राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महायोगी गुरू गोरखनाथ आयुष विद्यापीठाचे उद्घाटन
Posted On:
01 JUL 2025 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (1 जुलै 2025) उत्तर प्रदेशमधील गोरखपूर इथे महायोगी गुरू गोरखनाथ आयुष विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, महायोगी गुरू गोरखनाथ आयुष विद्यापीठ आपल्या समृद्ध प्राचीन परंपरांचे आधुनिक केंद्र आहे. हा उद्घाटन समारंभ वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय सेवा क्षेत्रातील विकासाचा केवळ उत्तर प्रदेशातीलच नाही तर देशातील महत्त्वाचा टप्पा आहे. या विद्यापीठातील आधुनिक सेवा आता अनेक नागरिकांना मिळू शकतील याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला. या विद्यापीठाशी संलग्न 100 आयुष महाविद्यालयांनाही आता या सर्वोत्कृष्टतेचा लाभ मिळेल.

आपल्या सार्वजनिक जीवनाविषयी सांगताना राष्ट्रपती म्हणाल्या की, सार्वजनिक जीवनात लोकांची मदत करताना आपल्या वैयक्तिक आरामाचा त्याग करावा लागतो. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोककल्याणाप्रतीच्या समर्पित भावनेची त्यांनी प्रशंसा केली. मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच राज्यातील आरोग्य, शिक्षण व कृषी पायाभूत सुविधांचा विकास झाल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. लोकप्रतिनिधींनी सुरू केलेल्या कल्याणकारी योजना पुढे चालू ठेवण्याचे आवाहन त्यांनी डॉक्टर्स, परिचारिका आणि प्रशासकांना केले. व्यवसाय स्वीकारताना घेतलेल्या शपथेबाबत आत्मचिंतन करा असा सल्ला त्यांनी सर्वांना दिला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आरोग्य हीच संपत्ती अशी एक म्हण आहे. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी लोकांना केले. भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनविण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल असे सांगून बैठी जीवनशैली असलेल्या लोकांसाठी योग फायदेशीर आहे असे त्या म्हणाल्या. नियमितपणे योग करण्याचा सल्ला त्यांनी जनतेला दिला.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
S.Kane/S.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141352)