आयुष मंत्रालय
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद योग दिन 2025 च्या ऐतिहासिक देशव्यापी उत्सवासाठी ग्रामपंचायती सज्ज
योगसाधनेने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले: पंतप्रधानांचे ग्राम प्रमुख- सरपंचांना आवाहन
Posted On:
18 JUN 2025 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2025
आगामी आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) साजरा करण्यासाठी देशभरातील पंचायती सज्ज होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामप्रमुख – सरपंचांना पत्र लिहून, त्यांनी आपल्या पंचायत क्षेत्रातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ही तयारी सुरु आहे.
योग साधनेला सामुदायिक जीवनाचा भाग बनवण्यासाठी ग्रामप्रमुख – सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी पत्राद्वारे केले होते. त्याला उत्साहाने प्रतिसाद देत, पंचायती शाळा, अंगणवाड्या, पंचायत भवन आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष योग सत्रे, सामुदायिक संपर्क उपक्रम आणि सामान्य योग प्रोटोकॉल प्रात्यक्षिके आयोजित करत आहेत, आणि ग्रामीण पातळीवर आंतरराष्ट्रीय दिन 2025 ला खऱ्या अर्थाने जन-आंदोलनात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधानांनी त्यांच्या पत्रात, ग्रामप्रमुखांना पंचायत भवन, अंगणवाड्या, शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यासारख्या सामुदायिक ठिकाणी योग सत्रांचे आयोजन करून ग्रामस्थांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक नागरिकाला योग साधनेचे फायदे अनुभवता यावेत म्हणून त्यांनी मुले, तरुण, महिला आणि वयोवृद्ध अशा सर्व घटकांचा समावेशक सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.
हा उपक्रम घराघरात पोहोचेल आणि योग साधनेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याची प्रेरणा देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय आयुष आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी देशभरातील ग्रामपंचायतींच्या प्रयत्नांची प्रशंसा केली असून, ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाची साक्ष असल्याचे म्हटले आहे.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2137525)