युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी 18 ते 20 जुलै 2025 दरम्यान वाराणसीमध्ये 'युवा आध्यात्मिक शिखर परिषद' ची केली घोषणा


100 आध्यात्मिक संस्थांच्या युवा शाखा राष्ट्रीय परिषदेमध्ये व्यसन विरोधी मोहिमेचे करणार नेतृत्व

Posted On: 14 JUL 2025 9:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जुलै 2025

 

केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्ली येथे ‘विकसित भारतासाठी,व्यसन मुक्त युवा’ या संकल्पनेवर आधारित 'युवा आध्यात्मिक शिखर परिषद' घेण्याची घोषणा केली. हा एक परिवर्तनकारी पुढाकार असून यामागे भारताच्या युवा शक्तीला सक्षम बनवण्याचे  आणि व्यसनमुक्त समाज घडवण्याचे उद्दिष्ट आहे.

वार्ताहर  परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, “युवा हे विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करणारे अमृतकाळाचे दीपस्तंभ आहेत”. त्यांनी यावर भर दिला की भारताची 65 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या 35 वर्षांखाली आहे आणि सरासरी वय फक्त 28 वर्षे असल्यामुळे आपले युवा  हेच राष्ट्रीय विकासाचे प्रमुख वाहक आहेत.

या अत्यावश्यक विषयाकडे लक्ष देत भारत सरकार, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि आध्यात्मिक संघटनांच्या सहकार्याने एक सर्वसमावेशक, सर्वांगीण आणि भविष्योन्मुख नशा विरोधी मोहिम सुरू करत आहे. या प्रयत्नाचा केंद्रबिंदू म्हणजे गंगेच्या पवित्र घाटांवर होणारी तीन दिवसीय परिषद असणार आहे.  यात 100 आध्यात्मिक संस्थांच्या युवा  शाखांमधून निवडलेले 500 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हे प्रतिनिधी आत्मपरीक्षण व विचारमंथन करतील आणि व्यसनमुक्तीसाठी कृतीक्षम धोरणांची मांडणी करतील.

“ही परिषद मोठ्या प्रमाणावर एक जनआंदोलन उभे करेल, ज्याद्वारे व्यसनाचे स्त्रोत ओळखून त्यांना मुळापासून नष्ट केले जाईल आणि व्यसनमुक्त भारत साकारला जाईल,” असे डॉ. मांडविया यांनी सांगितले. परिषदेच्या समारोपानंतर ऐतिहासिक काशी घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात येईल, जे या सामूहिक निर्धाराचे प्रतीक असेल आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरचा आराखडा स्पष्ट करेल.

परिषदेत चार मुख्य सत्र खालील विषयांवर असतील:

1. व्यसनाधीनतेचे  युवांवर होणारे परिणाम

2. मादक पदार्थ विक्री साखळ्या व व्यावसायिक हितसंबंधांचे निर्मूलन

3. प्रभावी प्रचार व जनजागृती

4. 2047 पर्यंत व्यसनमुक्त भारत घडवण्याची दृढनिश्चयी  बांधिलकी

केंद्रीय मंत्र्यांनी 26 जुलै रोजी विजय दिवसाचे  औचित्य  साधत कारगिलमध्ये विशेष पदयात्रेची घोषणा केली आहे.

ही पदयात्रा स्थानिक युवा, माय भारत युवा क्लब्स आणि लष्कर प्रतिनिधी यांच्या सहभागाने पार पडेल. यात हुतात्म्यांना आदरांजली अर्पण  केली जाईल आणि फिट इंडिया चळवळीला प्रोत्साहन दिले जाईल.

युवा आध्यात्मिक शिखर परिषद आणि कारगिल विजय दिवस पदयात्रा यासंदर्भातील सर्व तपशील माय भारत प्लॅटफॉर्म ([https://mybharat.gov.in/](https://mybharat.gov.in/)) वर उपलब्ध असतील.

* * *

S.Kakade/G.Deoda/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2144702)