUG 2025 8:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2025
सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि व्यापार आणि वाणिज्य मंत्री गॅन किम योंग यांच्या नेतृत्वाखालच्या सिंगापूरच्या मंत्रिस्तरीय शिष्टमंडळाने आज (13 ऑगस्ट 2025) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. तिसऱ्या भारत-सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज (आयएसएमआर) बैठकीसाठी हे शिष्टमंडळ दिल्ली येथे आले आहे.

राष्ट्रपती भवनात शिष्टमंडळाचे स्वागत करताना राष्ट्रपतींनी नमूद केले की, अनिश्चित जागतिक वातावरणातही, भारत-सिंगापूर व्यापक धोरणात्मक भागीदारी भरभराटीला येत आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधाना 60 वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने या वर्षाच्या सुरुवातीला सिंगापुरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांच्या भारत भेटीचे त्यांनी स्मरण केले. त्या म्हणाल्या की, आयएसएमआरसह उच्च पातळीवरील अशा नियमित संवादामुळे दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंधांना सातत्याने गती मिळेल.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या निर्घृण हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात सिंगापूरने घेतलेल्या ठाम भूमिकेची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली.

राष्ट्रपती म्हणाल्या की, सिंगापूर हा भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरण, महासागर (MAHASAGAR) दृष्टीकोन आणि हिंद-प्रशांत महासागर दृष्टिकोनातील एक महत्त्वाचा भागीदार आहे. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, संस्कृती, शिक्षण आणि परस्परांच्या नागरिकांमधील देवाणघेवाण या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांची मजबूत भागीदारी आहे. त्या म्हणाल्या की, ही भागीदारी आता कौशल्य विकास, हरित अर्थव्यवस्था आणि फिनटेक (FinTech) यासारख्या सहकार्याच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये देखील विस्तारत आहे, ही समाधानाची बाब आहे.
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156179)