गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्रात पुणे येथे पूना लाईफस्पेस इंटरनॅशनल संस्थेचे भूमिपूजन
येत्या काही दिवसांत येथे बांधल्या जाणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्रात सहा हजारांहून अधिक विद्यार्थी करु शकतील वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास
Posted On:
04 JUL 2025 7:19PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज महाराष्ट्रात पुणे येथे पूना लाईफस्पेस इंटरनॅशनल (पीएचआरसी) संस्थेचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
येत्या काही दिवसांत पुणे शहरासह राज्यभरातील सहा हजार विद्यार्थी येथे बांधल्या जाणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्रात वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करतील, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात सांगितले. भविष्यात हा 14 एकरांचा परिसर पुणे आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला आरोग्य सेवा पुरवण्यासाठी उपलब्ध असेल, असेही त्यांनी सांगितले. पूना लाईफस्पेस इंटरनॅशनल लाईफ सायन्स ऑर्गनायझेशनने 14 एकर जागेत 1.4 दशलक्ष चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेल्या प्रकल्पाद्वारे वैद्यकीय सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय संशोधनाचा नवा अध्याय सुरू करण्याचा संकल्प केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
मोदी सरकारने वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाच्या जागांमध्ये दुप्पटीने वाढ केली आहे, तर पदव्युत्तर जागांमध्ये अडीच पट वाढ केली आहे, यासोबतच, प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून गरिबांना केवळ 20 टक्के दरात औषधे उपलब्ध करून दिली आहेत, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. 2013-14 मध्ये भारत सरकारचा आरोग्य अर्थसंकल्प 37 हजार कोटी रुपये होता आणि 2025-26 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी समग्र दृष्टिकोन ठेवत तो 1 लाख 37 हजार कोटी रुपयांवर नेल्याचे शहा यांनी सांगितले. देशातील नागरिकांचे आरोग्य सुधारावे यासाठी पंतप्रधानांनी या सर्व व्यवस्था अतिशय विचारपूर्वक आणि समग्र दृष्टिकोनातून केल्या आहेत, हे शहा यांनी अधोरेखित केले.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2142368)
Visitor Counter : 3