उपराष्ट्रपती कार्यालय
राजकीय पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध राखण्याचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांनी केले आवाहन
सुधारणेसाठी सूचना म्हणजे निंदा किंवा टीका नाही, पक्षांनी रचनात्मक राजकारणात सहभागी व्हावे - उपराष्ट्रपतींनी केले आवाहन
Posted On:
20 JUL 2025 7:55PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज राजकीय पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध आणि परस्पर आदर राखण्याचे आवाहन केले. उपराष्ट्रपती म्हणाले “मी राजकीय क्षेत्रातील प्रत्येकाला आवाहन करतो - कृपया परस्परांचा आदर ठेवा. कृपया दूरचित्रवाणी किंवा अन्य कुठेही कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध अयोग्य भाषेचा वापर करू नका. ही संस्कृती आपल्याला लाभलेली सांस्कृतिक परंपरा नाही. आपण आपल्या शब्दांची काळजी घेतली पाहिजे.... वैयक्तिक टीका टाळा. मी राजकारण्यांना आवाहन करतो. राजकारण्यांना नावे ठेवणे थांबवण्याची वेळ आली आहे. विविध राजकीय पक्षांचे लोक इतर राजकीय पक्षांच्या वरिष्ठ लोकांना नावे ठेवतात. ही बाब आपल्या संस्कृतीला मारक आहे.
आपल्याकडे शिष्टाचाराची, परस्पर आदराची परिपूर्ण भावना असली पाहिजे - आणि ही आपल्या संस्कृतीची मागणी आहे.
“मित्रांनो, एक समृद्ध लोकशाही... सततचा राग….. जेव्हा तुम्हाला राजकीय कटुता दिसते, जेव्हा तुम्हाला राजकीय वातावरण वेगळा रंग धारण करताना दिसते तेव्हा तुमचे मन अस्वस्थ होते. मी देशातील सर्वांना आग्रह करतो की राजकीय कटुता कमी केली पाहिजे. राजकारण म्हणजे संघर्ष नाही, राजकारण कधीही एकदिश असू शकत नाही. वेगवेगळ्या राजकीय विचारप्रक्रिया असतील पण राजकारण म्हणजे एकच उद्दिष्ट साध्य करणे, पण ते कसे तर वेगवेगळ्या मार्गांनी.
आज उपराष्ट्रपती एन्क्लेव्ह येथे राज्यसभा इंटर्नशिप प्रोग्राम (RSIP) च्या आठव्या तुकडीतील सहभागींच्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करताना धनखड यांनी संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात अर्थपूर्ण चर्चा होण्याची गरज अधोरेखित केली. “आपण कणखर असले पाहिजे. आपण आपल्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवला पाहिजे. परंतु आपल्याला दुसऱ्या दृष्टिकोनाचाही आदर असला पाहिजे. जर आपण आपल्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवला आणि विचार केला की, "मीच एकमेव बरोबर आहे आणि बाकी सर्वजण चुकीचे आहेत" - तर ती लोकशाही नाही. ती आपली संस्कृती नाही. तो अहंकार आहे. तो अहंकार आहे. आपण आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवले पाहिजे. आपण दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा का आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे - ती आपली संस्कृती आहे. कोणत्याही वेळी काही विशिष्ट क्षेत्रात नेहमीच काही कमतरता असतील. आणि सुधारणेला नेहमीच वाव असतो. जर कोणी काहीतरी सुधारण्यासाठी सूचना दिली तर ती निंदा नाही. ती टीका नाही. ती केवळ पुढील विकासासाठी सूचना आहे. म्हणून, मी राजकीय पक्षांना रचनात्मक राजकारणात सहभागी होण्याचे आवाहन करतो. आणि हे आवाहन मी सर्व पक्षांना सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांना करतो.", असे उपराष्ट्रपती म्हणाले.
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2146275)