कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता जारी झाल्यानिमित्त केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पटणा येथे शेतकऱ्यांना केले संबोधित


कृषी क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी तिचा आत्मा आहेत : शिवराज सिंह चौहान

Posted On: 02 AUG 2025 2:12PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी  योजनेचा 20 वा हप्ता जारी झाल्याच्या निमित्ताने बिहारमध्ये पटणा इथं आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संबोधित केले. या कार्यक्रमाला शेतकरी, अधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी चौहान यांनी शेतकऱ्यांचे, विशेषतः मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कठोर परिश्रमाचे  तसेच योगदानाचे कौतुक केले. कृषी क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी हा तिचा आत्मा असून, या शेतकऱ्यांची सेवा करणे ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीला नफा देणारी व्यवस्था  बनवण्याचा संकल्प मांडला असल्याचा उल्लेखही चौहान यांनी पुन्हा एकदा केला.   त्याअनुषंगानेच  पंतप्रधान-किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 3,77,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. याच योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी आज झालेल्या कार्यक्रमात 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतदेशभरातील लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य दिले गेले.

प्रति हेक्टर कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी, विशेषतः कमी उत्पादकता असलेल्या भागांमध्ये प्रधानमंत्री धन धान्य योजनेसारख्या प्रयत्नांवर भर दिला असल्याचे चौहान यांनी सांगितले. बिहारमधील मखाना उत्पादनाचे महत्त्वाचे योगदान आणि कृषी विज्ञानाला शेतीशी जोडण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दलही त्यांनी उपस्थितांना सांगितले.

यावेळी चौहान यांनी खते आणि कीटकनाशके वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले. पीक नुकसानीच्या बाबतीत भरपाई देण्यासाठी विविध योजनांतर्गत केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली. आता किमान आधारभूत किंमतीवर  पिकांची खरेदी केली जाते, यात उत्पादन खर्चावर 50 टक्के नफाही जोडला जातो अशी माहिती त्यांनी दिली. या सगळ्यातून केंद्र सरकारचा शेतकरी-केंद्रित दृष्टिकोन दिसून येतो असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांबाबतही त्यांनी उपस्थितांना सांगितले. थेट लाभ हस्तांतरणाच्या मदतीने केंद्र सरकार, शेतकऱ्यांना दिली जात असलेली मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल हे  सुनिश्चित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि भारताच्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्याचा संकल्प व्यक्त करत या कार्यक्रमाचा समारोप झाला.

***

सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2151812)