ग्रामीण विकास मंत्रालय
विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी ‘विकसित गाव’ घडवा : राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर यांचे आवाहन
Posted On:
14 JUL 2025 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2025
केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर यांनी 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी ‘विकसित गाव’ घडवण्याचे आवाहन केले आहे. नवी दिल्ली येथे आज ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कामकाज आढावा समितीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. विकसित गाव म्हणजे प्रत्येक कुटुंबाकडे मूलभूत सुविधेसह पक्के घर असेल, प्रत्येक खेडे दर्जेदार रस्त्यांनी जोडलेले असेल, असे चंद्रशेखर म्हणाले. प्रत्येक ग्रामीण तरुणाला रोजगाराच्या संधी असतील आणि प्रत्येक महिला सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असेल. हे केवळ स्वप्न नसून वास्तवात येणारी गोष्ट आहे. मात्र त्यासाठी आपल्याला नवचैतन्य नाविन्यपूर्ण विचार आणि पूर्ण निष्ठा व समर्पणाने कार्य करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

आपण केवळ योजना राबवत नसून, भारताच्या विकास कथेचा पुढील अध्याय लिहित आहोत, असे सांगत डॉ. चंद्रशेखर यांनी ग्रामीण विकास मंत्रालयाची भूमिका स्पष्ट केली. मंत्रालयाच्या विविध योजनांच्या कामगिरीबद्दल माहिती देताना चंद्रशेखर म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामीण बेरोजगारी आणि विशेषतः हंगामी स्थलांतराच्या विरोधात एक प्रभावी शस्त्र म्हणून काम करत आहे. दरवर्षी 90 हजार ते 1 लाख कोटी इतका गुंतवणूक खर्च होणाऱ्या या योजनेतून दरवर्षी 250 कोटी मनुष्य-दिवसांची रोजगारनिर्मिती केली जाते. आतापर्यंत 36 कोटींपेक्षा अधिक रोजगार पत्रिका वितरित करण्यात आल्या असून 15 कोटीहून अधिक कामगार सक्रिय लाभार्थी आहेत. केवळ रोजगार देण्याचा दृष्टिकोन न ठेवता, उपयुक्त व टिकाऊ मालमत्ता निर्मिती, कामांमध्ये विविधता, इतर विकास योजनांशी समन्वय आणि काम निवडीमध्ये समूहाचा सहभाग या गोष्टींवर भर देण्याची गरज, डॉ. चंद्रशेखर यांनी व्यक्त केली.

या बैठकीला केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान, ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव शैलेश कुमार सिंह तसेच केंद्र व राज्य सरकारांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
* * *
S.Kakade/R.Dalekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2144568)