पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बेंगलुरू येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच उद्घाटन करताना केलेले भाषण

Posted On: 10 AUG 2025 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2025

 

नमस्कार!

‘‘बेंगळुरू नगरदा आत्मीया नागरिका बंधु -भगिनियरे, निमगेल्ला नन्ना नमस्कारगळु!!‘‘

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिध्दरमैया, केंद्रातील माझे सहकारी मनोहरलाल खट्टर, एच डी कुमारस्वामी, अश्विनी वैष्णव, व्ही सोमण्णा, शोभा जी, उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार, कर्नाटक सरकारचे मंत्री बी. सुरेश, विरोधी पक्षनेते आर अशोक, खासदार तेजस्वी सूर्या, डॉक्टर मंजूनाथ, आमदार विजयेंद्र येडियुरप्पा, आणि कर्नाटकमधील माझ्या बंधू, भगिनींनो,

कर्नाटकच्या भूमीवर पाऊल ठेवताच एकप्रकारे आपलेपण जाणवू लागते. इथली संस्कृती, इथल्या लोकांचे प्रेम आणि कन्नड भाषेतील गोडवा, मनाला थेट भिडणारा आहे. सर्वात प्रथम मी, बेंगलुरू शहराची अधिष्ठात्री देवी अण्णम्मा ताईच्या चरणी वंदन करतो. अनेक युगांपूर्वी नाड-प्रभू केम्पेगौडा यांनी  बेंगलुरू शहराची पायाभरणी केली होती. त्यांनी  अशा एका शहराची कल्पना केली होती की, हे शहर  आपल्या परंपरेशी जोडलेले असेल आणि त्याचबरोबर प्रगती करून नवीन उंचीही गाठेल. बेंगलुरू शहर सदोदित या चैतन्याने कार्यरत राहिले आणि या शहराने आपली परंपराही जतन केली. आणि आज बेंगलुरू शहर खूप  पूर्वी पाहिलेले एक स्वप्न साकार करीत आहे.

मित्रांनो,

बेंगलुरू शहर  नव भारताच्या उदयाचे प्रतीक बनले आहे. आणि अशा प्रकारे हे शहर  उदयोन्मुख होताना आपण पाहत आहोत. हे एक असे शहर आहे की, ज्याच्या आत्म्यामध्ये तत्व-ज्ञान आहे आणि ज्याच्या कृतीमध्ये तंत्र-ज्ञान आहे. हे एक असे शहर आहे की, ज्याने  माहिती तंत्रज्ञानाच्‍या वैश्विक नकाशावर भारताचा ध्वज फडकवला आहे. बेंगलुरूच्या यशोगाथेच्या मागे जर कोणाचा हात असेल तर तो आहे इथल्या लोकांचा! यामागे आहेत, तुम्हां सर्वांचे परिश्रम आणि तुम्हा सर्वांची  प्रतिभा !! 

मित्रांनो,

एकविसाव्या शतकामध्ये शहरी नियोजन आणि शहरी पायाभूत सुविधा या गोष्टींची आपल्या शहरांसाठी खूप आवश्यकता आहे. बेंगलुरूसारख्या शहराला आपल्या भविष्यासाठी तयार करायचे आहे. मागील काळामध्ये बेंगलुरूसाठी भारत सरकारच्या वतीने हजारो कोटी रूपयांच्या योजनांचा प्रारंभ केला गेला आहे. आज या अभियानाला नवीन गती मिळत आहे. आज बेंगलुरू मेट्रोची ‘यलो लाईन‘ सुरू झाली आहे. मेट्रो टप्पा-3 ची पायाभरणीही केली आहे. त्याचबरोबर देशाच्या वेगवेगळ्या भागात जाणा-या तीन नवीन वंदे भारत रेल गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. बेंगलुरू ते बेळगावी यांच्या दरम्यान वंदे भारत रेल सेवेला प्रारंभ झाला आहे. यामुळे बेळगावीच्या  व्यापार आणि पर्यटन यांना प्रोत्साहन मिळेल. याशिवाय, नागपूर ते पुणे आणि श्रीमाता वैष्णो देवी कटरा ते अमृतसर यांच्या दरम्यानही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत. यामुळे लाखो भक्तांना लाभ होईल. तिथल्या पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल. या सर्व प्रकल्पांबद्दल , वंदे भारत गाड्यांसाठी बेंगलुरू - कर्नाटक आणि देशातील लोकांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो,

