आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
रोममध्ये झालेल्या 88 व्या कोडेक्स कार्यकारी समितीच्या बैठकीत भरड धान्यांच्या बाबतीत असलेल्या भारतीय मानकांची केली प्रशंसा
Posted On:
19 JUL 2025 4:35PM by PIB Mumbai
भारताच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या संपूर्ण भरड धान्यांच्या समूह मानकाला कोडेक्स अॅलिमेंटेरियस आयोगाच्या (सीएसी47) गेल्या वर्षीच्या अधिवेशनात मान्यता मिळाल्यानंतर, नुकतेच इटलीमध्ये रोम येथील अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात 14 ते 18 जुलै 2025 दरम्यान झालेल्या 88 व्या कोडेक्स कार्यकारी समितीच्या (सी सी ई एक्स ई सी 88) अधिवेशनात भारताच्या नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले. भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत या कार्याचा आढावा घेण्यात आला. माली, नायजेरिया आणि सेनेगल हे या कार्याचे सह-अध्यक्ष म्हणून सहभागी आहेत. एप्रिल 2025 मध्ये पार पडलेल्या 11 व्या कोडेक्स धान्य, कडधान्ये आणि द्वीदल धान्य समितीच्या (सी सी सी पी एल 11) अधिवेशनात या समूह मानकांसाठीच्या अटी आणि शर्ती निश्चित करण्यात आल्या होत्या.
कोडेक्स अॅलिमेंटेरियस आयोगाच्या कार्यकारी समितीचा निर्वाचित सदस्य म्हणून या अधिवेशनात भारत सहभागी झाला आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन अन्न आणि कृषी संघटनेचे उपमहासंचालक आणि कॅबिनेट संचालक गॉडफ्रे माग्वेन्झी, तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य संवर्धन व रोग प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. जेरिमी फरार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कोडेक्स अॅलिमेंटेरियस आयोगाचे अध्यक्ष डॉ. अॅलन अझेगेल, सचिव सारा केहिल, आणि इतर सदस्य राष्ट्रांचे निर्वाचित प्रतिनिधी उपस्थित होते.
भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात ताज्या खजुरासाठीच्या नव्या आंतरराष्ट्रीय मानकांचा (Fresh Dates Standard) आढावा घेण्यात आला. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या 23 व्या ‘कोडेक्स ताजी फळभाजी समितीच्या (सी सी एफ एफ व्ही 23) अधिवेशनात या मानकाची शिफारस करण्यात आली होती. कार्यकारी समितीने या मानकांना अंतिम स्वरूप देण्यासाठी सी सी एफ एफ व्ही आणि भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले, आणि नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या कोडेक्स अॅलिमेंटेरियस कमिशन (सी ए सी 48) च्या 48 व्या सत्रातील पुढील मंजुरीसाठी त्यांना मान्यता दिली. ताजी हळद आणि ताज्या ब्रोकोलीसाठी आंतरराष्ट्रीय मानकांची तयारी करणाऱ्या नव्या प्रस्तावांमध्ये भारत सह-अध्यक्ष म्हणूनही आपली भूमिका बजावणार आहे.
भारताने कोडेक्स धोरणात्मक आराखडा 2026–2031 संदर्भात स्मार्ट कामगिरी निर्देशक (SMART KPIs) अंतिम करण्यासाठीच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. भारताने हे निर्देशक परिणामाधिष्ठित, मोजता येण्याजोगे आणि वास्तवाधारित असावेत, अशी शिफारस केली. तसेच भूतान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि टिमोर लेस्ते यांसारख्या शेजारी राष्ट्रांसाठी राबविलेल्या क्षमता विकास कार्यक्रमांची भारताकडून माहिती देण्यात आली, ज्याला अन्न आणि कृषी संघटनेने मान्यता दिली आहे. भारत 2014 पासून कोडेक्स मसाले आणि पाककला वनस्पती समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी निभावत आहे, याचाही यावेळी उल्लेख करण्यात आला.
भारताने या अधिवेशनात अन्य निष्क्रिय सदस्य राष्ट्रांना कोडेक्स ट्रस्ट फंडचा वापर मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यासह एकसारख्याच कार्यक्रमांसाठी करावा, असे आवाहन केले. भारताने सीएफटीच्या माध्यमातून भूतान व नेपाळसह केलेल्या प्रशिक्षण आणि क्षमता विकास उपक्रमांचा दाखला देत, अशा प्रकारच्या प्रशिक्षण उपक्रमांना कोडेक्स धोरणात्मक उद्दिष्टांतील प्रगती निर्देशक म्हणून समाविष्ट करण्याची शिफारस केली. भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आणि अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण (एफ एस एस ए आय ) च्या शिष्टमंडळाने ( सी सी ई एक्स ई सी 88 ) या बैठकीत भारताच्या हितसंबंधांची प्रभावी मांडणी केली.
***
माधुरी पांगे/राज दलेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2146123)