गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले,“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोणत्याही ठिकाणी कार्यरत असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करांच्या टोळ्यांचा बीमोड करून आपल्या युवकांचे संरक्षण करण्यास आहे कटिबद्ध”

Posted On: 02 JUL 2025 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2025

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी जागतिक अंमली पदार्थ टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी) आणि सर्व संस्थांचे अभिनंदन केले आहे. अमित शहा म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोणत्याही ठिकाणी कार्यरत असलेल्या अंमली पदार्थ टोळ्यांचा बीमोड करून आपल्या युवकांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध आहे.”

एक्सवर पोस्ट करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी) आणि सर्व संबंधित संस्थांचे जागतिक अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त  केल्याबद्दल अभिनंदन. या तपासात विविध संस्थांनी उत्तम समन्वय साधत 8 जणांना अटक केली आणि 5 अंमली पदार्थांच्या खेपांची जप्ती केली, तसेच ही टोळी जगातील 4 विविध खंडांमध्ये आणि 10 पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत असल्यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही मोठ्या कारवाया सुरू झाल्या आहेत. तसेच आपल्या संस्था या टोळ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या क्रिप्टो पेमेंट्स आणि अज्ञात ड्रॉप शिपर्ससारख्या अत्याधुनिक पद्धतींवर सतत लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोणत्याही ठिकाणी कार्यरत असलेल्या अंमली पदार्थ तस्करांच्या टोळ्यांचा बीमोड करून आपल्या युवकांचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.

ऑपरेशन - मेड मॅक्स

अवैध औषध व्यापाराविरोधातील सर्वांत मोठ्या कारवायांपैकी एक, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या मुख्यालयातील कारवाई करणाऱ्या तुकडीने एक आंतरराष्ट्रीय औषध तस्करी रॅकेट यशस्वीपणे उद्ध्वस्त केले आहे. या टोळीने एनक्रिप्टेड डिजिटल प्लॅटफॉर्म्स, ड्रॉप शिपिंग मॉडेल्स आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करून नियंत्रित औषधे जगातील चार खंडांमध्ये तस्करीद्वारे पाठवली जात होती.

दिल्लीतील बंगाली मार्केटजवळ एका वाहनाची तपासणी करताना सुरू झालेली ही चौकशी, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये पसरलेल्या अत्याधुनिक गुन्हेगारी जाळ्यापर्यंत पोहोचली. या कारवाईतून एनसीबीच्या जागतिक पातळीवरील समन्वय क्षमतेचे दर्शन घडले आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करण्यात भारताचे महत्त्व देखील अधोरेखित झाले.

या ऑपरेशनमध्ये चार खंड आणि 10 हून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेले एक जागतिक नेटवर्क उघडकीस आले.

तपासाचा मागोवा: दिल्ली ते अलाबामा

25 मे 2026 रोजी, गुप्त माहितीच्या आधारे, एनसीबी मुख्यालयाच्या ऑप्स टीमने दिल्लीतील मंडी हाऊसजवळ एका कारची तपासणी केली. या कारमधील दोन प्रवाशांपैकी एक प्रवासी नॉयडामधील एक नामांकित खासगी विद्यापीठाचा बी. फार्मा पदवीधर होता, यांच्या ताब्यातून 3.7 किलो ट्रामाडोल टॅब्लेट्स जप्त करण्यात आल्या.

तपासादरम्यान दोघांनी अमेरिकेतील, युरोपमधील आणि ऑस्ट्रेलियातील ग्राहकांना औषधी गोळ्या विकण्यासाठी एका प्रमुख भारतीय व्यवसाय ते व्यवसाय व्यासपीठावर विक्रेता म्हणून व्यापार चालवत असल्याची कबुली दिली.

या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून तपास पथक रुरकी येथील एका स्टॉकिस्टपर्यंत पोहोचले, त्यानंतर दिल्लीच्या मयूर विहारमधून एका मुख्य सहकाऱ्याला अटक करण्यात आली. त्याने कर्नाटकातील उडुपी येथील एका संपर्क सूत्राबाबत माहिती दिली, जी व्यक्ती अमेरिकेसाठी मोठ्या प्रमाणात विक्री व्यवस्थापन करत होती.

