आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमे अंतर्गत भारताने 6 कोटी तपासण्यांचा टप्पा गाठला
प्रविष्टि तिथि:
22 JUL 2025 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2025
राष्ट्रीय सिकलसेल मिशन अंतर्गत, 7 कोटी तपासण्यांच्या निर्धारित उद्दिष्टापैकी एकूण 6 कोटी व्यक्तींची सिकलसेल आजाराची तपासणी (एससीडी) करण्यात आली आहे. तपासणी केलेल्यांपैकी 2.15 लाख व्यक्तींमध्ये या आजाराचे निदान झाले आहे, तर आणि 16.7 लाख व्यक्ती या आजाराच्या वाहक असल्याचे दिसून झाले आहे. याव्यतिरिक्त, संबंधित राज्यांनी तपासणी केलेल्या व्यक्तींना 2.6 कोटी आरोग्य कार्ड वितरित केली आहेत.
मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांनी त्यांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत तपासणीची अधिक टक्केवारी गाठून लक्षणीय प्रगती दर्शवली आहे. ओदिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये या आजाराचे निदान झालेले सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
एससीडी चाचणीसाठी प्रमाणित पॉइंट-ऑफ-केअर टेस्टिंग (पीओसीटी) किटचा वापर केला जात असून, ते जलद, विश्वासार्ह आणि खात्रीदायक परिणाम देतात. शिवाय, सर्व सहभागी राज्यांमधील चाचण्यांचा डेटा एकत्रित करण्यासाठी एक समर्पित डॅशबोर्ड आणि सिकलसेल आजार पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
भविष्यातील प्राधान्यक्रमांमध्ये उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढवणे, आणि या आजाराचे निदान झालेल्या अथवा वाहक म्हणून निदान झालेल्या व्यक्तींसाठी फॉलो-अप आणि समुपदेशन सेवा पुरवणे, याचा समावेश आहे.
1 जुलै 2023 रोजी मध्य प्रदेशातील शहडोल येथे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियानाची सुरुवात झाली होती. 2047 पर्यंत भारतातून सिकलसेल ॲनिमिया चे उच्चाटन करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट असून, जनजागृती, आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत या आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या आदिवासी भागातील 0 ते 40 वर्षे वयोगटातील 7 कोटी व्यक्तींची सार्वत्रिक तपासणी, आणि केंद्रीय मंत्रालये आणि राज्य सरकारांच्या सहयोगी प्रयत्नांद्वारे समुपदेशनाची तरतूद या उपायांचा यात समावेश आहे.
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2147080)
आगंतुक पटल : 13