कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून कापूस उत्पादनावर चर्चा करण्यासाठी बैठकीची घोषणा
कापसाची उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारण्यावर भर देऊन विचारमंथन : शिवराज सिंह चौहान
केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकरी बंधू-भगिनींकडून मागवल्या सूचना
Posted On:
09 JUL 2025 7:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2025
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज, कापूस उत्पादनासंबंधी 11 जुलै 2025 रोजी कोईम्बतूर इथे होणाऱ्या एका महत्त्वाच्या बैठकीची घोषणा केली. या महत्वपूर्ण बैठकीचा उद्देश सांगण्यासाठी आज शिवराज सिंह यांनी पीक-विशिष्ट बैठकांच्या मालिकेचा भाग म्हणून एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. या संदेशातून त्यांनी भारतातील शेतकरी बंधू-भगिनींना आपल्या सूचना आणि अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा व्हिडिओ संदेश:
माझ्या प्रिय कापूस पिकवणाऱ्या बंधू-भगिनींनो,
आपल्या देशात कापसाची उत्पादकता सध्या खूप कमी आहे. अलिकडच्या काळात, बीटी कापसावर टीएसव्ही कीडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादकता आणखी घटली आहे. कापूस उत्पादन वेगाने घटत आहे, ज्यामुळे आपले शेतकरी तीव्र संकटात सापडले आहेत. या कीडीच्या हल्ल्यांना प्रतिरोध करू शकतील, अशा हवामान-अनुकूल, उच्च-गुणवत्तेच्या बियाणांची वाणे विकसित करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, त्याअनुषंगानेच निविष्ठा खर्चात घट साध्य करून कापसाचे उत्पादन वाढवण्याचा सरकारचा संकल्प आहे.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी, 11 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता कोईम्बतूर येथे एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत कापूस उत्पादक शेतकरी, शेतकरी संघटना, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे प्रख्यात शास्त्रज्ञ, कापूस उत्पादक राज्यांचे कृषी मंत्री, राज्य सरकारी अधिकारी, कापूस उद्योगाचे प्रतिनिधी आणि कृषी विद्यापीठांचे तज्ञ सहभागी होणार आहेत.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, कापसाची उत्पादकता आणि गुणवत्ता दोन्ही सुधारण्याचे मार्ग शोधण्यात आम्ही स्वतःला झोकून दिले आहे. या संदर्भात आपल्या काही सूचना असल्यास, कृपया 18001801551 या टोल फ्री क्रमांकावर कळवाव्यात. मी तुमच्या सूचना अत्यंत गांभीर्याने विचारात घेईन आणि एकत्रितपणे, आपण आपल्या देशात कापूस उत्पादन वाढवण्यासाठी एक व्यापक कृती आराखडा तयार करूया.
S.Bedekar/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143501)