गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते तेलंगणातील निजामाबाद इथे राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करून देशभरातील, विशेषतः तेलंगणातील लाखो हळद उत्पादक शेतकऱ्यांची 40 वर्षांपासूनची मागणी पूर्ण केली
Posted On:
29 JUN 2025 7:09PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शाह यांनी आज तेलंगणातील निजामाबाद इथे राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करून देशभरातील, विशेषतः तेलंगणातील लाखो हळद उत्पादक शेतकऱ्यांची 40 वर्षांपासूनची मागणी पूर्ण केली असल्याची बाब त्यांनी आपल्या संबोधनात नमूद केली. निजामाबाद अनेक दशकांपासून हळदीची राजधानी म्हणून ओळखले जाते आणि इथले शेतकरी शतकानुशतके हळदीचे उत्पादन घेत असतानाही, ती जागतिक बाजारपेठेत पोहोचलेली नव्हती असेही त्यांनी सांगितले. आता राष्ट्रीय हळद मंडळाच्या स्थापनेमुळे पुढच्या 3 ते 4 वर्षांत निजामाबादची हळद जगभरातील अनेक देशांमध्ये पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय हळद मंडळ औपचारिकरित्या कार्यरत झाल्यानंतर हळद उत्पादक शेतकऱ्यांची मध्यस्थांच्या बेडीतून सुटका होईल असे ते म्हणाले. राष्ट्रीय हळद मंडळ हळदीच्या पॅकेजिंग, ब्रँडिंग, विपणन आणि निर्यातीसाठी एक परिपूर्ण साखळी प्रस्थापित करेल, असे त्यांनी सांगितले. हळद ही संसर्गजन्य विषाणू प्रतिबंधक, कर्करोग प्रतिबंधक आणि दाह प्रतिबंधक असून, हळदीच्या औषधी गुणधर्मांमुळे ती जगभरात एक चमत्कारक गुणधर्माचे प्रभावशाली औषध म्हणून ओळखली जाते ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

केंद्र सरकारने 2030 पर्यंत एक अब्ज डॉलर्स मूल्याच्या हळदीच्या निर्यातीचे लक्ष्य निर्धारीत केले असून, त्यासाठीची आवश्यक असलेली सर्व तयारीही या आधीच केली असल्याची माहिती अमित शाह यांनी उपस्थितांना दिली. हळदीचे कमाल मूल्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे याची सुनिश्चिती करण्याचे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये हळदीच्या खरेदीला प्रोत्साहन देण्याचे आणि संभाव्य बाजारपेठांमध्ये भारतीय हळदीच्या औषधी गुणधर्मांचा प्रचार प्रसार करण्याचे काम राष्ट्रीय हळद मंडळ करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय हे मंडळ भारतीय हळदीची गुणवत्ता आणि सुरक्षा मानके जागतिक मानकांशी सुसंगत असल्याचीही सुनिश्चिती करेल, पॅकेजिंगसाठी योग्य व्यवस्था उभारेल आणि निर्यातीशी संबंधित कोणतेही अडथळे टाळण्याच्या दृष्टीने हळदीच्या काढणी संदर्भात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे तसेच या संदर्भातल्या कौशल्य विकासाची जबाबदारीही पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. हळदीचे आरोग्य विषयक लाभ जगभरात पोहोचावेत या हेतूने संशोधन आणि विकासही केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

2023-24 च्या हंगामात भारतात 3 लाख हेक्टर जमिनीवर हळदीची लागवड केली होती, त्यातून 10.74 लाख टन उत्पादन काढले गेले होते अशी माहिती शहा यांनी यावेळी दिली. पंतप्रधान मोदी यांनी निर्यातविषयक उद्योग व्यवसायाशी जोडलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रीय सहकारी निर्यात लि. तर सेंद्रिय शेतीसोबत जोडलेल्यांसाठी राष्ट्रीय सहकारी सेंद्रिय लि. या संस्थांची स्थापना केली असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात आश्वासने पूर्ण करण्याची संस्कृती रुजवली आहे आणि याच परंपरेतून 2023 मध्ये दिलेले आश्वासन आज पूर्ण केले गेले आहे, ही बाबही त्यांनी आवर्जून नमूद केली.
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2140659)