पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेव्हिअर मिली यांची घेतली भेट
Posted On:
06 JUL 2025 1:48AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष महामहीम जेव्हिअर मिली यांची भेट घेतली. पंतप्रधान कासा रोझादामध्ये पोहोचले, तेव्हा राष्ट्राध्यक्ष मिली यांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. काल बुएनोस आयर्समध्ये आगमनानंतर पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. ही भेट विशेष महत्त्वाची आहे, कारण 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला झालेली भारतीय पंतप्रधानांची ही पहिली द्विपक्षीय भेट आहे. भारत-अर्जेंटिना संबंधांचे हे एक महत्त्वाचे वर्ष आहे, कारण दोन्ही देश राजनैतिक संबंध स्थापनेच्या 75 वर्षांची पूर्तता साजरी करत आहेत. पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मिली यांचे आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे त्यांनी केलेल्या आतिथ्याबद्दल आभार मानले.
या दोन्ही नेत्यांनी मर्यादित स्वरूपात व शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केल्या. त्यांनी द्विपक्षीय संबंधांचा सर्वंकष आढावा घेतला व विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले. या क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या खनिजांचे उत्पादन, तेल व वायू, संरक्षण, अणुऊर्जा, शेती, विज्ञान व तंत्रज्ञान, शेतीमध्ये ड्रोनचा वापर, मत्स्योद्योग तसेच वीजप्रवाह वाहिन्यांचे निरीक्षण, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, यूपीआय, अंतराळ, रेल्वे, औषधनिर्माण, क्रीडा व जनतेचे परस्पर संबंध यांचा समावेश होता.
उभय नेत्यांनी चालू असलेल्या आर्थिक सहकार्याचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी नमूद केले की, द्विपक्षीय व्यापार स्थिर पातळीवर आहे, मात्र दोन्ही बाजूंनी व्यावसायिक संबंधांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी व्यापाराच्या स्वरूपात वैविध्य आणणे आवश्यक आहे. या संदर्भात त्यांनी भारत- ‘एमइआरसीओएसयूआर’ प्राधान्य व्यापार कराराच्या विस्तारावरही चर्चा केली.
पंतप्रधानांनी पहलगाम येथील अमानुष दहशतवादी हल्ल्याचा जोरदार निषेध केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष मिली यांचे आभार मानले व दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्यात अर्जेंटिनाने दाखवलेल्या एकजुटेचे कौतुक केले. दोन्ही नेत्यांनी मान्य केले की, दहशतवाद मानवतेसाठी एक गंभीर धोका आहे व या संकटाविरुद्ध जागतिक लढा मजबूत करण्याची आपली कटिबद्धता त्यांनी पुन्हा स्पष्ट केली.
नेत्यांनी सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी परस्पर सहकार्य सुरू ठेवण्याचे ठरवले. त्यांनी “ग्लोबल साउथ”च्या चिंतेला अधिक प्रभावीपणे आवाज देण्याचे आवाहन केले.
आपल्या भेटीच्या समारोपपूर्वी पंतप्रधानांनी बुएनोस आयर्स येथील महात्मा गांधी व रवींद्रनाथ टागोर यांच्या अर्धपुतळ्यांना पुष्पांजली अर्पण केली.
राष्ट्राध्यक्ष मिली यांनी पंतप्रधानांच्या ऐतिहासिक भेटीबद्दल त्यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष मिली यांना परस्पर सोयीच्या वेळेत भारत भेटीचे आमंत्रण दिले.
***
S.Pophale/N.Gaikwad/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2142658)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam