इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मृत व्यक्तींचे आधार क्रमांकनिष्क्रीय करून आधार डेटाबेसची अचूकता आणि अखंडता जपण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (यूआयडीएआय) सक्रीय उपाययोजना


यूआयडीएआयने भारताच्या रजिस्ट्रार जनरलशी सहयोग करून आधारनिष्क्रीयतेसाठी

1.55 कोटी मृत्यूच्या नोंदी मिळवल्या

यूआयडीएआयने 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मायआधार (myAadhaar) पोर्टलवर 'कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची नोंद' सेवा सुरू केली.

यूआयडीएआयने मृत्यू डेटा सेवेचा विस्तार केला: बँका आणि आधार संस्थांमधील कराराच्या शक्यतांचा शोध, आधारनिष्क्रीयतेसाठी शंभर पेक्षा जास्त वयाच्या आधार धारकांची पडताळणी करण्याची राज्यांना सूचना

Posted On: 16 JUL 2025 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025

 

यूआयडीएआय (UIDAI), अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने भारतातील आधार क्रमांक धारकांना कधीही, कुठेही स्वतःचे प्रमाणीकरण करण्यासाठी अनोखी ओळख आणि डिजिटल व्यासपीठ प्रदान केले आहे. आधार क्रमांक ही भारतातील रहिवासी आणि अनिवासी भारतीयांसाठी एक आगळी 12-अंकी डिजिटल ओळख आहे. 12 अंकी आधार क्रमांक हा कोणत्याही बुद्धिमत्तेचा वापर न करता प्राप्त केलेला सामान्य क्रमांक आहे आणि म्हणूनच, सर्व 12 अंकी क्रमांक हे आधार क्रमांक नसतात. कोणताही आधार क्रमांक दुसर् या व्यक्तीला पुन्हा दिला जात नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर ओळखीशी संबंधित फसवणूक अथवा अशा आधार क्रमांकाचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी संबंधित व्यक्तीचा आधार क्रमांकनिष्क्रीय करणे आवश्यक आहे.

मृत आधार क्रमांक धारकांचे आधार क्रमांकनिष्क्रीय करण्यापूर्वी त्यांची सद्यःस्थिती सत्यापित करणे देखील महत्त्वाचे आहे, कारण संबंधित आधार क्रमांक धरकावर त्याचे व्यापक परिणाम होऊ शकतात.

म्हणूनच, आधार डेटाबेसची अचूकता कायम ठेवण्यासाठी, यूआयडीएआयने विविध स्रोतांकडून मृत्यूच्या नोंदी मिळवण्यासाठी आणि योग्य पडताळणीनंतर आधार क्रमांक निष्क्रीय करण्यासाठी सक्रीयपणे पुढील उपाययोजना केल्या आहेत:

  1. अलीकडेच यूआयडीएआयने रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाला (आरजीआय) आधार क्रमांकाशी जोडलेल्या मृत्यूच्या नोंदी उपलब्ध करण्याची विनंती केली होती. आरजीआयने आतापर्यंत नागरी नोंदणी प्रणालीचा (सीआरएस) वापर करून 24 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील अंदाजे 1.55 कोटी मृत्यूच्या नोंदी उपलब्ध केल्या आहेत. योग्य पडताळणीनंतर सुमारे 1.17 कोटी आधार क्रमांकनिष्क्रीय करण्यात आले. सीआरएस नसलेली राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी देखील अशीच  प्रक्रिया अमलात आणली जात आहे. आतापर्यंत सुमारे 6.7 लाख मृत्यूंच्या नोंदी प्राप्त झाल्या असून, त्याचे निष्क्रियीकरण प्रगतीपथावर आहे.
  2. यूआयडीएआयने 9 जून 2025 रोजी “'कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची नोंद' ही नवीन सेवा सुरू केली. यामध्ये नागरी नोंदणी प्रणालीचा वापर करत असलेली 24 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदवल्या गेलेल्या मृत्यूंची मायआधार (myAadhaar) पोर्टलवर नोंद करता येईल. हे पोर्टल नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करते. कुटुंबातील सदस्याने स्वतःची ओळख पटवल्यानंतर, पोर्टलवर मृत व्यक्तीच्या इतर लोकसंख्याशास्त्रीय तपशीलांसह त्याचा आधार क्रमांक आणि मृत्यूचा नोंदणी क्रमांक द्यावा. कुटुंबातील सदस्याने सादर केलेल्या माहितीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, मृत व्यक्तीचा आधार क्रमांकनिष्क्रीय करण्याची अथवा न करण्याची पुढील कारवाई केली जाते. उर्वरित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पोर्टलशी जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
  3. याव्यतिरिक्त, यूआयडीएआय बँका आणि अशी माहिती जपणाऱ्या इतर आधार परिसंस्थांकडून मृत्यूच्या नोंदी मिळवण्याच्या शक्यता देखील पडताळत आहे.
  4. मृत आधार क्रमांक धारकांची ओळख पटवण्यासाठी यूआयडीएआय राज्य सरकारांचे देखील सहाय्य घेत आहे. प्रायोगिक तत्वावर म्हणून, 100 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आधार क्रमांक धारकांची लोकसंख्याशास्त्रीय माहिती राज्य सरकारांना उपलब्ध केली जात आहे, जेणेकरून आधार क्रमांक धारक जीवित आहे का, याची पडताळणी करता येईल. असा पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित आधार क्रमांक निष्क्रीय करण्यापूर्वी आवश्यक पडताळणी केली जाईल.

कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार क्रमांकाचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी, आधार क्रमांकधारकांनी मृत्यू नोंदणी अधिकाऱ्यांकडून मृत्यू प्रमाणपत्र घेतल्यावर मायआधार (myAadhaar) पोर्टलवर आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

* * *

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2145403)