पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
भारताच्या ऊर्जा संक्रमणात पेट्रोलियम डीलर्सनी सक्रिय भागीदार बनायला हवे असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे प्रतिपादन
Posted On:
18 JUL 2025 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2025
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशभरातील पेट्रोलियम डीलर्सनी भारताच्या ऊर्जा संक्रमणात सक्रिय भागीदार बनण्याचे आवाहन केले आहे. ते काल ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन (एआयपीडीए) परिषदेच्या पूर्ण सत्राला संबोधित करत होते. एआयपीडीए ही पेट्रोलियम रिटेल आउटलेट डीलर्सचे (किरकोळ विक्री केंद्र धारक) प्रतिनिधित्व करणारी सर्वात मोठी राष्ट्रीय संस्था आहे. भारताच्या गतिशील ऊर्जा परिप्रेक्ष्याला अनुसरून, हरित उपक्रम स्वीकारणे, डिजिटल सज्जता वाढवणे आणि व्यवसाय मॉडेल विकसित करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

ऊर्जा परिसंस्थेत पेट्रोलियम डीलर्सची (व्यापारी) महत्त्वाची भूमिका ओळखून, केंद्रीय मंत्री पुरी यांनी डीलर्स कमिशन, ऑपरेशनल (परिचालन) खर्च आणि इतर समस्या असल्याचे मान्य केले. त्यांनी उपस्थितांना मंत्रालय "संघर्षावर नव्हे, तर सल्लामसलतीवर" विश्वास ठेवत असल्याचे स्पष्ट केले , आणि ऑक्टोबर 2024 मध्ये डीलर मार्जिनमध्ये केलेली सुधारणा आणि राज्यांतर्गत मालवाहतुकीच्या सुसूत्रीकरणाची अंमलबजावणी, ही विषमता दूर करण्यासाठी उचललेली ठोस पावले असल्याचे नमूद केले. ते पुढे म्हणाले की, अभिप्राय आणि तक्रार निवारणासाठी संरचित प्लॅटफॉर्म (व्यासपीठ) मजबूत केले जातील.

कोविड-19 साथरोग आणि जागतिक भू-राजकीय संघर्षांसह गेल्या पाच वर्षांतील आव्हानांचा आढावा घेताना पुरी म्हणाले की, भारताने केवळ या अडथळ्यांचा प्रभावीपणे सामना केला नाही, तर ऊर्जा विकासात जागतिक नेतृत्व म्हणूनही उदयाला आला. जागतिक अस्थिरता असूनही कच्च्या तेलाच्या वापरात जगभरात झालेल्या वाढीत भारताचा वाटा 16% असून पुढील तीन दशकांमध्ये होणार्या अशा वाढीत भारताचा 25% वाटा राहील, असा अंदाज आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळातही सरकारने नागरिकांना किफायतशीर आणि अखंड ऊर्जा पुरवठ्याची खात्री दिली, असे ते म्हणाले.
दररोज 67 दशलक्षपेक्षा अधिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या पेट्रोलियम डीलर्सच्या समर्पणाची प्रशंसा करताना, केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले, “तुम्ही भारतीय नागरिक आणि राष्ट्रीय ऊर्जा प्रणाली यांच्यातील भौतिक दुवा आहात.” ते म्हणाले की, भारत कच्च्या तेलाची आयात कमी करून, ऊर्जा स्त्रोतांमध्ये वैविध्य आणून नवीकरणीय ऊर्जेला चालना देत आहे, अशा वेळी, ऊर्जा न्यायाचे तीन स्तंभ, म्हणजेच, सुलभता, सहज उपलब्धता आणि किफायतशीरपणा, याची खात्री देण्यात डीलर्सची भूमिका महत्वाची ठरते.
केंद्रीय मंत्री पुरी यांनी विशेषत: पेट्रोलियम डीलर समुदायाला आवाहन केले की, त्यांनी आपल्या किरकोळ दुकानांच्या मोक्याच्या ठिकाणांचा लाभ घेऊन, कम्युनिकेशन हब, बॅटरी स्वॅपिंग स्टेशन, वॉटर किओस्क आणि डिजिटल वित्तीय सेवा, यासारख्या सेवा उपलब्ध करून, इंधनाव्यतिरिक्त अन्य मार्गांनी महसूल मिळवावा.
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2145963)