वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

11 वा राष्ट्रीय हातमाग दिन 7 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाणार


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि परराष्ट्र व्यवहार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा उपस्थित राहणार

उत्कृष्ट विणकरांना संत कबीर पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार

Posted On: 31 JUL 2025 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 जुलै 2025

11 वा  राष्ट्रीय हातमाग दिन 7 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे साजरा केला जाणार आहे.  राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, परराष्ट्र व्यवहार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा,  नीलम शमी राव, सचिव (वस्त्रोद्योग) आणि डॉ. एम. बीना , विकास आयुक्त (हातमाग) या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

देशभरातून सुमारे 650 विणकर या कार्यक्रमाला  उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त, परदेशी ग्राहक , प्रतिष्ठित व्यक्ती, निर्यातदार, वरिष्ठ सरकारी अधिकारी इत्यादी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

या कार्यक्रमात उत्कृष्ट विणकरांना 5  संत कबीर पुरस्कार आणि 19 राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले जातील. तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते अवॉर्ड  कॅटलॉग आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन होईल.

या कार्यक्रमाचा उद्देश भारताच्या हातमाग वारशाचे वैभव , लवचिकता आणि प्रासंगिकता प्रदर्शित करणे आणि आपल्या विणकरांच्या प्रतिभेचा आणि कारागिरीचा गौरव करणे हा  आहे.

या कार्यक्रमात पुढील बाबींचा समावेश असेल :

सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विणकर सेवा केंद्रांची दखल

विविध हातमाग योजनांअंतर्गत लाभार्थी प्रमाणपत्रांचे वितरण

देशभरातील प्रतिष्ठित विणकाम आणि वस्त्रे अधोरेखित करणारा  आघाडीच्या डिझायनरने आयोजित  केलेला एक भव्य फॅशन शो

दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाव्यतिरिक्त,1 ते 8 ऑगस्ट 2025 दरम्यान नियोजित इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये पुरस्कार विजेत्या हातमागाच्या नमुन्यांचे प्रदर्शन;  हातमागाचे थेट प्रात्यक्षिक; अनावरण - "हाट ऑन व्हील्स" (एक फिरते हातमाग दुकान  उपक्रम); जनपथ, नवी दिल्ली येथील हॅन्डलूम  हाट येथे विशेष हातमाग साडी प्रदर्शन आणि विक्री; नवी दिल्लीतील क्राफ्ट म्युझियम येथे पुनर्निर्माण  सामग्रीवर लक्ष केंद्रित करणारे विशेष प्रदर्शन; आयआयटी दिल्ली द्वारे लूम हॅकेथॉन; परदेशी ग्राहक, निर्यातदार आणि हातमाग विणकर यांच्यासमवेत  आंतरराष्ट्रीय हातमाग प्रदर्शन;  हातमाग उत्पादनांच्या निर्यातीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे. या कालावधीत नियोजित विविध उपक्रमांची सूची जोडली आहे.

दिनांक 7, ऑगस्ट 1905 रोजी कोलकाता येथील टाउन हॉल येथून सुरू झालेली स्वदेशी चळवळ हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक ऐतिहासिक क्षण होता  ज्यामध्ये स्वदेशी उत्पादने आणि उत्पादन प्रक्रियांच्या पुनरुज्जीवनावर भर देण्यात आला. या ऐतिहासिक चळवळीला मानवंदना  म्हणून, भारत सरकारने 2015 मध्ये 7 ऑगस्ट  हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केला, ज्याचा उद्देश आत्मनिर्भरतेची  भावना साजरी करणे  आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक परंपरेत हातमाग क्षेत्राच्या योगदानाचा गौरव करणे हा होता.

देशभरात राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जात आहे ज्यामध्ये विणकर सेवा केंद्रे , प्रमुख हातमाग समूह, भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था ,  राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था संकुले , राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळ , वस्त्रोद्योग समिती, विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे हातमाग विभाग इत्यादींचा समावेश आहे.

11 व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रतिज्ञा, सेल्फी, प्रश्नमंजुषा इत्यादी सोशल मीडिया मोहीम देखील राबवली जात आहे आणि ट्विट्स, फेसबुक, इंस्टाग्राम, इन्फ्लुएन्सर्स , स्थानिक व्हाट्सअॅप गट  , एफएम रेडिओ इत्यादींद्वारे देखील प्रचार केला जात आहे.

एनएचडी 2025 चे आठवडाभर चालणारे उपक्रम


सोनाली काकडे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2150878)