गृह मंत्रालय
नवीन फौजदारी कायद्यांना एक वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित “न्याय व्यवस्थेतील विश्वासाचे सुवर्ण वर्ष” या कार्यक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले संबोधित
Posted On:
01 JUL 2025 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2025
नवीन फौजदारी कायद्यांना एक वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्ली येथे आज आयोजित "न्याय व्यवस्थेतील विश्वासाचे सुवर्ण वर्ष" या कार्यक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले.
अमित शाह यांच्या हस्ते आज नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले. शाह यांनी नमूद केले की जेव्हा हे प्रदर्शन यापूर्वी चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आले होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांना देशाच्या प्रत्येक राज्यात हे प्रदर्शन आयोजित करण्याचे निर्देश दिले होते.
पत्रकार, वरिष्ठ पोलिस अधिकारी, बार असोसिएशनचे सदस्य, सर्व न्यायिक अधिकारी तसेच विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी हे प्रदर्शन पाहू शकतील आणि नवीन फौजदारी कायद्यांबद्दल जाणून घेऊ शकतील याची खात्री करणे हा यामागील उद्देश होता. या महत्त्वपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल शाह यांनी केंद्रीय गृह सचिव आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.
अमित शाह म्हणाले की, नवीन फौजदारी कायदे येत्या काळात भारतीय फौजदारी न्याय व्यवस्थेत मूलभूत बदल घडवून आणतील. त्यांनी सांगितले की, पूर्वी आपल्या न्याय व्यवस्थेतील सर्वात मोठी समस्या ही होती की न्याय कधी मिळेल हे कोणालाही माहीत नसे. गृहमंत्र्यांनी सांगितले की, जवळजवळ तीन वर्षांत या कायद्यांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यानंतर देशात दाखल एफआयआरमध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्याय मिळेल.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, नवीन कायद्यांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित अनेक तरतुदींचा समावेश आहे, ज्या एकदा अंमलात आणल्यानंतर, गुन्हेगारांना संशयाचा फायदा घेऊन शिक्षेपासून वाचण्याची एकही संधी देणार नाहीत. ते म्हणाले की, नवीन फौजदारी न्याय प्रणाली पूर्णपणे अंमलात आल्यानंतर आपल्या देशातील शिक्षेचे प्रमाण लक्षणीयरीत्या सुधारेल आणि गुन्हेगारांना निश्चितच शिक्षा होईल.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये, सविस्तर सल्लामसलत करून लहानसहान त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत आणि बहु-हितधारक दृष्टिकोनातून बरेच काम केले गेले आहे.
* * *
S.Kane/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141390)