संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाचे 47 वे उपप्रमुख म्हणून व्हाइस अ‍ॅडमिरल संजय वत्सायन यांनी पदभार स्वीकारला

Posted On: 01 AUG 2025 3:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025

व्हाइस अ‍ॅडमिरल संजय वत्सायन (एव्हीएसएम, एनएम) यांनी आज 1 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय नौदलाचे 47 वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा वीरांना आदरांजली वाहिली.

व्हाइस अ‍ॅडमिरल संजय वत्सायन हे पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 71 व्या तुकडीचे माजी विद्यार्थी असून, 1 जानेवारी 1988 रोजी  ते  भारतीय नौदलात रुजू झाले होते. तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीतील तज्ज्ञ असलेल्या वत्सायन  यांनी आपल्या तीन दशकांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित नौदल कारकिर्दीत विविध प्रकारच्या सेवेत नेतृत्व, संचालनात्मक तसेच अधिकारी पदांवर जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

समुद्रावर कार्यरत असताना त्यांनी विविध आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे.  क्षेपणास्त्र विनाशक युद्धनौका आयएनएस मैसूर, आयएनएस निशंकच्या कमिशनिंग क्रूमध्ये तसेच तटरक्षक दलाच्या ICGS संग्राम या ओपीव्हीच्या प्री-कमिशनिंग क्रूमध्येही त्यांनी सेवा केली आहे. त्यांनी आयएनएस मैसूर या युद्धनौकेचे कार्यकारी अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी तटरक्षक दलाची नौका सी -5, क्षेपणास्त्र युद्धनौका आयएनएस विभुती आणि आयएनएस नाशक, क्षेपणास्त्र कॉर्वेट आयएनएस कुठार आणि क्षेपणास्त्र फ्रिगेट आयएनएस सह्याद्री यांचेही नेतृत्व केले आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये, त्यांनी नौदलाच्या पूर्व विभागाचे कमांडिंग ध्वज अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आणि गलवानच्या घटनांनंतर निर्माण झालेल्या सागरी  हालचालींच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण कार्य तैनाती आणि सराव मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या.

नौदल उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी संयुक्त संरक्षण कर्मचारी (Integrated Defence Staff) ऑपरेशन्सचे उपप्रमुख,  धोरण, योजना आणि सैन्य विकास विभागाचे उपप्रमुख (DCIDS - Policy, Plans and Force Development) म्हणून जबाबदारी सांभाळली. या काळात त्यांनी तिन्ही सैन्यदलांमध्ये लष्करी मोहिमांचा समन्वय, संयुक्तता, सैन्यविकास तसेच  स्वदेशी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणांची आखणी करण्यात महत्वाची भूमिका निभावली.

जयदेवी पुजारी स्वामी/राज दळेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2151253)