पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश

Posted On: 12 AUG 2025 7:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025

 

आदरणीय अतिथी, मान्यवर प्रतिनिधी, शिक्षक, मार्गदर्शक आणि माझ्या प्रिय बुद्धिमान युवा मित्रांनो, नमस्कार!

64 देशांमधील 300 हून अधिक बुद्धिमान युवकांशी जोडले जाणे हा आनंददायी अनुभव आहे. 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी मी तुमचे भारतात हार्दिक स्वागत करतो. भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी , अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो. शतकानुशतके, भारतीय आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत. उदाहरणार्थ, 5 व्या शतकात, आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते असे सांगणारे ते पहिलेच होते. अक्षरशः  त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला!,

आज, आपल्याकडे  लडाखमध्ये जगातील सर्वात उंच खगोलशास्त्रीय वेधशाळांपैकी एक आहे. समुद्रसपाटीपासून 4,500 मीटर उंचीवर,  ताऱ्यांशी हस्तांदोलन करण्याइतकी ती जवळ आहे! पुण्यातील आमचा महाकाय मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप जगातील सर्वात संवेदनशील रेडिओ टेलिस्कोपपैकी एक आहे. तो आपल्याला पल्सर, क्वासार आणि आकाशगंगांचे रहस्य उलगडण्यास मदत करत आहे!

भारत स्क्वेअर किलोमीटर अ‍ॅरे आणि लिगो-इंडिया सारख्या जागतिक महा-विज्ञान प्रकल्पांमध्ये अभिमानाने योगदान देत आहे.  दोन वर्षांपूर्वी, आपल्या चांद्रयान-3 ने इतिहास घडवला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरणारे आपण पहिले होतो. आदित्य-एल1  सौर वेधशाळेद्वारे आपण सूर्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. ते सौर ज्वाला, वादळे आणि - सूर्याच्या मूड स्विंग्सवर लक्ष ठेवते! गेल्या महिन्यात, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ल यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील त्यांची ऐतिहासिक मोहीम  पूर्ण केली.  हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता आणि तुमच्यासारख्या युवा  संशोधकांसाठी प्रेरणादायी होता.

मित्रहो,

भारत वैज्ञानिक कुतूहल जोपासण्यासाठी आणि युवा मनांना सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहे. अटल टिंकरिंग लॅबमध्ये प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे 1 कोटींहून अधिक विद्यार्थी STEM संकल्पना समजून घेत आहेत. यामुळे शिक्षण आणि नवोन्मेषाची संस्कृती निर्माण होत आहे. ज्ञानाची उपलब्धता अधिक लोकशाही पद्धतीने होण्यासाठी, आम्ही 'वन नेशन वन सबस्क्रिप्शन' योजना सुरू केली आहे. ही योजना लाखो विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये मोफत प्रवेश उपलब्ध करून देते. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की महिलांच्या सहभागात  भारत स्टेम डोमेनमधील आघाडीचा देश आहे. विविध उपक्रमांतर्गत संशोधन परिसंस्थेत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली जात आहे. आम्ही तुमच्यासारख्या जगभरातील तरुणांना भारतात अभ्यास, संशोधन आणि सहयोग करण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. कोणाला ठाऊक आहे की पुढील मोठी वैज्ञानिक प्रगती अशा भागीदारीतूनच घडेल!

मित्रांनो,

तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये मी तुम्हाला मानवतेच्या हितासाठी आपण कसे काम करू शकतो याचा विचार करण्यास प्रोत्साहित करतो. विश्वाचा शोध घेत असताना आपण हे देखील विचारले पाहिजे की अंतराळ विज्ञान पृथ्वीवरील लोकांचे जीवन कसे सुधारू शकेल? शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज अधिक चांगल्या पद्धतीने कसा मिळू शकतो? आपण नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावू शकतो का, जंगलातील आगी आणि वितळणाऱ्या हिमनद्यांचे निरीक्षण करू शकतो का? आपण दुर्गम भागांसाठी चांगली दूरसंचार सेवा निर्माण करू शकतो का? विज्ञानाचे भविष्य तुमच्या हातात आहे. कल्पनाशक्ती आणि करुणेने वास्तविक जगातील समस्या सोडवण्याची गरज आहे. मी तुम्हाला "तेथे बाहेर काय आहे?" असे विचारण्यास प्रोत्साहित करतो आणि ते आपल्याला येथे कशी मदत करू शकते ते देखील जरूर पाहा.

मित्रांनो,

आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या शक्तीवर भारताचा विश्वास आहे. हे ऑलिंपियाड ती भावना प्रतिबिंबित करते. मला सांगण्यात आले आहे की आतापर्यंतचे हे सर्वात मोठे ऑलिंपियाड आहे. हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल मी होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे आभार मानतो. उच्च ध्येय ठेवा, मोठे स्वप्न पाहा. आणि लक्षात ठेवा, भारतात, आम्ही मानतो  की आकाश ही मर्यादा नाही, ती फक्त सुरुवात आहे!

धन्यवाद.

 

* * *

सोनाली काकडे/सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2155768)