‘ऑपरेशन सिंदूर‘ नंतर आज मी पहिल्यांदा बेंगलुरू इथे आलो आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेला मिळालेले यश, सीमेपलिकडे अनेक किलोमीटर आतमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त करण्याची ताकद आणि दहशतवाद्यांचे संरक्षण करणा-या पाकिस्तानला काही तासांमध्ये गुडघे टेकवण्यासाठी भाग पाडण्याची आपल्या सेनेची क्षमता आता  संपूर्ण जगाने पाहिली. हे नवीन भारताचे स्वरूप आहे. ऑपरेशन सिंदूरच्या या यशाच्या मागे असलेली खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या तंत्रज्ञानाची आणि संरक्षण खात्याने निर्माण केलेल्या ‘मेक इन इंडिया‘ची ताकदीची आहे. आणि यामध्ये बेंगलुरू आणि कर्नाटकातील युवकांचेही खूप मोठे योगदान आहे. आज यासाठी मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. 

मित्रांनो,

बेंगलुरूची आज ओळख जगातील मोठ्या शहरांच्या बरोबरीने होते. आपल्याला वैश्विक स्पर्धाही करायची आहे. इतकेच नाही तर नेतृत्वही करायचे आहे. ज्यावेळी आपली शहरे स्मार्ट होतील, वेगवान होतील,  कार्यक्षम होतील, त्याचवेळी आपण पुढे जावू शकणार आहे. म्हणूनच आज अत्याधुनिक पायाभूत सुविधांसाठी प्रकल्प पूर्ण करण्यावर आम्ही मोठ्या प्रमाणावर भर देत आहे. आज आरव्ही मार्ग ते बोम्मासंद्रा या ‘यलो लाईन‘ मेट्रोचा प्रारंभ झाला आहे. ही मेट्रो बेंगलुरूच्या काही महत्वपूर्ण भागाला एकमेकांशी जोडणार आहे. बसवनगुडी ते इलेक्ट्रॉनिक सिटीपर्यंतच्या प्रवासाला आता आणखी  कमी वेळ लागेल. यामुळे लाखो लोकांचे जीवन अधिक सुकर होईल, त्यांना सहजतेने कामावर जाणे-येणे शक्य होईल.

मित्रांनो,

आज ‘यलो लाईन‘च्या लोकार्पणाबरोबरच आम्ही मेट्रोच्या तिस-या टप्प्याची म्हणजे ‘ऑरेंज लाईन‘ची आधारशिला ठेवली आहे. ज्यावेळी ही मार्गिका सुरू होईल, त्यावेळी यलो लाईनबरोबर 25 लाख मेट्रो प्रवाशांना सुविधा उपलब्ध होईल. 25 लाख प्रवासी! यामुळे बेंगलुरूच्या वाहतूक प्रणालीला एक नवीन ताकद मिळेल, निर्माण झालेली  ही सुविधा  शहराला एका नवीन उंचीवर नेणारी ठरेल.  

मित्रांनो,

बेंगलुरू मेट्रोने देशाच्या सार्वजनिक पायाभूत विकासाचे एक नवीन मॉडेलही दिले आहे. बेंगलुरू मेट्रोच्या  अनेक महत्वाच्या स्थानकांसाठी इन्फोसिस फौंउडेशन, बायकॉन आणि डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या कंपन्यांनी काही प्रमाणात निधी दिला आहे. सीएसआरचा वापर करण्याविषयी हे मॉडेल एक मोठी प्रेरणा आहे. या अभिनव प्रयत्नांबद्दल मी कॉर्पोरेट क्षेत्राचे खूप-खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आज भारत जगातील सर्वाधिक वेगाने वृद्धिंगत होणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये आपली अर्थव्यवस्था 10 व्या क्रमांकावरून अव्वल पाचमध्ये आली आहे. आपण अतिशय वेगाने अव्वल तीनपैकी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने पुढे जात आहोत. हा वेग आपल्याला कसा मिळत आहे? हा वेग आपल्याला ‘रिफॉर्म- परफॉर्म - ट्रान्सफॉर्म’ या चैतन्यातून मिळला आहे. हा वेग आपल्याला कार्य करण्‍याचा स्वच्छ-शुद्ध हेतू आणि प्रामाणिक प्रयत्नांतून मिळला आहे. तुम्ही थोडे स्मरण करून पहा, वर्ष 2014 मध्ये मेट्रो फक्त पाच शहरांपुरतीच मर्यादित होती. फक्त पाच शहरांमध्ये! आता देशांतील 24 शहरांमध्ये एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त मेट्रोचे जाळे तयार झाले आहे. भारत आता जगातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे असलेला तीसरा देश बनला आहे. वर्ष 2014 च्या आधी जवळपास 20,000 किलोमीटर रेल मार्गाचे विद्युतीकरण झाले होते. याचा अर्थ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते 2014 पर्यंत हे काम झाले होते. गेल्या 11 वर्षांमध्ये 40,000 किलोमीटरपेक्षा जास्त रेल मार्गांचे विद्युतीकरण केले गेले आहे.

