वस्त्रोद्योग मंत्रालय
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह जपानच्या अधिकृत दौऱ्यावर, जपानी वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींसह महत्त्वाच्या बैठकी
गांधीजींच्या सत्य, अहिंसा तसेच करुणेच्या आदर्शांची शाश्वत समर्पकता अधोरेखित करत, महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी त्यांच्या जपान दौऱ्याची अधिकृतपणे सुरुवात केली
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2025 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2025
गांधीजींच्या सत्य, अहिंसा तसेच करुणेच्या आदर्शांची शाश्वत समर्पकता अधोरेखित करत, महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी काल, दिनांक 14 जुलै 2025 रोजी त्यांच्या जपान दौऱ्याची अधिकृतपणे सुरुवात केली.
गिरीराज सिंह यांनी टोक्यो येथील भरातील दूतावासाला भेट दिली आणि राजदूत सीबी जॉर्ज यांच्यातर्फे भारत-जपान संबंध आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील संधींविषयी माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.
यानंतर, जगातील वस्त्रप्रावरणांच्या क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या फास्ट रिटेलिंग या कंपनीचे अध्यक्ष, प्रमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी तदाशी यानाई यांच्यासोबत केंद्रीय मंत्र्यांची धोरणात्मक बैठक झाली. सदर बैठकीत सोर्सिंग, उत्पादन आणि किरकोळ विक्री या संदर्भात भारतात फास्ट रिटेलिंग कंपनीच्या कार्याचा विस्तार करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी यावेळी जपानमधील आघाडीची वस्त्रप्रावरणे व्यापार आणि अस्सल साधने उत्पादक (ओईएम) असलेल्या स्टायलेम कंपनीच्या नेतृत्व पथकाची देखील भेट घेतली आणि त्यांना पीएम मित्र आणि इतर सरकारी उपक्रमांच्या माध्यमातून भारतातील कार्याचे प्रमाण वाढवण्यासाठी आमंत्रित केले.
एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाद्वारे केंद्रीय मंत्र्यांनी डाईसो उद्योगांच्या संचालकांची भेट घेतली. या संचालकांनी भारतात 200 दुकाने उघडण्याची तसेच येथे कापूस उत्पादनांची निर्मिती करण्यासंदर्भातील योजना जाहीर केली. भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि मदत अनुदानांचा वापर करून घेण्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.
दिवसाच्या अखेरीस, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जपानमधील प्रमुख वस्त्र निर्मिती आणि प्रावरणे कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत परस्पर संवादात्मक बैठक झाली. तांत्रिक वस्त्रे, धागे उत्पादन आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रसामग्री यामधील गुंतवणुकीला सदर बैठकीत प्रोत्साहन देण्यात आले. राजदूत सीबी जॉर्ज यांनी उद्घाटनपर भाषण केले तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रोहित कंसल यांनी वस्त्रनिर्मिती क्षेत्रातील महत्त्वाची सरकारी धोरणे आणि नव्याने उदयाला येत असलेल्या संधी यांची माहिती दिली.
* * *
सोनाली काकडे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2144953)
आगंतुक पटल : 7