गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘विकास भी, विरासत भी’ या सूत्राने हजारो वर्षांचा योद्ध्यांचा इतिहास तरुणांसमोर आणत आहेत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
एनडीएमध्ये स्थापन करण्यात आलेला श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा पुतळा देशाच्या भावी सैनिकांना अशी प्रेरणा देईल, की भारताच्या सीमेला स्पर्श करायला कोणीही धजावणार नाही
स्वराज्य रक्षणासाठी देशाचे सैन्य आणि नेतृत्व आवश्यक ती पावले उचलणार असून ऑपरेशन सिंदूर हे त्याचे उदाहरण असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांचे प्रतिपादन
शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत घडवणे, ही 140 कोटी भारतीयांची जबाबदारी आहे: अमित शाह
Posted On:
04 JUL 2025 4:56PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुणे येथे श्रीमंत बाजीराव पेशवे 'प्रथम' यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाबरोबरच वारसा, हे सूत्र दिले असून, या अंतर्गत आपल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीमध्ये प्रेरणास्त्रोत असलेले हजारो लोक आणि इतिहास आपली युवा पिढी आणि योद्ध्यांसाठी उपलब्ध करून देणे अत्यंत महत्वाचे आहे.
ते म्हणाले की, पुण्याची भूमी ही स्वराज्याच्या संस्कारांचे उगमस्थान आहे. अमीत शाह म्हणाले की, 17 व्या शतकात स्वराज्याची हाक येथूनच उठली होती, आणि जेव्हा स्वराज्यासाठी इंग्रजांबरोबर लढण्याची वेळ आली तेव्हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सर्वप्रथम आवाज उठवला. ते म्हणाले की, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्या देशासाठी किती काही करू शकते, हे उदाहरण वीर सावरकर यांनी महाराष्ट्राच्या भूमीतून जगापुढे ठेवले.

अमित शाह म्हणाले की, देशभरात अनेक ठिकाणी बाजीराव पेशवे यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत, परंतु त्यांचे स्मारक उभारण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), हेच सर्वात योग्य ठिकाण आहे. ते म्हणाले की, भविष्यातील भारताच्या तीनही सेना दलांचे सूत्रधार इथूनच प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात. आपले भावी सैनिक येथे उभारण्यात आलेल्या बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या चरित्राचा अभ्यास करतील, आणि अनेक युगे भारताच्या सीमेला स्पर्श करण्याचे धाडस कोणीही करू शकणार नाही, असे अमीत शाह म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की युद्धकलेचे काही नियम कधीही कालबाह्य होत नाहीत आणि ते अमर असतात. ते म्हणाले की, युद्धात व्यूहरचना, वेग, समर्पण, देशभक्ती आणि बलिदानाची भावना हेच सैन्याला विजयी बनवतात. या सर्व गुणांचे सर्वोत्तम उदाहरण 500 वर्षांच्या भारतीय इतिहासात फक्त श्रीमंत बाजीराव पेशव्यांमध्येच आढळते. शाह म्हणाले की बाजीराव पेशवे यांनी 20 वर्षांमध्ये 41 युद्धे लढली आणि त्या सर्वांमध्ये विजय प्राप्त केला. ते म्हणाले की, ज्यांनी संपूर्ण आयुष्यात कधीही पराभवाला जवळ येऊ दिले नाही, त्या बाजीराव पेशव्यांसारख्या शूर योद्ध्याचा पुतळा बसवण्यासाठी सर्वात योग्य ठिकाण म्हणजे एनडीए अकादमीच असू शकते. अमित शाह म्हणाले की, बाजीराव पेशव्यांनी आपल्या कौशल्याने, रणनीतीने आणि शूर साथीदारांच्या मदतीने अनेक हरलेल्या लढायांचे विजयात रूपांतर केले. ते म्हणाले की, बाजीराव पेशवे यांनी सर्वत्र असलेल्या गुलामगिरीच्या खुणा मिटवून टाकल्या आणि तेथे स्वातंत्र्याचा दिवा लावण्याचे काम केले. शाह म्हणाले की, 20 वर्षांच्या संपूर्ण काळात कोणीही बाजीराव पेशव्यांना घोड्यावरून खाली उतरताना पाहिले नाही. ते म्हणाले की, पेशव्यांनी शनिवारवाड्याचे बांधकाम, जल व्यवस्थापन तसेच अनेक वाईट गोष्टींविरुद्ध लढा दिला. गृहमंत्र्यांनी सांगितले की, काही लोक बाजीराव पेशव्यांना ईश्वर दत्त सेनापती, अजिंक्य योद्धा आणि शिवशिष्योत्तम बाजीराव पेशवे असेही म्हणतात. बाजीराव पेशव्यांनी सर्व युद्धे स्वतःसाठी नाही तर देश आणि स्वराज्यासाठी लढली. ते म्हणाले की, बाजीराव पेशव्यांनी प्रत्येक युद्ध आपल्या मातृभूमीसाठी, धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी लढले आणि एक असा अमर इतिहास लिहिला, जो येणाऱ्या अनेक शतकांपर्यंत आणखी कोणीही लिहू शकणार नाही.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या छोट्या आयुष्यात केवळ हिंदवी स्वराज्य स्थापनेचेच काम केले नाही तर तरुणांच्या मनात स्वराज्याची मूल्ये रुजवली. ते म्हणाले की, शिवाजी महाराजांनंतर अनेक योद्ध्यांनी त्यांची परंपरा पुढे नेली आणि स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. श्री. शाह म्हणाले की जर शिवाजी महाराजांनी सुरू केलेला स्वातंत्र्यलढा पेशव्यांनी 100 वर्षे चालू ठेवला नसता तर भारताचे मूळ स्वरूप आज टिकले नसते. अमित शाह म्हणाले की, जेव्हा जेव्हा आयुष्यात निराशा येते तेव्हा बाल शिवाजी महाराज आणि श्रीमंत बाजीराव यांचे विचार मनात येतात आणि निराशा अनेक कोस दूर निघून जाते. ते म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील भारताची उभारणी करणे ही 140 कोटी भारतीयांची जबाबदारी आहे. स्वराज्य राखण्यासाठी, जेव्हा केव्हा गरज भासेल तेव्हा आपले सैन्य आणि नेतृत्व हे काम नक्की करेल आणि ऑपरेशन सिंदूर हे त्याचे एक उदाहरण आहे. शाह म्हणाले की, स्वराज्यासोबतच एका महान भारताची निर्मिती ही छत्रपतींचीच कल्पना होती की असा भारत निर्माण व्हावा जो स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या वेळी प्रत्येक क्षेत्रात सर्वप्रथम असेल. ते म्हणाले की, हे जीवनध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि बलिदानाची प्रेरणा देणारी श्रीमंत बाजीराव पेशव्यांपेक्षा उत्तम व्यक्ती आपल्या इतिहासात आणखी कोणी नाही.
***
S.Kane./R.Agashe/N.Mathure/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2142266)