मित्रांनो,

जल,स्थल, नभ , असा कोणताही भाग आता राहिलेला नाही. मित्रांनो, जमीनच नाही, देशाच्या कामगिरीचा ध्वज आता आकाशामध्ये सातत्याने फडकत आहे. 2014 पर्यंत भारतामध्ये फक्त 74 विमानतळ होते. आता देशांतील विमानतळांची संख्या वाढून  ती 160 झाली आहे. नभातील कामामध्ये सिद्धी, भूमीवरील कामामध्ये सिद्धी आणि जल मार्गांचा संख्याही आता तितकीच वाढली आहे. 2014 मध्ये देशात फक्त तीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यरत होते. आता हा आकडा वाढून तो 30 झाला आहे.

मित्रांनो,

आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात देशाने मोठी झेप घेतली आहे. 2014 पर्यंत देशात केवळ 7 अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था आणि 387 वैद्यकीय महाविद्यालये होती. परंतु आज 22 एआयआयएमएस आणि 704 वैद्यकीय महाविद्यालये जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत. गेल्या 11 वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात एक लाखांहून अधिक नवीन पदव्युत्तर व पदवीपूर्व जागा उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळाल्या आहेत.

या 11 वर्षांत भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) ची संख्या 16 वरून 23, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटीएस)  ची संख्या 9 वरून 25, आणि भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएमएस) ची संख्या 13 वरून 21 झाली आहे. म्हणजेच, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक संधी आता उपलब्ध होत आहेत.

मित्रांनो,

देश ज्या गतीने पुढे जात आहे, त्याच गतीने गरीब आणि वंचितांचे जीवनमानही उंचावत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत 4 कोटींपेक्षा अधिक पक्की घरे वितरित करण्यात आली आहेत. आता केंद्र सरकार आणखी 3 कोटी घरांची उभारणी करणार आहे. केवळ 11 वर्षांत 12 कोटींपेक्षा अधिक स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. यामुळे देशातील कोट्यवधी माता-भगिनींना सन्मान, स्वच्छता आणि सुरक्षितता लाभली आहे.

मित्रांनो,

देशाच्या प्रगतीमागे आर्थिक विकास हा महत्त्वाचा घटक आहे. 2014 पूर्वी भारताचा एकूण निर्यात व्यवसाय सुमारे 468 अब्ज डॉलर इतका होता. आज तो 824 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. पूर्वी आपण मोबाईल आयात करत होतो, तर आज आपण मोबाईल हँडसेटच्या जगातील पाच प्रमुख निर्यातदारांपैकी एक आहोत. यात बंगळुरूचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

2014 पूर्वी इलेक्ट्रॉनिक्स निर्यात सुमारे 6 अब्ज डॉलर इतकी होती. ती आता 38 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे.

मित्रांनो,

11 वर्षांपूर्वी भारताचा ऑटोमोबाईल निर्यात व्यवसाय सुमारे 16 अब्ज डॉलर होता. आज तो दुप्पट झाला आहे आणि भारत जगातील चौथा सर्वात मोठा ऑटोमोबाईल निर्यातदार बनला आहे. या उपलब्धी आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपल्या वाटचालीला बळकटी देतात. आपण सर्वजण मिळून देशाला विकसित भारत बनवण्यासाठी पुढे जात आहोत.

मित्रांनो,

विकसित भारताची ही यात्रा डिजिटल इंडिया सोबत हातात हात घालून पुढे चालत आहे. इंडिया एआय मिशन सारख्या उपक्रमांमुळे भारत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे. तसेच भारताचा सेमीकंडक्टर मिशनही आता वेग पकडत आहे आणि लवकरच मेड इन इंडिया चिप देशाला प्राप्त होणार आहे.