उडुपीहून पुढे उलगडलेला तपशील – 50 आंतरराष्ट्रीय कन्साईनमेंट्स उघड

एनसीबीला उडुपी येथून मिळालेल्या माहितीवरून 50 आंतरराष्ट्रीय कन्साईनमेंट्स (consignments) उघडकीस आल्या, ज्यामध्ये पुढीलप्रमाणे वितरण करण्यात आले होते:

* 29 पार्सल्स अमेरिका ते अमेरिका

* 18 पार्सल्स ऑस्ट्रेलिया ते ऑस्ट्रेलिया

* 1 पार्सल एस्टोनिया, 1 स्पेन आणि 1 स्वित्झर्लंडला.

ही सर्व माहिती आंतरराष्ट्रीय भागीदार संस्थांना आणि इंटरपोलला सामायिक करण्यात आली. या माहितीच्या आधारे अमेरिकेतील अलाबामा मध्ये अमेरिकन डीईए (ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन) ने मोठ्या प्रमाणावर नियंत्रित औषधांचा साठा हस्तगत केला आणि एक मोठा री-शिपर व हवाला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली.

गुप्ततेसाठी बांधलेले नेटवर्क

टेलिग्राम सारख्या एन्क्रिप्टेड संपर्क मंचावरून हे सिंडिकेट चालवले जाते. क्रिप्टो करन्सी पेमेंट्स , वेस्टर्न युनियन यासारख्या रकमा भरणा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमांवर आणि ओळखले जाऊ नये म्हणून जहाज वाहतुकीद्वारे माल पोहोचता करण्याच्या अनाम आंतरराष्ट्रीय व्यवस्थांवर ते विसंबून असते. डिजिटल न्यायवैद्यक तपासानुसार आणखी दोन भारतीय नागरिकांना नवी दिल्ली आणि जयपूर इथून अटक झाली आहे. ते मालवाहतूक आणि पुरवठा या बाजूचे व्यवहार सांभाळत होते. ही कामे करणारे त्यांच्या स्वतःच्या देशांमध्ये माल पोहोचवत नसत तसेच कायदेशीर परिणाम टाळण्यासाठी नेटवर्क मधल्या इतर वाहतूकदारांमार्फत त्यांच्याशी संपर्क करता येत असे.

यातील मुख्य सूत्रधार, जो आंतरराष्ट्रीय सूत्रे आणि आर्थिक व्यवहार यांचे समन्वय सांभाळत होता त्याची ओळख पटली असून तो संयुक्त अरब अमिरातीमध्ये असल्याचे आढळले आहे.‌ अंमली पदार्थ नियंत्रण विभाग या संदर्भात संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात असून यावर सक्रीयपणे काम करत आहे.

ऑस्ट्रेलियामधील बेकायदेशीर कारखान्याशी संबंध

ऑस्ट्रेलियामध्ये गुप्तपणे गोळ्या उत्पादन करण्याचा कारखाना असल्याचे आणि तो या जाळ्याशी थेट संबंधित असल्याचे अधिक तपासानंतर आढळून आले आहे. या युनिटचे काम ऑस्ट्रेलियातील कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी यशस्वीपणे मोडून काढले तरी इतर न्यायालयीन कक्षेतील कामकाज अजूनही सुरू आहे.

अमेरिकेने उचललेली पावले

भारताच्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाने सामायिक केलेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार झालेल्या लक्षणीय घडामोडीतून अमेरिकेच्या अमली पदार्थ अंमलबजावणी व्यवस्थापनाने (US DEA) आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ वाहतूक जाळ्यातील महत्त्वाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. घडामोडीतील समन्वयाचा माग घेतल्यानंतर जॉईन हॉल या महत्त्वाच्या माणसाला अलाबामामध्ये अटक केल्यानंतर बंदी असलेल्या औषधांच्या सतरा हजार हून अधिक गोळ्यांचा साठा हस्तगत करण्यात आला.

या कार्यवाहीदरम्यान अधिकाऱ्यांनी वरवर प्रतिष्ठित वाटणारी आणि तंत्रज्ञान संबंधित वाहतुकीशी संबंधित असल्याचे भासणारी परंतु या जाळ्याशी संलग्न असलेली ‌अनेक क्रिप्टो करन्सी वॉलेट आणि वाहतूक होत असलेल्या पार्सल्सचे मूळ रूप उघड केले. डिजिटल मिळकती आणि पार्सल याबाबतचे हे शोध कार्य आणि अंमलबजावणी कारवाई अजूनही सुरू आहे.

