अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

भारतासाठी ऐतिहासिक क्षण - अवकाश मोहीम पूर्ण करून भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले, भारताने अंतराळ जगतात चिरस्थायी स्थान मिळवले असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


अंतराळाच्या कक्षेत विश्वबंधू : भारताकडून जागतिक अंतराळ भागीदारीविषयीची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

असे प्रयोग यापूर्वी कधीही झाले नाहीत: डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 15 JUL 2025 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 जुलै 2025

 

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे अॅक्सिओम-4 (Axiom-4) अवकाश मोहिम यशस्वीरित्या पूर्ण करून पृथ्वीवर सुरक्षित परत येण्याची घटना हा जगासाठी अभिमानाचा क्षण आणि भारतासाठी गौरवाचा क्षण असल्याची भावना केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केली आहे. या कामगिरीतून भारताने जागतिक अंतराळ परिसंस्थेत आपले हक्काचे स्थान सुनिश्चित केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची कॅप्सूल समुद्रात उतरतानाची घटना (live splashdown) थेट पाहिली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित केले. भारतमातेचा एक तेजस्वी पुत्र सुखरूप परत आला आहे. भारताने अंतराळ जगतात एक चिरस्थायी स्थान मिळवले आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भारताचे अंतराळवीर आणि चार जणांचा समावेश असलेल्या अॅक्सिओम-4 या व्यावसायिक अवकाश मोहिमेचे महत्त्वाचे सदस्य ग्रुप कॅप्टन शुक्ला हे आज मंगळवार दि. 15 जुलै 2025 रोजी, भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3 वाजल्यानंतर प्रशांत महासागरात सॅन डिएगोच्या किनाऱ्यावर उतरलेल्या स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल ग्रेसमधून (SpaceX Dragon capsule Grace) पृथ्वीवर परतले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) 18 दिवसांच्या वास्तव्यानंतर, या अंतराळ यानाने 22.5 तासांचा प्रवास पूर्ण केला.

या मोहिमेच्या माध्यमातून जागतिक अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातल्या भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेचे दर्शन जगाला घडले असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले. या मोहिमेत यापूर्वी कधीही केले गेले नव्हते अशा प्रकारचे प्रयोग केले गेले, यातून भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक महत्त्वाकांक्षेचे एक नवे युग सुरू झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. या मोहिमेच्या यशाचा मानवजातीवर दूरगामी प्रभाव दिसून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुढील टप्प्यांबद्दलचीही माहिती दिली. सर्व चार अंतराळवीर वैद्यकीय तपासणीच्या अनुषंगाने तसेच पृथ्वीवरील वातावरणाशी पुन्हा जुळवून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याकरता येत्या 23 जुलैपर्यंत विलगीकरणात (quarantine) राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर 24 जुलैपासून, त्यांची इस्रोसोबत चर्चा सुरू होईल,असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वसुधैव कुटुंबकम्' (जग एकच कुटुंब आहे) या जागतिक दृष्टिकोनाचा संदर्भही त्यांनी आपल्या संबोधनात दिला. ही मोहीम जागतिक पातळीवर परस्पर वैज्ञानिक सहकार्यासाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित करणारी असल्याचे ते म्हणाले. एक खरा 'विश्वबंधू - एक जागतिक नागरिक अशा शब्दांत त्यांनी भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची प्रशंसा केली. शुक्ला यांनी अवकाशात वैश्विक बंधुत्वाची भावना पुढे नेली, असे ते म्हणाले. ही केवळ एक वैज्ञानिक मोहीम नसून, ही मोहिम मानवतेच्या परस्पर सामायिक प्रवासात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताच्या भूमिकेचे प्रतिबिंब आहे असे ते म्हणाले.

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला 17 ऑगस्टच्या आसपास भारतात परत येतील अशी शक्यताही डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. परदेशातील मोहिमेनंतरची मानक प्रक्रिया आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर ते भारतात परततील, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशाकडे पाहण्याचे आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले होते, ते आता प्रत्यक्षात साकारू लागले आहे असे ते म्हणाले. ही यशस्वी मोहीम म्हणजे केवळ एक सुरुवात आहे. या मोहिमेचे यश भारतीयांच्या भावी पिढ्यांना विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात आपली कारकीर्द घडवण्यासाठी प्रेरणा देत राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शुक्ला यांच्या अॅक्सिओम-4 मधील सहभागामुळे आगामी गगनयान मोहिमेसह जागतिक मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमांमध्ये भारताची वाढती भूमिका आणखी महत्त्वपूर्ण झाली असल्याचे ते म्हणाले. शुक्ला यांचे मोहिम पूर्ण करून पृथ्वीवर परत येण्याच्या घटनेतून, एका अवकाश मोहिमेच्या समारोपाच्या पलिकडेही अधिक काही घडले असल्याची जाणीव होते, यातून अंतराळ क्षेत्रातील परस्पर आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या भविष्याच्या दिशेने एक आश्वासक पाऊल पडले आहे असे ते म्हणाले.

 

* * *

सोनाली काकडे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2145045) Visitor Counter : 6