आज भारत कमी खर्चातील उच्च तंत्रज्ञानाधारित अंतराळ मोहिमांचे जागतिक उदाहरण बनला आहे. म्हणजेच, भविष्यातील तंत्रज्ञानाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात भारत आघाडी घेत आहे. या प्रगतीची सर्वात विशेष बाब म्हणजे, गरीबांचे सशक्तीकरण हे आहे.

मित्रांनो,

देशभरात डिजिटायझेशन गावागावांत पोहोचले आहे. यूपीआयच्या माध्यमातून जगातील 50 टक्क्यांहून अधिक रिअल टाइम ट्रान्झॅक्शन्स भारतात होत आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सरकार आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होत आहे. तसेच देशात 2,200 हून अधिक सरकारी सेवा मोबाईलवर उपलब्ध आहेत. उमंग अ‍ॅपद्वारे नागरिक घरबसल्या सरकारी सेवा वापरत आहेत. डिजिलॉकरमुळे प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत सुलभता आली आहे. आता आपण एआय-आधारित सुरक्षा उपायांमध्येही गुंतवणूक करत आहोत.

आपला उद्देश आहे की, डिजिटल क्रांतीचा लाभ समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवावा. या प्रयत्नात बेंगळुरूने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मित्रांनो,

या सर्व यशांच्या पार्श्वभूमीवर आपली पुढील मोठी प्राथमिकता असावी, ती म्हणजे टेक आत्मनिर्भर भारत! भारतीय टेक कंपन्यांनी जागतिक स्तरावर आपली छाप निर्माण केली आहे. आपण जगासाठी सॉफ्टवेअर्स व प्रॉडक्ट्स विकसित केले आहेत. आता आपल्याला भारताच्या गरजांना प्राधान्य देत नवे प्रॉडक्ट्स विकसित करण्याच्या दिशेने अधिक वेगाने पुढे जावे लागेल.

आज प्रत्येक क्षेत्रात सॉफ्टवेअर व अ‍ॅप्सचा वापर वाढला आहे, आणि भारताने यामध्ये अग्रगण्य स्थान मिळवणे आवश्यक आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्येही भारताने नेतृत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन निर्मिती क्षेत्रात बेंगळुरू आणि कर्नाटकची उपस्थिती आणखी बळकट करावी लागेल.

माझा आग्रह आहे की, आपली उत्पादने "झिरो डिफेक्ट, झिरो इफ़ेक्ट" या तत्त्वावर आधारित असावेत, म्हणजे ते त्रुटीरहित असावेत आणि पर्यावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये. मला अपेक्षा आहे की, कर्नाटकमधील कौशल्य आत्मनिर्भर भारताच्या या दृष्टिकोनाचे नेतृत्व करेल.

भारत सरकारने कायदे ‘अपराधमुक्त’ करण्यासाठी जन-विश्वास विधेयक पारित केले आहे. आता जन-विश्वास 2.0 देखील सादर होणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनेही अशा कायद्यांची ओळख करून त्यामधील अनावश्यक फौजदारी तरतुदी हटवाव्यात.

आपण 'मिशन कर्मयोगी' कार्यान्वित केले आहे, जे शासकीय कर्मचाऱ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण प्रदान करते. राज्य सरकारांनीही या लर्निंग फ्रेमवर्कचा अवलंब करावा.

आपण आशापूर्ण जिल्हा कार्यक्रम आणि आशापूर्ण ब्लॉक कार्यक्रम यांवर भर दिला आहे. शिवाय राज्य सरकारनेही त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा भागांची निवड करून विशेष लक्ष द्यावे.

तसेच राज्य पातळीवरही नव्या सुधारणा सातत्याने पुढे नेत राहाव्या लागतील. मला विश्वास आहे की, आपले हे संयुक्त प्रयत्न कर्नाटकला नव्या विकासशिखरांवर घेऊन जातील. आपण सर्वजण मिळून विकसित भारताचा संकल्प सिद्ध करू.

याच भावनेने, मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना या विकास प्रकल्पांबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो.

खूप खूप धन्यवाद !

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/सोनल तुपे/सुवर्णा बेडेकर/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2155045)