या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये अजून एक महत्त्वाची घटना म्हणजे या जाळ्यातील प्रमुख मनी लॉन्डरर हा भारतीय-अमेरिकन व्यक्ती असून सध्या अमेरिकेत या व्यक्तीवर आरोपपत्र दाखल आहे. या बेकायदेशीर व्यवसायाचा आर्थिक कणा मोडून पडण्यासाठीची ही एक महत्त्वाची बाब आहे.

याशिवाय अमेरिकन अंमली पदार्थ अंमलबजावणी संस्थेने पाच पार्सल हस्तगत करण्यात यश मिळवल्यामुळे गुंगी आणणारे औषध म्हणून दुरुपयोग केला जाणाऱ्या 700 ग्रॅम झोल्पीडेम गोळ्या पकडण्यात आल्या.

कामाची पद्धत : प्रतिष्ठित भासणारे जागतिक जाळे उद्ध्वस्त

शोधकार्यातून हे उघडकीला आले की या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ वाहतूक जाळ्याचा मुख्य सूत्रधार हा संयुक्त अरब अमिरातीच्या बाहेरून कारवाया करत होता आणि तिथूनच मागणी आणि पुरवठा या दोन्ही गोष्टी उच्चस्तरीय समन्वय आणि त्यातील योग्य प्रकारे विभागणी यासह संचालित करत होता.

यातील ऑर्डरचे मॉडेल म्हणजे मागणीची कार्यवाही महत्त्वाच्या B2B मंचावरून होत होती जिथे हॅण्डलर्स हे प्रीमियम वेंडर गटाचे वर्गणीदार म्हणून स्वतःची ओळख ठळक करत संभाव्य ग्राहकांना आकर्षून घेत होते. येणाऱ्या विक्रीच्या मागण्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी हा गट एक व्यवस्थितपणे कार्यरत असणारे कॉल सेंटर चालवत होता. उडुपीमध्ये असलेल्या या कॉल सेंटरमध्ये जवळपास दहाजण काम करत होते आणि त्यातले बहुतांश कर्मचारी या व्यवसायाच्या बेकायदेशीर स्वरूपाबद्दल अनभिज्ञ होते.

एकदा मागणी निश्चित झाल्यानंतर क्रिप्टोकरेन्सी च्या माध्यमातून आगाऊ रक्कम जमा केली जात असे जी पुढे जाऊन दहा ते पंधरा टक्के कमिशन कापून घेऊन पुरवठा मॉडेल बघणाऱ्यांकडे सुपूर्त केली जात असे.

पुरवठा मॉड्युल यातील दहा टक्के राखून ठेवून इतर भरणा रकमेत काहीही बदल न करता ते विविध देशांमध्ये असलेल्या पुढील वाहतूकदारांकडे सोपवत असत. हे पुढील वाहतूकदार बंदी असलेल्या पदार्थांच्या वाहतुकीतला शेवटचा टप्पा हाताळत.

या सर्व व्यवसायाच्या पसाऱ्याची व्यवस्थित आखणी करून ग्राहकांनी पुन्हा पुन्हा मागणी करावी या दृष्टीने पुनर्विवाहतूक करणारे किंवा मालाचा साठा करणारे यांची भरती केली जात होती ज्यामुळे हे जाळे सीमापारही व्यवस्थित वाढत होते. आपल्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांनी यातल्या बऱ्याचशा साठेदारांना शोधून काढले आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुरू आहे .

या गुंतागुंतीच्या जाळ्याची रचना ही बेकायदेशीर व्यापाराच्या आधुनिक रूपामध्ये डिजिटल मंच क्रिप्टो करन्सी आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक यांचा वाढता वापर दर्शवते. यातूनच जागतिक स्तरावरील सहकार्याचे तसेच अशा प्रकारच्या व्यवहारांचा माग घेण्यासाठी माहितीची देवाण-घेवाण यांचे महत्त्व अधोरेखित करते.

सुरू असलेला आर्थिक तसेच सायबर तपास

आत्तापर्यंत या प्रकरणात आठ जणांना अटक झाली आहे. क्रिप्टोवॉलेट आणि आर्थिक माग तसेच हवाला मार्ग हे सर्व शोध कार्य सुरू आहे . प्रतिबंधित औषधांच्या विक्रीची थेट जाहिरात करणाऱ्या ऑनलाइन बेकायदेशीर औषध विक्रेत्याना रोखण्यासाठी अमली पदार्थ प्रतिबंधक संस्था ही खाजगी क्षेत्रातील मंचाचा वापर करून विक्रेत्यांना हुडकून काढण्यासाठी कार्यरत आहे.


S.Patil/G.Deoda/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2141677)